मुखवटे

ओढू किती मुखवटे?
शोधू कुठे मुखवटे?

का चेहरे हरवले?
उरले असे मुखवटे

खोटेच भाव सारे
येथे खरे मुखवटे

बघ पापणी ढळाली
का काढले मुखवटे?

जगणे खरे न येथे
येथे बरे मुखवटे

बाजार आज भरला
विकती इथे मुखवटे

--शब्द्सखा!

भिजलेले थेंब...

आज पुन्हा माझ्याकडे पाऊस पडला.....................................
भिजलेले थेंब आता
निथळतील पानावर
ओले थेंब...ओल त्यांची
भिज सार्‍या रानभर

वाट पाण्याखाली खोल
वर हिरवे डोंगर
निळ्या नभाळीचे मेघ
उतरले भुईवर

सर सर...सर आली
सुरा सुरात थेंब गाती
एक झुळुक वार्‍याची
कशी सरिला छेडती

एका फ़ुलावर एक थेंब
असा सजला...हसला
फ़ुल लाजले...खुलले
थेंब रुपाला भुलला

ओलं मन..ओलं तन
ओले थेंब अंगावर
आठवात एक फ़ुल
गंध त्याचा मनभर

--शब्द्सखा !

धरा भिजली भिजली

धरा भिजली भिजली
ओल्या मातीला सुवास
थेंब इवलेसे झाले
पाना फ़ुलांची आरास

चिंब पाखरांना आता
गीत प्रेमाचे स्फ़ुरले
आपल्या गं मिलनाचे
थेंब हवेत तरले

असा विसावला सये
एक थेंब तुझ्या गाली
मीही वाटे थेंब व्हावे
तुझ्या ओठांची गं लाली

थेंब कोवळे कोवळे
असे मनी पाझरती
सूर तुझ्याच प्रेमाचे
असे शब्दात झरती

ओले चिंब पावसाला
तुझ्या रुपानेच केले
भिजवुन मला थेंब
तुझ्या केसुत विरले

--शब्द्सखा!

गझल

उरावी गझल

तरावी गझल

शब्दांनी सदा

करावी गझल


भटांची मात्र

स्मरावी गझल


तनात मनात

शिरावी गझल


पुन्हा मैफ़ली

फ़िरावी गझल


मराठी शान

ठरावी गझल


--शब्द्सखा!

तुझ्या अजुन आठवणी हव्या होत्या

सांज उतरली सख्या
हळवार लाली पसरली क्षितीजावर
पाखरांचे थवे परतताना घरट्यांत
अन अशावेळी मी निघते तुझ्या भेटीला
आँफ़िस सुटल्यानंतर आपली भेटायची जागा...
ते चहाचं हाँटेल...
त्या रस्त्यावरुन मनसोक्त हिंडणं.
.दररोज जणू पहिल्यांदाच भेटणारे आपण..
पुन्हा एकदा भेटतो...आज...
तू मला घडवलंस...
माझ्याशी माझं नातं जडवलंस..
प्रत्येक क्षण जगायला शिकवलंस
इतकं सगळं करुनही सख्या
ऐन शेवटी रडवलंस..
आज दु:खी नाही रे मी
असुच कशी दु:खी...
तुझी साथ आहेच बरोबर
त्या आठवणींसंगे...
पण...तुझ्या अजुन आठवणी हव्या होत्या रे...
सख्या, थोड्याश्या आठवणी देण्यासाठी तरी ये ना रे...

--शब्द्सखा!

तुझ्या आठवणींच्या साठवणी

दीपा आणी गणेशच्या कवितेवरुन....
अपराध घडु पाहतोय पुन्हा
मन जडु पाहतंय पुन्हा
अल्ल्ड मन..वार्‍यासवे
इकडे तिकडे उडु पाहतंय पुन्हा

अन तुझाही दुजोरा
मला वार्‍याबरोबर वाहवायला
तु दुष्ट आहेस खरा
नवं जग देतोयसं मला जगायला

सिता पत्नि होती प्रभुरामांची...
मी सिता नाही रे
पण हो..पत्नि मात्र आहे तुझी
सितेसारखं थोडंसं जगु दे रे

आणी मी कुठे एकटी..
संगे आहेत की तुझ्या आठवणी
आणी घरभर दाटलेल्या
तुझ्या आठवणींच्या साठवणी...--शब्द्सखा!

