कातरवेळ.....पुन्हा येईपर्यंत

पुन्हा आली कातरवेळ,
पुन्हा आठवणींचं जाळं पसरु लागलं सभोवार...
पुन्हा एक नवी मैफ़ल सजेल आता आठवांची
,पुन्हा एकदा मी माझा उरणार नाही...
पुन्हा एकदा मी एकटा ठरणार नाही...
गेलेले कित्येक क्षण आता पुन्हा भेटतील मला...
आणी हो, या प्रत्येक क्षणाबरोबर तू आठवशील...
तुझं हसणं आठवेल, तुझं रुसणं आठवेल..
तुझं असणं आठवेल, तुझं नसणं आठवेल...
तू गायलेल्या ओळी आठवतील....
ती रातराणी आठवेल, तो प्राजक्तही आठवेल...
ती गुलाबी सांज, ते सागर किनारे आठवतील....
तुझं लाजणं आठवेल,
माझ्या मिठीत तुझं हळुवार थिजणं आठवेल....
सारं सारं आता एक एक करुन डोळ्यासमोर येईल..
तो चंद्र ज्याला बघुन तू काही निरोप पाठवायचीस माझ्यासाठी
तोही आठवेल आता...
ए, तू आजही तसेच निरोप धाडतेस का गं माझ्यासाठी?
सांग ना...बघं, चंद्र तर कधिचा आला आहे....
......
ठाऊक असतं मनाला,
या जाळ्यात आता मी गुंतलो जाणार,
वेढलो जाणार पुरता....
अगदी स्व:तलाही विसरेल इतका...
पण तरीही वाटतं,
वेढुन घ्यावं स्व:तला या आठवणींच्या जाळ्यात....
कातरवेळ पुन्हा येईपर्यंत.....

दगड

कधि पाऊस झेलायचा, कधि वादळ पेलायचा
कधि उन्हात तळपायचा, कधि थंडीत कुडकुडायचा .... तो होता एक दगड!
एकलाच होता, त्याला वाटायचं आहोत आपण एकलेच...
सवय करुन घेतली त्याने एकलेपणाची.
तो आणी त्याचं एकलेपण जगायचे एकमेकाची साथ देतज
गात राहुनही जगापासुन खुप खुप दूर
कधि वाटलं नाही जगात यावं...
थोडसं जगासारखं जगावं...
जगाला एका वेगळ्या नजरेनं बघावं...
आनंद मानलेला त्यानं त्याच्या आयुष्यात...कारण तो होता एक दगड!
एक दिवस खुप वेगळा उगवला.
कुठुनतरी कुणीतरी आलं...अगदी अचानक...
तो चक्रावला जरासा, इतक्या आनंदाची सवय नव्हती कधि त्याला.
ते कुणीतरी त्याला फ़ुलं वाहुन गेलं...
ते कुणीतरी त्याला नजर भरुन पाहुन गेलं...
जग अचानक बदललं..
उन, वारा, पाऊस आता त्याला आपलेसे वाटू लागले...
कुणीतरी आपल्याला मानतं म्हणुन दगडालाही पंख फ़ुटु लागले...
असेच दिवस सरत चालले..
.त्या दगडाला कुणीतरी देवपण दिलं..
.कुणीतरी त्याचं एकलेपण नेलं...सारं कसं अचानक झालं...
पुन्हा एक दिवस वेगळा उगवलाज्यानं देवपण दिलं तेच त्याला म्हटलं,
"तू आहेस एक दगड..."
"तू आहेस एक दगड..."
शब्द - संदीप सुरळॆ

हाक - गझल!

आसवांच्या पावसाला हाक देतो
आठवांच्या पाखराला हाक देतो

गायली तू माझिया गझलेस जेथे
मी पुन्हा त्या मैफलीला हाक देतो

काय होते सांग नाते आपले ते?
कोण माझे मी कुणाला हाक देतो?

गाव माझा दूर ना, मी दूर आहे
थांबलेल्या पावलाला हाक देतो

रात होता, गर्द मी काळोख होतो
एकटा मी हुंदक्याला हाक देतो

वाटते की आवरावा हा पसारा
संपताना संपण्याला हाक देतो?

शब्द - संदीप सुरळे