कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणाला कुणी असं सोडुन का जातं?
रेशमी वाटणारी घट्ट नाती कुणी तोडुन का जातं?

मनाशी मनं आधी जुळवायची कशाला?
जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला?
कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास
काट्यांतच मग खुडावं लागतं.....
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं
बरसतानाच नकळत हरवुनही जातं
भर चांदरातीही मनास मग
एकट्यालाच झुरावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणास कुणी कधि आपलं म्हणु नये
झालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये
वाळवंटी या जगात
एकट्यालाच मग जगावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

मी जगुन घेतो एकटा
माझ्याशीच मी हसुन घेतो एकटा
तरी एकट्यालाच रोज रोज मला मरावचं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कवि होऊन जगतो मी

ओरडावसं वाटलं की
मेघ होऊन गरजतो मी
तहानल्यागत वाटलं की
श्रावण होऊन बरसतो मी

होऊन चंद्र चांदराती
चांदण्यांत कधी हिंडतो मी
रुसुन माझ्यावर
माझ्याशीच कधी भांडतो मी

दु:ख जगाची
शब्दांत माझ्या बांधतो मी
देऊन प्रेम
दुभंगलेली मनं सांधतो मी

मनास माझ्या
कागदावर उतरवतो मी
'सुंदर कविता...!' जग म्हणते
माझ्याशीच मग हासतो मी

दुर त्या जगाकडं
जेव्हा बघतो मी..
विसरुन मला
पुन्हा कवि होऊन जगतो मी....

थांब जराशी...


जाउ नकोस अशी सांज अजुन ढळली नाही
थांब जराशी..तुझ्या केसांत लाली अजुन माळली नाही

असा ना किंतु मनात साठवु जराही तु
प्रिये प्रित माझी अजुन मळली नाही

ठाउक मज बदनाम प्रेमात तुझ्या जरी
रित जगाची तरी कधी मी पाळली नाही

मी कधीचा गप्प... तुझ्या नयनांशीच बोलतो आहे
मौनाची भाषा माझी तुज अजुन कशी कळली नाही

मला टाकुन अशी जाउ नकोस आता
थांब जराशी तुही...वाट तुझी मी कधी टाळली नाही...

प्रेमात...


प्रेमात कधी रुसायचं असतं
प्रेमात कधी हसायचं असतं
दुस-याला ह्र्दयी बसवायचं असतं
पण प्रेमात कधी फ़सवायचं नसतं

प्रेम सहज होऊन जातं
निभावणं कधी कधी जिवावर येतं
दुस-यासाठी झुरावं लागतं
याच प्रेमात कधी कधी मरावंही लागतं

म्हणे प्रेम का करावं...दुस-यासाठी का झुरावं...
म्हणे प्रेम का करावं...दुस-यासाठी का झुरावं...
पण प्रेम केलं जात नसतं
मित्रांनो ...
प्रेम हे आपोआप होत असतं

तुझ्या वाढदिवशी...

असे सोनेरी क्षण
तुझ्यावर प्रत्येक क्षणी बरसावे...
प्रत्येक सुखाने
तुझ्याच घरी येण्या तरसावे...

तु घ्यावीस उंच भरारी
अन गाठावीस शिखरं...
साथीला दुनिया सारी
अन सारी तुझीच पाखरं...

फ़ुले दाटावी रस्त्यात तुझ्या
अन काट्यांचाही स्पर्श मखमली असावा...
तु चालता उन्हातुन
तळपणारा सुर्यही तुजसाठी सावली व्हावा...

व्हाव्यात पुर्ण तुझ्या सर्व इच्छा
तुझ्या वाढदिवशी याच तुज सदिच्छा...

ढग आठवांचा...

पाऊस असा कसा आज बरसुन गेला
अनामिक हूरहूर एक, मनात माझ्या रुजवुन गेला

कधि इवल्याशा छत्रिचा आडोसाही खुप होता
आज घरात माझ्याच, पाऊस मला भिजवुन गेला

अगणित थेंब याचे कधि मीच झेलले होते
आज का मग पाऊस हा, मज तरसुन गेला?