तू सर्वशक्ति.. तू सर्वसाक्षी

तू सर्वशक्ति.. तू सर्वसाक्षी
तू सर्वव्यापी.. तू सर्वगुणी
तू चराचर..तू निरंतर
आशीष असुदे मी पामर
तू रात तुच दीन
जल, थल, अत्र तत्र तुच तू
अणू रेणुत व्यापलास तू
तनी मनी वसलास तू
कामधेनु तू, तुच वत्सला
तू इंद्रायणी,सावळ्या तुच विठठला
तू धरा..अंबरात साठलास तू
दशदिशा..पाताळही गाठलास तू
शोधु तुला कुठे मी?
मिटता डोळे सुडौल देह डोळ्यात दाटलास तू

!! श्रीगुरुदेव !!

कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो

देव च्या कवितेला रिप्लाय देताना.............
---------------------------------------

तू दिली डायरी जी
अजुन कोरीच ठेवली मी
का म्हणुन नको विचारुस
कारण,कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो...

कोरी डायरी माझी
अन कोरीच माझी कहाणी
वेड्या मनाला तरी वाटते का?
कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो...

मी चित्र रंगवले होते आपले
पण पाऊस कोसळला असा
जणु जाणतो तोही हे की
कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो...

सापडेल जेव्हा तुला डायरी माझी
नकोस ढाळु अश्रु एकही
राहु देत कोरेच कागद सगळे

तुही जाणशील..खरचं कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो...

डायरी कोरी असली तरी
वाटेल तशा रेघा ओढु नकोस..
अगं वेडे..कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो.

डायरीचं आयुष्य किती
ती कोरी आहे तोपर्यंतच, नंतर शब्दांची...
म्हणुनच..कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो

शब्द बरसु लागतील
पानं हरवुन जातील सगळी...कविताच उरतील
काही वेळ फ़क्त..कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो

--शब्दसखा!

अखंड प्रवास

क्षणभंगुर जिणे
जिंकणे कितीक... कितीक हरणे...

एक श्वास तूटता
तुटतील सगळी नाती
हिशेब लावण्या
कित्येक क्षण जाती

सांज ढळेल कधिही
अंधार दाटेल रे
माझे कितीही म्हटले
संगे काय साठेल रे

मी कोण?
हजारो माझेच मला भास
परी मी न कुणाचा
हा फ़क्त अखंड प्रवास......................................

--शब्द्सखा!

कुंकवाचा करंडा....

दीपा आणी गणेशच्या कवितेवरुन....

सात फ़ेरे घेतले होतेस तू
सात वचनं दिली होतीस तू
सात जन्म साथ निभावणार होतास तू
झुठ सारं...
तुझी वचनं झुठ...
तुझं अस्तित्व झुठं...
अस्तित्व एकचं....मी एकटी तुझ्यावीना!
तू तर सुटलास रे..
झाल्या असतील वेदना तुला
मला सोडुन जाताना...
पण त्या क्षणभर होत्या...
अन मी...
मी मरतेय क्षणोक्षणी ..
अन श्वासागणीक सरतेय
.............सरेल मीही कधीतरी अशीच तुझ्यासारखी
कदाचित तुझ्यासाठी....
पण तोपर्यंत...
तोपर्यंत मला जगावं लागणार आहे
एकटीलाच...
तुझी विधवा म्हणुन...
एक अबला म्हणुन...
कारण...कारण आता सांडलाय माझ्या कुंकवाचा करंडा....

तुझ्या मनाशी

खेळ चांदण्यांचा तुझ्या मनाशी
आकाश दाटले तुझ्या मनाशी

मी शोधतो मलाही तुझ्या मनाशी
मी सांधतो मलाही तुझ्या मनाशी

बोलते मन हे का तुझ्या मनाशी?
खोलते गुज सारे का तुझ्या मनाशी?

सांग वेडे विचारुन तुझ्या मनाशी
काय नाते माझे तुझ्या मनाशी?

अर्पिलेस आज मज मी तुझ्या मनाशी
जोडिले नाते युगायुगांचे तुझ्या मनाशी

---शब्द्सखा!

ती आयुष्याचा श्वास झाली

वाटलं होतं,
पिंपळपान होऊन आता गळावं लागेल..
सुर्य पेटताना,
निखारा होऊन मलाही जळावं लागेल..

