तू मला आठवशील

पावसाचे अगणीत थेंब कोसळतील तेव्हा तू मला आठवशील
माझे दोन अश्रु पावसात मिसळतील तेव्हा तू मला आठवशील

चंद्रासाठी चांदणी खुलेल चंद्रही तीच्यासाठी झुरेल
त्या रात्री मात्र मी एकटा असेल तेव्हा तू मला आठवशील

त्या कातरवेळी तुझ्या आठवणी पुन्हा वेढतील मजला
झेलताना त्यांचे वार असंख्य तू मला आठवशील

तुझ्याशिवाय जगणे झाले जरी आयुष्याचे
प्रत्येक क्षणास जगताना तू मला आठवशील

मी आटोपेल माझा संसार एकट्याचा
तुला हसताना पाहावसं वाटेल शेवटी तेव्हा तू मला आठवशील

तुझ्या मैत्रीचे क्षण....

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात

ते एक गलबत ......

त्या गलबतास किनार्‍याची ओढ वाटली होती
किनार्‍याच्याही डोळ्यांत दोन आसवं दाटली होती

शीड फ़डफ़डले गलबताचे.... वारा भरला त्यात
सोडुन किनार्‍यास गलबत निघाले अथांग सागरात

अनंत मैलाच्या प्रवासास गलबताने सुरुवात केली
वाटेत शिदोरी म्हणुन किनार्‍याची आठवण साथ नेली

किनारा रडला खुप खुप.. आसवं त्याची ढळाली
सागरालाही त्या आसवांनी किंचीतसी भरती आली

गलबताचा प्रवास सुरु झाला मैल दर मैल
वाटतं होता प्रवास हा सहज संपुन जाईल

किनार्‍याची ओढ गलबताला छळु लागली
अन आठवण त्याची दिवसेंदिवस जाळु लागली

मला मिळालेला किनारा मी का सोडला?
'अजुन मला काय हवं होत?' असा प्रश्न त्याला पडला

पण आता खुप उशीर होत होता परतायला
अन वेळही लागला होता हातातुन रेतीसारखा सरकायला

दिवसामागुन दिवस सरत चालले होते
दोघंही एकमेकांपासुन झुरत दूर चालले होते

प्रचंड त्या लाटांत श्वास गलबताचे अडखळू लागले
किनार्‍याच्या भेटीस प्राण त्याचे तळमळू लागले

घोर काळरात्री खुप दाटुन गेल्या
जखमा काळजावर दोघांच्याही वठवुन गेल्या

खुप दिवस झाले....प्रवासास निघालेले गलबत परत नाही आले
कुणीतरी बोललं काल..त्या किनार्‍याचे कण कण वाहून गेले

कदाचित एखादं प्रचंड वादळ गलबतास घेऊन गेलं असेल
कदाचित एखाद्या महाकाय लाटेनं त्या किनार्‍यास वाहुन नेलं असेल.....कदाचित ....

झुकव नजर ही तुझी....

शब्द माझे

आता शब्दांनाही माझ्या सय
तुझीच जडली
शब्द माझे .... परी ते वेडे तुझ्यासाठी
फ़ुले जशी फ़ांदीची... तिलाच विसरून पडली

तुझी आठवण दाटुन आल्यावर
शब्दांचं कागदावर बरसण होतं
माझ्याचसारखे शब्दही माझे वेडे
त्यांचंही तुझ्या भेटीसाठी तरसणं होतं

मनास माझ्या शब्दांत जेव्हा
मी असे मांडू पाहीले
तस्वीर पुन्हा तुझीच उमटली
शब्दांशी मग खोटेच मी भांडू पाहीले

पाऊस दाटुन आल्यावर
शब्द माझे अजुन फ़ेर धरु लागतात
तुला अन मला भिजताना पाहुन
दिलखुलास माझ्यावर प्रित करु लागतात

चांदण्या रात्रि रातराणी खुलते
तू माझ्या शब्दांतुन माझ्या भेटीस झुरते
मन अगतिक,वेडावलेलं तुझ्या भेटीसाठी
अशा रात्रि मग शब्दांतुन तुझी भेट घडते

खट्याळ शब्द माझे
आजकाल माझ्याशीच परके होऊन वागतात
तडपत ठेवुन मला
स्व:त गंध तुझा घेत रात्र रात्र जागतात

असे हे शब्द माझे
आजकाल मलाच फ़ितूर होतात
प्रत्येक कवितेतून माझ्या
भेटण्या तुलाच आतूर होतात

तुझ्याचसाठी

जगणे हे वाटते फ़क्त तुझ्याचसाठी
मरण सुद्धा आता यावे तुझ्याचसाठी

विसरुन पाहीले तुला परी विसरु कसा
शराबी अता मी झालो तुझ्याचसाठी

होते काय माझे जे मी तुला देऊ
श्वासांनाच या विसरलो तुझ्याचसाठी

रंग बेरंगी...गंध गंधहीन झाला
प्राजक्त कधि बरसायचा तुझ्याचसाठी

रंग काजळला असा तुझ्या काजळाचा
जाळले जेव्हा मी मला तुझ्याचसाठी

आठवणी...

आठवणी जुन्याच का पुन्हा पुन्हा नव्या वाटु लागतात
जुन्या क्षणांना आठवुन हसर्‍या डोळ्यांतही का आसवं दाटु लागतात

प्रत्येक अश्रुबरोबर जणु एक एक क्षण आठवु लागतो
त्या आठवणी इतक्या गोड...आठवांची आसवंही मी साठवू लागतो

जरी प्रत्येक क्षण आयुष्याचा आपण वेगळाच जगत असतो
तरी तो क्षण आठवणीतुन परत यावा असा हट्ट करत असतो

आठवणी असतात त्या सप्तरंगी इंद्रधनुसारख्या.. कधितरीच दाटणार्‍या
श्रावण कोसळत असला जरी...फ़क्त त्याच छटा आपल्या वाटणार्‍या

माझ्या आठवणींना मी जपुन ठेवतो कधिच न विसरण्यासाठी
बरं असतं मग.....मन शुष्क झाल्यावर पापण्यांना बरसण्यासाठी