कातरवेळ आजची अशी सरींनी वेढुन आली
थेंब प्रत्येक,प्रत्येक सरीचा, मज खिजवुन गेला

ओढ ही कसली मनास माझ्या? ना कळे
ढग आठवांचा, मनात एक गरजुन गेला

मैत्रि


मैत्रि ....सांगुन होत नाही
मैत्रि...करायची ठरवली तरी करता येत नाही
मैत्रि ...मग होते तरी कशी?

मैत्रि होते अशीच नकळत...
कुणीतरी शब्दांनीच मनाच्या तारा छेडुन जातं
मनाशी मन जोडुन जातं
'मैत्रि'चं एक नवं नातं बनवुन जातं
अन 'दोघांनीही त्यास जपायचं' असं म्हणुन जातं...

'मैत्रि' म्हणा किंवा 'दोस्ती'
शब्द तसे लहानच आहेत...
पण आत दडलेले अर्थ
शोधता आले तर खुप महान आहेत....

मैत्रि कधि असते उनाड वा-यासाखी
सबंध आसमंत कवेत घेऊन उडणारी
अन कधि नाजुक फ़ुलासारखी
हवेच्या हलक्याश्या होक्यावरच डुलणारी

दु:खात हसु खुलवते ती मैत्रि
अन आपले अश्रु होऊन ढळते तीही मैत्रि
मैत्रि त्या निर्मळ सरितेसारखी
मैत्रि त्या धुंद श्रावणसरिंसारखी
अंधा-या रात्रि काजवा होऊन चमकते मैत्रि
कॄष्ण-सुदाम्याला पाहिल्यावर समजते मैत्रि

तु जप तुझी मैत्रि
मी जपतो माझी मैत्रि
सारचं फ़ोल यारा दुनियेत या
खरी फ़क्त तुझी माझी मैत्रि.......

मलाच जाळले मी...

जरी होऊन अश्रु तुझेच तराळले मी
तु बोल तुजसाठी मज नाही जाळले मी

रस्त्याने फ़ुलांच्याही मी जपुन चालणारी
मला न ठाऊक तुजवर का भाळले मी

उमजेल मी ...अन समजेल मीही जरा
म्हणुन कधी तुज सांगायचे टाळले मी

तुला माळण्याचा जरी खोटा प्रयास झाला
बघ.... आज तुझेच चंद्र तारे माळले मी

कधी न होती मला जरुर कंकणाची
नकळत तुझ्या नजरी मज न्याहाळले मी

मंद वारा अन धुंद तो श्रावण आजही
स्वप्नांच्या गावा मिठीत तुझ्या शहाळले मी

तुला न ठाऊक भवती ऊब ही कसली
तुजसाठी आज पुन्हा मलाच जाळले मी....

सजणी


अगे लाजवंती
नलाची जणू तु दमयंती
मनाशी माझिया तु खेळ का मांडियला?
अपराध सांग माझा असा काय झाला?

दिपक तु... मी पतंग वेडा
कैसे तुला हे न कळे
ठाउक आहे जरी जळणे
मी पतंग तुजसाठीच जळे

स्वर्गाची तु आहेस परि
नसेल मी चन्द्र जरी
संशय मजवर नकोस करु
प्रित माझी आहे खरी

रांगोळी अंगणाची
तुझ्याच प्रतिक्षेत आहे
तुळस दाराची सखे
तुझीच वाट पाहे

आता तरी प्रिये
गुलाबी ओठांची पंखुडी तु खोल
कर्ण जाहले अधीर
सजणाशी तु सजणी एकदाची बोल....

निवडुंग

मी असा त्या एका समईची वात होतो
जाळले मी मला...मी न कुणा ज्ञात होतो

हुंद्का हा कुणाचा श्रावणास आला?
मीच माझ्यासाठी त्या ग्रिष्मात गात होतो

तू माळ खुशाल नभातला चंद्र आता
मीच तुझा दिस कधि मीच तुझी रात होतो

करार तुझा मीच नामंजुर केला
जीवना..मीच तुज सोडुनि जात होतो

तू शोध सुगंधाची फुले दुसरी आता
निवडुंगाचा का कधि पारीजात होतो?