पावलांनाही समजावले
चालता किती जरी... वाट ही संपेना
कुठे जायचे...किती चालायचे
वाटेलाही अताशा उमजेना

घ्यायचाच होता श्वास शेवटाचा

ती श्रावणाची सर आली

ग्रिष्मातही वसंत खुलला
ती आयुष्याचा श्वास झाली

--शब्द्सखा!

परदेस

कसे जगावे येथे?
कसा हा देस आहे?
न्याराच रंग येथे
आगळा भेस आहे...
मी दूर येथे
मलाच शोधताना...
येथे कोण माझे
प्रत्येक घराला वेस आहे...
प्रत्येक वाट अनोळखी
अन काट्यातुन जाते...
प्रत्येक पावली येथे
उभा दरवेश आहे...
दूर देस माझा
फ़ुलांनी नटलेला
फ़ुलाला गंध खोटाच जेथे
असा हा परदेस आहे...

--शब्दसखा

आज मन वेडं...

आज मन वेडं...
आज मन धुंद
तुझ्या आठवणींत सारं सारं बेधुंद
तुझा स्पर्श, तुझे श्वास..
माझ्या शद्बांनाही तुझे भास
तुला लिहीतो तुला पाहतो
तुझ्यासवे हा अखंड प्रवास
उडावे आज अंबरी
तुझ्या अंगणी यावे
तुला पाहता क्षणात
त्या क्षणात जगुन घ्यावे

--शब्दसखा

कविता तुला वाहीलेली

अशी भर दुपार
बाहेर रणरणती उन्हं...
तुझ्या आठवणीच फ़क्त
बाकी सारं सारं सुनं
सुकलेली झाडं
सुकलेली पानं
तुझ्या आठवणीत माझं
विरहाचं गाणं
पुन्हा एक कविता
तुला वाहीलेली
पुन्हा माझ्या कवितेत
मी तुला पाहीलेली........

--शब्दसखा

कविता तुला वाहीलेली

अशी भर दुपार
बाहेर रणरणती उन्हं...
तुझ्या आठवणीच फ़क्त
बाकी सारं सारं सुनं
सुकलेली झाडं
सुकलेली पानं
तुझ्या आठवणीत माझं
विरहाचं गाणं
पुन्हा एक कविता
तुला वाहीलेली
पुन्हा माझ्या कवितेत
मी तुला पाहीलेली........

--शब्दसखा

पुन्हा सांजवेळ...

पुन्हा सांजवेळ..
.तुझ्या आठवांचा मेळ
पुन्हा चांदरात...
चांद पुन्हा भरात
तुझा गंध सभोवार...
हवेत दाटलेला
तुझ्या आठवणीत मी...
ओलाचिंब पेटलेला
तुला लपेटुन घ्यावं
तुझं होऊन जावं
तुझं सौदर्य आज सखे
तुझ्या नजरेने प्यावं...

--शब्दसखा

रात ही जाईना

शब्दात आता
प्रेम तुझे येईना
गीत माझे
प्रेम तुझे गायीना
काय झाले?
तू असे काय केले?
आता जराही
मी माझाही होईना
मला मी संपवावे
तुला सर्वस्व वरावे
पहाटेची वाट पाह्तो
रात ही जाईना

--शब्दसखा

तुच मी.....मीच तू

गीत मी.... आवाज तू
प्रेम मी..... साज तू
देह मी......श्वास तू
चांद मी.....रास तू
रात मी.....भोर तू
प्यास मी...घन घोर तू
कोण मी....कोण तू?
तुच मी.....मीच तू

--शब्दसखा!

सागर किनारे

सागर किनारे दूर दूर पसरलेले..
ओली वाळु...वाळुत मोती विखुरलेले...
तुझा गंध सांजवेळी...सांज बावरली जराशी
तुझ्या ओठांची लाली दूर त्या सागराशी
लाट एक तुज अशी भिजवुन जाते
वेडावतो मी मज ती रिझवुन जाते...

--शब्दसखा!

गालीचा

हातात हात तुझा
दूरवर पसरलेली वाट
तू शांत, मी शांत
निर्मोही अन निशब्द पहाट
गुलाबी थंडीचा
असा रंग ओला
या पहाटेस आज
तुझा साज आला
जरा थांब येथे
अजुन वाट दूर आहे
सखये पहाट ढळण्या
अवकाश भरपुर आहे
रातराणी अजुन खुललेली
प्राजक्तही आता बहरलेला
तुझ्या माझ्या वाटेवर
दोघांनीही गालीचा थाटलेला

--शब्दसखा

उन्हाचा रस्ता

तू चांदणी
अशी नभात चमकशी
मी पाहतो तुला
साहतो तुझ्या आठवाला
कधी धुंद व्हायचो
प्रेमात बेभान गायचो
शब्दांचे आता रिक्त रकाने
सुनेच आता हर एक गाणे
पहाट उजाडेल आता
चांद बुडेल आता
होईल सुना चांदण्याचा सूर
उन्हाचा रस्ता दूर दूर.....

--शब्दसखा

आतुरलेला चांद

कसा चांदण्यांना
आता नूर आला
तुझ्यासवे हा
कसा सूर आला
मी होतो कधिचा
आठवांशी झगडताना
तुझ्यासवे हा
नशेचा पूर आला
तू का अशी दूर सखये
आतुरलेला चांद मी
चांदणीसाठी बघ ना
किती दूर आला

--शब्दसखा

हक्क माझा ठरवुन दे

तू गंधाळलेली अशी
या अल्लड राती
सावरावे कसे मी
श्वास हर एक तुझे गीत गाती
तुझ्या केसुत
रात हरवली गर्द आज
दे उब प्रेमाची
बघ रात ही सर्द आज
लपेटुन घे मला तू
आज हरवुन दे मला तू
तू कोण, मी कोण तुझा
हक्क माझा ठरवुन दे मला तू

--शब्दसखा

येतेस माझ्या कवितेत?

चलं, आज माझ्या कवितेत हरवुयात दोघं...
खुप खुप दूर जाऊयात...
खुप खुप धुंद होऊयात...
चंद्राच्या कुशीत निजुयात....
गुलाबाच्या फ़ुलात भिजुयात...
श्रावणसरींत भिजवेल तुला..
मिठीत माझ्या थिजवेल तुला..
.माझी गीतं गातील तुला
शब्दसुमनं वाहतील तुला..
सप्तरंगी सूर सारे
आसमानीचे इथे नूर सारे..
दव अम्रुताचे इथे शिंपलेले..
चित्र वाटेल कुणी हे काढलेले
रात शराबी नशेत तुझीया
पहाट गुलाबी मस्तित तुझीया..
इंद्रधनु इथे रंग मुक्त होऊन उधळेल...
हर एक रंग तुझ्या केसात माळेल
शब्द हरएक तुझ्यासाठीच लिहील मी
तू गुणगुणावे मला अन तुला गायील मी..
सांग, येतेस माझ्या कवितेत ?माझ्यासवे.....

--शब्दसखा

तुझी वाट..

पहाटेचं दाटलेलं
अंधुकसं धुकं...
अन मी चालतोय
तुझी वाट..
दव लेवुन
खुललेली पानं..
हलकाच स्पर्श त्यांचा
मझ्या तनामनाला...
तू समोर येता
एक तारा निखळला
मज आधीच मिळाले जे
तो ज्यासाठी ढळला...

--शब्दसखा!

आठवण आज भिजणार आहे...

पावसाची टपटप अशीच सुरु राहणार आहे...
अन त्याच्या हरएक थेंबात
तुझी हर एक आठवण आज भिजणार आहे...
काही थेंब त्याचे
मला भिजवुन जातील, मला खिजवुन जातील
जरा वेळ थांबला असं वाटेल
पण पुन्हा एक जोरदर सर येणार आहे...
तुझी हर एक आठवण आज भिजणार आहे...
अंगाला हलकाच स्पर्श थेंबाचा
अगदी हळुवारपणे झाला
मन कावरे बावरे जरासे.......
पण क्षणात ते सावरणार आहे...
तुझी हर एक आठवण आज भिजणार आहे...
वीज... दूर नभी एक गर्जुन गेली
माझी मिठी तुझ्यावीणा
उगाचच....आता घट्ट होणार आहे
तुझी हर एक आठवण आज भिजणार आहे...
संपली सर...थांबले थेंब पावसाचे
आभाळ दाटले जे मनी
आता ते बरसणार आहे.........तुझी हर एक आठवण आज भिजणार आहे...

--शब्दसखा!

वाटही माझ्यासवे आसवांत भिजलेली...