जीवन एक नाव

जीवन एक नाव... वल्हवे दोघं होऊ चलं
डगमगेल जरी...मिळुन पैलतिरी नेउ चलं

याच वाटेवर... खुपदा अनोळखी चाललो
घेउन हातात हात...एकमेकांचे आता होऊ चलं

झुकवु नकोस नजरा...त्याही बावरल्या आता
त्यांच्याच ओळखीने...नजरेस नजर देउ चलं

तसा प्रत्येकजण अनोळखी प्रत्येकाला
एकमेकांवर आपणच विश्वास थोडा ठेऊ चलं

चंद्र आणि क्षितिज... खुप दुर इथुन
इथचं कुठंतरी...घरटं छोटसं पाहु चलं

सांज आली ... सुर्यही बघ ढळाया लागला
ढळण्याआधी तो...प्रकाश त्याचा लेऊ चलं

क्षण एक एक संपतो...नकोस वेळ दवडु
आयुष्य आहे थोडं...पुरसं जगुन घेऊ चलं

ही काळरात्र नाही...बघ चांद नभी खुलला
होऊन एक दोघं...श्वास एकमेकां देउ चल

हुंदका..

हुंदका साधा तुझा सांगून गेला
सावरी जो तो सुद्धा पांगून गेला

तू पुन्हा ही राहिला प्यासाच येथे
जो नको तो आजही झिंगून गेला

हा वसंत असा कसा मोहरुन आला?
फ़ुलतसे जो...आज तो खंगून गेला

ज्यास सांगितले गुज सारे मनीचे
तोच फ़ासावर तुला टांगून गेला

काय तो आता पुन्हा सोडुन गेला?
तू पुन्हा एकटा अता दंगून गेला




सोडले दुनियेस सार्‍या आज का तू?
का शब्दात तुझ्या असा रंगून गेला?

ओठ ना जे बोलले दु:ख मनीचे
ते तुझ्या गझलेत तू सांगून गेला

एकदा पावसाला म्हटलं मी...


एकदा पावसाला म्हटलं मी...
" तु माझ्या घरी ये
आपण दोघं खुप खुप खेळु
पहिल्या पावसाचा गंध घेत दोघंही मातीत लोळु
तु माझ्यावर बरसुन घे खुप खुप
मला खुप भिजायचयं
तुझ्याशिवाय कोण माझं?
तुझ्याबरोबरच मला जगायचयं......"
पाउस म्हणाला....
" भिजण्यासाठी तुझ्या पापण्यांचा पूर तुला पुरेसा आहे
त्याच्यापुढे मित्रा मीच 'जरासा' आहे
आणी जगायचं म्हणत असशील तर...
मलाच माझा भरवसा नाही
मी ही तुझ्याचसारखा...
माझाही कुठला गाव असा नाही..."

प्रेम


प्रेमाला नसतात जातीनितीची बंधनं
प्रेमाला नसतात क्षितीजाच्या सीमा
प्रेम असतं रिमझिमत्या श्रावणसरिंसारखं
हिरवळीवर खुलणा-या हळुवार फ़ुलासारखं

प्रेम असतं दोन प्रेमळ मनांचा मिलाप
छेडला जातो ज्यातुन सप्तसुरांचा सुमधुर आलाप
प्रेमावर असतो फ़क्त प्रेमाचाच अधिकार
आणी असतो प्रेमळ मनांचा सहवास

प्रेम हे द्यायचं असतं
प्रेम हे घ्यायचंही असतं
जगातली अनमोलातली अनमोल गोष्ट प्रेम आहे
कारण...सर्वात स्वस्त प्रेम आणी प्रेमच आहे

श्रावणवेडा


अवचित आल्या अवनिवरती
जलधारा या होऊन मोती
फ़ुलं, पाखरं, झाडी नहाती
कधि साऊली कधि उन्हं नहाती

नभात कडकड विजा गरजल्या
सरसर मजवर सरी बरसल्या
ठाउक त्यांना मी श्रावणवेडा
भेटीस माझ्या त्याही तरसल्या

मीही जरा मग भिजुन घेतो
थंडीत थोडा थिजुन घेतो
लेऊन रंग मग इंद्रधनुचे
हर्ष नभी मी पेरुन येतो

भिजले डोंगर द-याही भिजल्या
पायवाटा त्या निपचीत निजल्या
सारेच मजला दिसे अतिसुंदर
श्रावणस्वागता जणु तरुणी सजल्या

पाणी खळाळुन वाहील आता
झुळझुळ गाणे गायील आता
मुक होती ही धरती कधिची
सप्तसुरांत ही न्हाईल आता

शांत जाहली दाह भुमिची
मंद जाहली आग रविची
मनात मझ्या आस पेटली
श्रावणवेड्या माझ्या प्रियेची...

मी तुझाच होतो...







सांज ढळली होती..रात नटली होती...
नभात चांदतारे..तेही मस्तीत सारे..
परी मी एकटाच होतो....
तरी मी तुझाच होतो

त्या वळणावरती
तु वाट वेगळी केली
सोडुन मज तु दुर दुर गेली
पाहीलेस ना वळुन मागे एकदाही
उभा मी त्याच वळणावर होतो...
अजुनही मी तुझाच होतो...

जगापासुन मी दुर झालो
एका काळोखात मी चुर झालो
हो! हो मी नशेत होतो...
परी ही नशा तुझीच होती..
अन मीही तुझाच होतो...

जगण्याचा शाप सोसु कसा?
रोज रोज मी मरु कसा?
अखेरच्या क्षणी माझ्याशीच रडुन घेतले मी...
मलाच जेव्हा मी सोडुन चाललो होतो..
तेव्हाही मी फ़क्त तुझाच होतो...

पाउस


उन्हात पाउस पडतो जेव्हा
शेतकरी राजा म्हणतो तेव्हा
चल रं सर्जा बिगी बिगी
बिगी बिगी चलं बिगी

हवेत येतो जेव्हा गारवा
हळुच बोले तेव्हा पारवा
फ़ुलेल धरती येइल वरती
रानोरानी नाद गर्जती

वर्षाराणी येई धावुनी
पाणीच पानी रानोरानी
मोर, पपीहा, चातक पक्षी
दिसे आनंदी गुलाब बक्षी

शेत असे ती काळी पाटी
पिकांची त्यावर हीरवी दाटी
शेते काळी ती हिरवी झाली
किमया अशी ही कोणी केली

पिके बहरती आनंदाने
पोपट गातो खुशीत गाणे
वर्षाराणीची ही किमया
स्वर्गच भासे दुसरा जणु हा

धान्याची मग आरास लागे
शेतकरी तव खुशीत सांगे
शेतकरी हा खरेच राजा
नसेल राजा कुणीच दुजा

नजर







कधि वा-यावरती उडणारी एक नजर
नजरेस मिळुन नजरेत जडणारी एक नजर

वाटते बघावे जरी उठवुन नजर
होऊन पाणी मनातच अडणारी एक नजर

शब्दांची जेव्हा हद्द संपते
समोरच्या नजरेत दडणारी एक नजर

कधि चंद्रावर कधि चांदण्यांत
सुर्याशीही कधि भिडणारी एक नजर

कधि भेटते ती क्षीतीजाला
कधि रस्त्यातच अर्ध्या सांडणारी एक नजर

तशी बोलकीच....पण कधि कधि
अश्रु होऊन रडणारी एक नजर

मिळते नजरेस नजर काहीच क्षण
तरी काळजात रुतुन तडफ़डणारी एक नजर

बदलु कसा मी तुझ्यासारखा?


तोच नभात चंद्रमा त्याचं नभात तारका
तुच तेवढी बदलली मी अजुन पहिल्यासारखा...

जरी वाटले तुज शब्द माझे अनोळखी
नीट बघ...चेहरा अजुन तोच तो बोलका

आता ना गंध मातीला पहिल्या पावसाचा
अजुनही तरी मी धुंद पावसासारखा

तुझिया स्वप्नांत नकोस घेऊ मला
विषय स्वप्नांचा माझ्या तुझाच पहिल्यासारखा

तु माळ खुशाल तो चंद्र केसांत आता
तुझ्या आठवणींचा क्षणही मला तुझ्याचसारखा

तुज ना आठवे तुझे रुप कधि जर
बघ नजरेत माझ्या... अजुन मी तुला आरशासारखा

जरी तु बदलली..दुर दुर गेली...
पुन्हा बदलु कसा मी तुझ्यासारखा?