हा पसारा चांदण्यांचा
आता उठणार आहे
आठवांचे ठसे हजारो
मागे वठणार आहे
तुझ्या पावलांचे
आवाज रुणझुण.....
खोटेच भास सारे
कानात खोटीच गुणगुण...
ती वाट अजुन तशीच
शांत निजलेली....
तू दूर चालुन गेली
वाटही माझ्यासवे आसवांत भिजलेली...

---शब्दसखा!

तू श्रावणाची सर

तू श्रावणाची सर................चिंब चिंब
भिजवी मला तुझ्या प्रेमाचा...थेंब थेंब
मिठीत तुझ्या मी..............दंग दंग
शहारते माझे हे.................अंग अंग
कसा हा जडला तुझा...........संग संग
कसा उधळला तू................रंग रंग
दाटला सभोवार तुझाच.........गंध गंध
श्वासात भरुन तुला जाहलो...धुंद धुंद
रेशमी केसुंचे हे तुझे...........बंध बंध
वाढते श्वासांची लय हलकेच...मंद मंद

--शब्दसखा!

तू श्रावणसर

सखे, मी मला ओळखतो
तुझी साथ आहे म्हणुन...
तुझ्यावीना... तसा मी काय गं?
एक श्वास घेणारा देह फ़क्त....
तू मला जगवलंस...
तू मला फ़ुलवलंस
स्व:तचे रंग दिलेस सारे
अन..तू मला खुलवलंस...
अशीच रहा नेहमी माझ्यासोबत
मला गरज आहे तुझी
मला ठाऊक आहे,
मी चालेल जेव्हा भर उन्हातुन
तू श्रावणसर होऊन कोसळशील....

--शब्द्सखा!

या रातीची तू पहाट होतेस

रात्र होता काळोख गहिरा होतो...
निरव शांतता दाटलेली...
अशात काळोख मला वेढुन घेतो
मी शोधतो मला अन अधिक हरवुन जातो
कुठे वाट अन मी कुठे जात आहे
कसेतरी मी कुठे थबकुन घेतो...
रात्र ही कधिच आता संपणार नाही वाटते
काळोखाचीही सभोवार सावली दाटते
तेव्हाच तू येतेस
मला तुझा प्रकाश देतेस
मीही मग उजळु लागतो
या रातीची तू पहाट होतेस

--शब्द्सखा!

सखी सोनकळी

सखी सोनकळी..नाजुक बाहुली
सखी पावलागणीक माझ्या.. माझीच साऊली...
सखी सैरावैरा धावणारा बेधुंद वारा
सखी माझी...माझ्यासाठी निखळणारा तारा...
सखी सागराची लाट ..अल्लडपणे झुलणारी
सखी शांत, गहिरी रात ..चांदण्यांत खुलणारी...
सखी सांजवेळ गुलाबी...माझ्याचसाठी सजणारी
सखी दवात न्हालेली सकाळ...हलकेच गाली लाजणारी...
सखी श्रावणाची सर...मुक्त होऊन बरसणारी..
सखी शब्द शब्द, सखी अर्थ अर्थ माझ्या कवीतेत उतरणारी...

--शब्दसखा!

प्रेम तुझे

सात रंगात आज नहाले प्रेम तुझे...
नितळ, निर्व्याज जाहले प्रेम तुझे..
शब्दात माझिया या साठले प्रेम तुझे...
सुरांनी माझिया या गायीले प्रेम तुझे...
श्वास माझा प्रत्येक जगतो प्रेम तुझे...
क्षण माझा हर एक जिंकतो प्रेम तुझे...

--शब्दसखा!

तुझ्यापुढे सखये...सारंच फ़िकं

पुन्हा रात आली...
चांदण्यांची बारात आली...
वाहणारा गंधित वारा...
चांदण्यांच्या चंचल शुभ्र धारा....
रातराणी गंधाळलेली...
तुझिया गंधास जणु ती माळलेली...
चांद उगाच सजलेला ...
पाहुन चांदणीला जरासा लाजलेला...
नदीचा काठ... हलकासा सूर..
नदीला आलेला सागराचा पूर...
तुझ्याच वाटेवर दाटलेलं धुकं....
ही रात, चांदणी, चांद, रातराणी तुझ्यापुढे सखये...सारंच फ़िकं................

--शब्द्सखा!

सखी वाटते कविता माझी

प्राजक्त होऊन बरसते कविता माझी
रातराणी होऊन गंधाळते कविता माझी
अस्तित्व माझं जपते कविता माझी
शुन्य होतो मी..... जेव्हा लपते कविता माझी
मनात अशी दाटते कविता माझी
अलगद शब्दांत साठते कविता माझी
मनातले ओठी आणजे कविता माझी
भेद मनातले सारे जाणते कविता माझी
बनुन श्वास तनामनात भिनते कविता माझी
शब्दसखा मी...सखी वाटते कविता माझी.

--शब्द्सखा!

कविता म्हणजे सोबतीण

शब्दांना सापडलेला मी म्हणजे कविता
शब्दांना आवडलेला मी म्हणजे कविता
भयाण रातीलाही काजव्याचं चमकणं म्हणजे कविता
अन पहाटेचं माझ्यासाठी क्षण्भर थबकणं म्हणजे कविता
कविता भिनलेली तनी मनी
कविता म्हणजे अर्धांगिनी..
कविता म्हणजे वसंताची सावली
कविता म्हणजे सोबतीण पावलोपावली...


--शब्दसखा!

कविता

अंधार गडद दाटता...
मी चक्रावतो...
कुठे जायचे?
कुणा शोधायचे?
जड पावलांना किती ओढायचे?
नजरेआड झालेल्या वाटा...
हरवलेले साखे सांगाती...
मी एकटा..
तीही एकटी......
या एकट्याला ती
अशी साथ देते..
कविता म्हणवत स्व:तला
शब्दांत माझ्या फ़ुलारुन येते

--शब्दसखा!

पुन्हा सजुन ये तू..

गहिर्‍या शांततेत या
मौन तुझे नी माझे
का असे ऐनवेळी बहरले?

हा दुरावा उगी का?
जाणुन जणू भेद मनीचे
तुझ्या पैजणांचे नाद झंकारले

हात हाती तुझा
आकाश चांदण्यांनी पेटले
श्वास गंधाने भारले

निरखुन तुला मी
नजरेत तुझ्या वीरुन जातो
होतो अताशा..अताशा सारे हारले

निखळला एक तारा...
तू मला मीळावी
त्याने हे उशिरा जाणले...

दव गाली तुझ्या...
रंग खुलुन आले
गंध प्राजक्ताचे भोवती दरवळले

रात सरली..
तरी मौन होते
नजरांनी नजरांना कित्येक इशारे केले

पुन्हा सजुन ये तू..
नजरेत विरुन जा तू..
जाताना मन हेलावुन गेले...

शब्द -- संदीप सुरळॆ

अस्तित्व

रात्र होता
तुझ्या साम्राज्याचा पाया मजबुत होतो
जगमगत्या जगाला
अगदी श्वासालाही कंप फ़ुटतो
हळुहळु तू गहिरा होत जातो
मलाही माझ्यापासुन हिरावुन घेतो
मी शोधतोच वाटा या काळोखात
पण महाकाय सावलीत तुझ्या हरवुन जातो
झाडं, पानं, फ़ुलं..
सारे सारे क्षणात हरवतात
दीवसभर फ़ुलांचे रस्ते
आता काटे रस्त्यावर दाटतात
सावलीही माझी मला सोडुन जाते
तीही तुझी आश्रीत होते

माझं अस्तित्व वीरु लागतं
नाईलाजाने तुझं अस्तित्व मान्य होतं
मीही मग थांबुन घेतो...
तुझ्या वीरण्याची वाट पाहतो...
शब्द -- संदीप सुरळॆ

बेनाम कवीता

बेनाम कवीता माझी
बेनाम राहणार आहे
कवीतेत तुच माझीया
तुला न ती सांगणार आहे
आले गेले कित्येक ऋतु
ओले, कोरडे शब्द झाले
शब्द माझे जगणार आहे
कवीता ही खुलणार आहे
कधि मी सांजवेडा
कधि मी उन्मुक्त झुला
मलाच शब्दात मी
आता मांडणार आहे
कधि रात...दीस कधि
सप्नातही मी जागणार आहे...
शब्दात मीच माझ्या
शब्दांस माझ्या मी उमगणर आहे..


--शब्द्सखा!