तुजवीण ...

तुजवीण सुनी झाली कविता
अन शब्द पोरके झाले
शब्द होते श्वास माझे
मज श्वास परके झाले

तुजवीण शब्द सारे
सखये मलाच बोचती आता
कोण मी त्यांचा
जाब मलाच पुसती आता

तुजवीण सखये आता
मज लेखणीही दुर झाली
प्रत्येक कवितेची माझ्या
आता लय बेसुर झाली

तुजवीण सखये आता
कवितेत कुणास पाहु
बेनाम ही कविता माझी
सांग कुणास कशी देऊ

तुजवीण शब्द सखये
नुसतेच मज पाहुन गेले
जे होते साथ काही
ते अश्रुंत वाहुन गेले

तुजवीण कवित्व माझे
सखये सोडतो मी आता
कवितेतले नाव माझेच
सखये खोडतो मी आता

आठवणी


जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतं

या आठवणींत बुडुन जाताना
आजचं नाही उरत भान
क्षण ते परत ना येतील आता
तीच होती सुखाची खाण

आठवणी असतात अनेकांच्या
तुमच्या, माझ्या, सर्वांच्या
प्रत्येकाची असते एकतरी आठवण
दु:खाची अथवा सुखाची साठवण

माझ्याही आहेत अशाच आठवणी
पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या
जीवन झाल्या त्याच आठवणी
सुवर्णरुपी गतकाळाच्या

ह्रुदयात या रुजुनि गेल्या
काही त्यातल्या बुजुनही गेल्या
मनात काहींनी घर केले
पण...
क्षण आता ते उडुन गेले

आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात...

पावसा...

पावसा...
तुझ्याशी माझं नातं खुप जुनं आहे
तुझ्याबद्द्ल कितीही लिहीलं तरी उनं आहे
मी रडत असताना माझे अश्रु तु पिलास
कधि थेंब बनुन तर कधि शब्दांच्या रुपात
नेहमीच तु माझा साथ दिलास
वाटतं तुझा प्रत्येक थेंब घ्यावा झेलुन स्वत:च्या अंगावर
घ्यावं रडुन एकदाचं डोकं ठेवुन तुझ्या खांद्यावर
पण नाही....
मला तु परका नाहीस कधि
तसं इतरांनाही परका होऊ नकोस
दे त्यांनाही तुझं आयुष्य थोडं
असा तु स्वार्थी होऊ नकोस
तु फ़िर रानावनांतुन...नदि नाल्यांतुन
कुणालातरी तुझ्या ओलाव्याची गरज असेल
बघ कुठंतरी रानांना भेगा पडल्या असतील
एखादा चातक तुझ्यासाठी अखेरच्या घटका मोजत असेल
तुला दिसतील चिमुरडी पोरं रस्त्यावर धावताना
आपल्या आईलाही विसरुन तुझ्या शोधात फ़िरताना
बघं कुठंतरी एखादं हरिण तुझ्या आभासामागं धावुन
तडफ़डत असेल
बघ एखादं फ़ुल
तुला उमलायच्या आधिच कोमेजताना दिसेल
तुला सावली मिळणार नाही कुठं
झाडांची पानं कधिच गळाली असतील
माझ्या नजरेनं तुही बघं
कित्येक पक्षी तुझं जग सोडुन गेले असतील
हे सारं बघितल्यावर सरते शेवटी
रडु आलचं तुला तर तु ये माझ्याकडं...
रड आता तुही...माझ्या खांद्यावर डोकं ठेवुन
नाही...नाही...
सांत्वना नाही करणार तुझी
तेवढा मोठा मी नाही
पण हो...
मी रडेल तुझ्यासाठी
देइन माझे दोन अश्रु तुला..
तु आणखी बरसण्यासाठी..
तु खुप खुप बरसण्यासाठी...