शब्द माझे

माझ्या भावनांचा
अविष्कार आहे
माझिया स्वप्नांचा
हा आकार आहे
शब्दांचा माझ्या
मला आधार आहे
शब्दात माझ्या
जीवनाचा सार आहे
शब्द माझे कधि
घोर प्रहार आहे
कधि प्रेमळ ते
अगदी हळवार आहे
शब्द माझे हे
माझाच अवतार आहे
मी अन शब्द माझे...एकतार आहे

--शब्दसखा!

दुपारी

अशाच एका भकास तापलेल्या दुपारी..

घरात उन्हं...दारात उन्हं..
जळलेली शरीरं..करपलेली मनं...
रस्त्याच्या कडेला रडणारं पोर
मातीला उगाचच चाटणार ढोर
वाळलेलं झाडं...वाळलेलं पान...
प्रत्येक जीवानं जपलेला त्राण..
डोळ्यात उभी कोरडीचा आसवं
रस्त्यावर दाटलेलं पाणी फ़सवं
जळालेली शेतं...जळालेली रानं..
पाखरांच्या ओठात उदास गाणं..
विहीरीत खोल काळे खडक..
पेटलेला सुर्य लालभडक...
दावणीची दावं तुटणारी...
वासरांची घरं सुटणारी
महाग पाणी...अश्रु स्वस्त...
Koradyaa आशांवर Koradiच भीस्त..
उन्हाचं तांडव पावलोपावली..
सावलीही आता शोधते सावली..
वावटळीनं घेतलेला तांबुस रंग..
झाडांची झालेली आखुड अंगं..
सुकलेले अंगण..सुकलेला पार...
सुकलेल्या शेतांचे मनावर वार...
जमीनींना रुतलेल्या खोल खोल भेगा..
भेगांनी घेतलेल्या झर्‍यांच्या जागा..
भयान रात्रींना अंधार गडप..
चांदण्यांचा पाऊस..कोरडीच सडक..
दूर कुठेतरी एक ढग आकाशात दिसतो..
म्हातारा नातवासमोर खोटंच हसतो..

शब्द --संदीप सुरळे

विसावा

नजरेत भाव तुझिया
नजरेत ठाव तुझिया

का छेडशी अशी मज?
नजरेत घाव तुझिया

नजरेस खेळवी तू
नजरेत डाव तुझिया

तू चोरशी अशी मज
नजरेत माव तुझिया

भिडतेस काळजाशी
नजरेत धाव तुझिया

घेतो जरा विसावा
नजरेत गाव तुझिया

--शब्द: संदीप

वाटा

पाहुनी मज का अताशा वळतात वाटा ?
ओळखीचा मी जरी का छळतात वाटा ?

मृगजळाचा मी शिकारी हे जाणतो मी
वास्तवाला पाहुनी या पळतात वाटा

सावल्याही पेटल्या का या पावसाळी ?
वाळवंटी दूर कोठे जळतात वाटा

पापण्यांनी पाझरावे का ऐनवेळी ?
आठवांना का तुझ्या गं कळतात वाटा ?

छेडता मी जोगियाला तू आठवावे
मैफ़लींना का तुझ्या ह्या मिळतात वाटा ?

चालण्याला मी अताशा सुरवात केली
मी क्षितीजा गाठले की खळतात वाटा

सावल्या

शब्द त्यांचे पाळती ना सावल्या या
चालता मी जाळती मज सावल्या या

वादळांना मी सहारा देत आलो
रात होता का पळाल्या सावल्या या ?

तू अशी का सांग झाली पाठमोरी
थांब थोडी शोधतो मी सावल्या या

का वसंती या उन्हांना जोर आला ?
पेटलेल्या पावसाळी सावल्या या

मी वदंता ही कुणाला ऐकवावी ?
आसर्‍याला आज आल्या सावल्या या

व्यास

कोण आले? हा कुणाचा भास आहे?
सांजवेळी ही कुणाची आस आहे?

मी भिकारी माझियाही आसवांचा
कोरडी ही पापण्यांची प्यास आहे

पारध्याला मी उगा का दोष देऊ?
हा गळ्याला नेहमीचा फ़ास आहे

बैसलो मी मैफ़लीला या तुझ्यारे
सांग साकी काय आता खास आहे?

मावळावे का तुझ्या ही आठवांनी
वाटते हा शेवटाचा श्वास आहे

ढाळसी का आसवांना या तुझ्या तू
ओंजळीत तुझ्या अता मधुमास आहे

माझिया का या शब्दांना भाव यावा?
मी कुठे बोललो ’मी व्यास आहे’ ?