भेटला असता प्रेमाचा एकतरी प्याला...

पक्ष्यांनी जशी किलबिल करावी
चांदण्यांची नितळ बरसात व्हावी
पानांनीही मग सळसळ करावं
तुझ्या स्वप्नांनी तसं नयनी भरावं

ओठांवरती पुन्हा हसु खुलावं
कळीनही मग उमलुन यावं
क्षितीजापलीकडुन तुझ्या हाकेने
आठवणींनी मनात बहरुन यावं

पावसाच्या सरि बघ पुन्हा कोसळल्या
तुझ्या भेटीस जणु त्याही उसळल्या
आठवणी तुझ्या मी मनात भरल्या
चांदण्यांतही ज्या खुलुन उरल्या

गुलमोहरही बघ बहरुन आला
श्रावण तर केव्हाच फ़ुलुनही गेला
भेटला असता प्रेमाचा एकतरी प्याला
नशिबाने आता तोही हिरावुन नेला

तुझ्याच वाटेकडं...


तु आता कधी परतुन येणार नाहीस
माझ्याशी कधी प्रेमानं हसणारही नाहीस
असलं जरी हे सत्य, ऐकत नाही मन वेडं
बसतं डोळे लावुन तुझ्याच वाटेकडं.

तुझ्या आवडीचा मोगरा तर आजही खुलतो
पण तुझ्या प्रतिक्षेनंतर त्याला पुन्हा सुकावचं लागतं
आणि तुझ्याच स्वागतासाठी बरसतातही जलधारा
पण त्यातही आता कधी भिजत नाही तुझी वाट
आता तर पेनातील शाई संपत आली
आणि कागदांचे थवेही एक एक करुन ऊडाले
तुझ्या प्रेमाचे ते चारच क्षण
पण स्व:तला कविता म्हणवुन कागदावर ऊतरले
माझ्या अंगणात तुझं प्रेमाचं पाऊल अलगद पडेल
मग तुझ्याकडं बघुन हसणारा मोगरा पुन्हा एकदा खुलेल
पुन्हा बरसतील त्याच जलधारा
वाहील पुन्हा तोच अवखळ वारा
पुन्हा तो श्रावण येईल...
ती सुनी मॆफ़ल पुन्हा एकदा गायील...
अशा आणि अशाच कितीतरी स्वप्नांनी दाटुन येते पहाट
पण.......
पण दुपारच्या ऊन्हात ही सगळी स्वप्न विरतात
आणि डोळे पुन्हा फ़िरतात...तुझ्याच वाटेकडं
वाळवंटी वाटेकडं.....
मॄगजळाकडं...

पुन्हा तुझ्या आठवणींची मॆफ़ल सुनी होईल.....


ढग दाटले नभी आता पुन्हा एकदा पाऊस येईल
शांत निजलेली तुझी आठवण पुन्हा जागी होईल

तु नसलीस तरी तो अजुन तसाच आहे
त्याच्याबरोबरच आज माझ्याही डोळ्यांत पाणी येईल

वीज कडाडली नभी क्षणभर अंधार झाला
मीठी माझी आता ऊगीचच घट्ट होईल

पावसाचा प्रत्येक थेंबही जणू तुझ्याचसाठी
तोही पुन्हा वाट चुकुन माझ्याचकडे येईल

पाऊस जरा मंदावला...दूरदूर गेला
आता पुन्हा तुझ्या आठवणींची मॆफ़ल सुनी होईल

शराब




दोन घोट दे तू शराब यारा
वाटे ही दूनिया खराब यारा

दु:ख तुझे नि माझे एकच येथे
तु ढाळ अश्रू मज दे शराब यारा

बेईमान ही माझीच जिंदगाणी
एक ईमान ही शराब यारा

का माझ्या शेवटाची ही सुरवात आहे ?
तु सोड चिंता अन घे शराब यारा

का कुणाची मी कधी वाट पाहू?
मी एकटा अन साथीला शराब यारा

पुन्हा सांज झाली.... पुन्हा रात आली....
पुन्हा भर एक जाम शराब यारा

मातीला गंध पावसाचा..

ढगाढगाच्या मागुन ढग नभात पळे
मातीमातीत गंध पावसाचा दरवळे

सरीसरीच्या मागुन सर झेपावली खाली
थेंब थंडगार ओले अंग अंग शहारले

चिऊचिमणी झाडाझाडांच्या वरती
धुंद होऊन गाती चिंब होऊन नहाती

भिती जराशी दाटली फ़ुलपाखरांच्या मनी
फ़ुलवित पिसारा निळा नाचे मोर रानोरानी

चंद्र रमला पुन्हा लपंडावाच्या खेळात
न्याहाळीतो रुपडे इंद्रधनुच्या रंगात

पायवाटा जुन्या झाल्या त्या गेल्या पाण्याखाली
मैत्रि पावलांची सरली क्षणभर दुरावली

थेंब होऊनिया मोती... सवे सजणाची प्रिती
सजणीच्या दारी येती...गीत सजणाचे गाती

सरींचं येणं, सरींचं जाणं हा खेळ दिवसाचा
ओसाड उजाड मातीलाही आज पुन्हा गंध पावसाचा...

अशीच यावी तु...


अशीच यावी तु...मनाने धुंदीत गान गावे
होऊन पाखरु त्याने जाऊन मग आकाशी भिडावे

अशीच यावी तु... मग सरिलाही विसर पडावा
तुझ्याच गालावर पडण्या तिचाही प्रत्येक थेंब चिंब व्हावा

अशीच यावी तु...कळीलाही जेव्हा गंध नसावा
होऊन फ़ुल तिने सुगंध तुझाच लपेटुन घ्यावा

अशीच यावी तु...मलाही जेव्हा ठाउक नसावे
स्वप्नांतुन बाहेर येता समोर पुन्हा तुच दिसावे

अशीच यावी तु...त्या चांदराती चंद्रालाही भुल पडावी
पाहुन तुज मिठीत माझ्या त्यालाही चांदणीची आठवण व्हावी

मैफ़ल एकट्याची सजली....


चंद्र नाही आज आकाशी
मन उदास उदास
चांदण्यांचा सडा जरी
रिते नभ भकास भकास

तळ्याच्या काठाशी
मी एकटा बसुन
रात सरुन गेली तरी
वाट पाहतो रुसुन

खुप लांबचा प्रवास
दव थकले, निजले
वेडे मन आतुरले
तुझ्या प्रितीत भिजले

दूर कुठं पहाट झाली
रात ढळाया लागली
नजर पुन्हा माझी
तुझ्याच वाटेकडे वळाया लागली

क्षणापुर्वीचे सोबती
पानं फ़ुलही निजली
मी एकटाच आता
मैफ़ल एकट्याची सजली....

प्रिय कविता...


प्रिय कविता,
जगापासुन दूर झालो
तेव्हा तुच मला कवेत घेतलसं
जग असतं फ़क्त दिल्या घेतल्याचं
हेही तुच मला शिकवलसं

तुच फ़क्त मन माझं जाणलसं
जगासमोरही तुच त्याला आणलसं
तु भेटली नसतीस तर भरकटलो असतो केव्हाच
शीड तुटलेल्या जहाजाप्रमाणे बुडालो असतो तेव्हाच

तु माझ्या श्वासावर
अन तुच माझ्या स्वप्नांत
स्वार्थाच्या या बाजारात
फ़क्त तुच माझ्या आपल्यांत

तुझ्याशी जीवनाची स्वप्नं सजवतो
तुटली तर येऊन तुझ्याशीच रडतो
कारण...
कारण...तुझ्याशी माझं नातं प्रेमाचं...
सु:ख दु:ख अन भाव-भावनांचं

तु येशील म्हणुन
नित्यक्षणी तुझी वाट पाहत आहे
मीही माझा नाही आता
'माझी कविता' म्हणुन तुझेच गुणगाण गात आहे...

ये पुन्हा अशी...
ये पुन्हा अशी की शब्दांची होवो बरसात
चल घेउन पुन्हा मला
चांदण्यांच्या तुझ्या अनोळखी स्पर्शात...
तुझाच प्रिय कवि,
--संदिप--