या आसवांस माझ्या

या आसवांस माझ्या... तू साहतेस का गं?
अन आठवांत माझ्या... तू राहतेस का गं?

हरवून सूर गेले...मज सांजवेळ येता
या मैफ़लीत माझ्या... तू नाहतेस का गं?

होतेस का पुजारी... अन फूल ही कधी तू
तुज मंदिरात माझ्या... तू वाहतेस का गं?

आता उरात झरती... या वेदना सदाच्या
या वेदनेस माझ्या... तू चाहतेस का गं?

तू दूर दूर जाता... बघ निखळले सहारे
पडक्या घरास माझ्या... तू पाहतेस का गं?

--शब्द्सखा!

वाटे जरा जगावे

तुषारदा तुझ्या या "गझलेपुढे" माझे शब्द काही नाही.मी थोडंसं लिहीलं आहे. तुझ्या गझलेला रिप्ल्याय म्हणुन नाही. सुचलं म्हणुन लिहीलं.

वाटे जरा जगावे
सारीच बंद दारे

कोणास कोण येथे?
कोणीच ना सहारे

का पावसात आता
हे तापती निखारे?

माझे न दु:ख काही
डोळ्यात आसरा रे?

"माझाच तू", खरे हे
खोटेच सांगना रे

खोटेच भास माझे
पाहून आरसा रे

--शब्द्सखा!

बाग

फ़ूलही कसे सलते उरात आहे?

वादळे कशी या अंतरात आहे?

वाट संपता माझा प्रवास होतो

पावले कशी वेड्या भरात आहे?

चुकवुनी रस्ते निघुन मरण गेले

वेदना अशा माझ्या घरात आहे

सोसतो असा आजकाल मज मी

आसवे बरी साध्या दरात आहे

वाळवंट रे हे बाग का खुलावी?

मेघ त्या कितीसे अंबरात आहे?

चांदणे ढळाले एकटा पुन्हा मी

काजळी कशी ही चांदरात आहे?

--शब्द्सखा!

तुझी आठवण येता - चारोळ्या!

तुझी आठवण येता
नजर उगाचचं भिरभिरते
जुन्या आठवांना आठवुन
पापणी क्षणभर पुन्हा डबडबते

--शब्द्सखा!

तुझी आठवण येता
शब्द बेभान होतात
लेखणीचा पाऊस
डायरीची पानं रान होतात

--शब्द्सखा!

तुझी आठवण येता
मन सैरभैर होतं
तुझ्या आठवणी विसरुन
तुझ्या अवतीभवती भिरभिरतं

--शब्द्सखा!

तुझी आठवण येता
माझे सारे क्षण रिते वाटतात
प्रत्येक क्षणात माझ्या
फ़क्त तुझ्या आठवणी दाटतात

--शब्द्सखा!

सुरांनो..

कुठे रे दडलात सुरांनो?

आज केविलवाणे झालात सुरांनो?

छेडल्या ज्या तारा आजवर

घायाळ त्यांनीच आज केले सुरांनो?

मैफ़ली सजतील...उठतील...

शब्दांसाठी माझिया, तुम्ही जगायचे सुरांनो!

--शब्द्सखा!

मी प्रसिद्ध होत गेलो

वाचाळले कोण...मी प्रसिद्ध होत गेलो
तू कुजबुजला फ़क्त..मी ग्वाही देत गेलो

तू घरात तुझिया कितीही भाषणे केली
आवाज उंच माझा मी घोषणा देत आलो

म्हणशील मज बिचारा दयेने कधितरी तू
सुकवुन आसवे सारीच मी आता येथ आलो

पाहू नको मला तू..मी गुन्हेगार नाही
अंत अद्याप न झाला...मी सुरवात होत आलो

फ़ुलांना खुडण्याचा इथला धर्म निराळा आहे
होतो प्रभात कधी आता होऊन रात आलो

--संदीप सुरळे

आता उपाव नाही

येथे कफ़न देऊनी त्यांनी मला सजवले
"पेटुनी उठ"ल्या परीच आता उपाव नाही

ते समजतील स्व:तला भले ते थोर होते
मी चोर नाही हे उमजण्याखेरीच उपाव नाही

मी कधीचा होतो शब्दांत या दंगलेला
आता रणात आलो...आता उपाव नाही

का म्यानात वितळल्या तलवारी गंजलेल्या
आता आमनेसामने...आता उपाव नाही

--संदीप सुरळे

पसंत मजला असे मरणे नाही

वारा भरला शिडात ज्या
गलबत ते परतणे नाही


शोधेल किनारा ते कसेही
अर्ध्यात त्याचे उतरणे नाही

वादळा कापताना संपेल ते
लपुन बसुन इथे उरणे नाही

लाटांस तोंड देणे गैर कसले?
असेल ती मोठी...डरणे नाही

मी सहज मरावे असे वाटले का?
पसंत मजला असे मरणे नाही

--संदीप सुरळे

मी धृव आहे....

असशील तू चंद्र रातींना खुलणारा..
अंधार्‍या राती चमकणारा..
तुझ्या रुपाने खुलवशील तू काळोख क्षणभर..
सगळे बघतीलही तुला..क्षणभर.

तू नेहमीच नितळ दिसशील
कधीकधी बिच्चारा होऊन दडुनही बसशील
ओवाळतील तुला सगळेच
मानतीलही तुला सगळेच..

पण तू..
तू त्या सुर्यामुळे चमकतोस
सुर्य आहे म्हणुन तुझी रोशनी आहे
त्याच्याचमुळे तुझी निशाणी आहे..

मी आहे लहानगा.
दूर दूर आकाशी...
एखाद्या ठिपक्यासारखा वावरणारा..

पण मी...
मी अटळ आहे...
मी अढळ आहे..
मी स्वयंप्रकाशी आहे..
मी धृव आहे....

--शब्द्सखा!

आगाज

का शब्द मौन हे मौन का आवाज होते?
माझ्यासवे निघाले जळाया राज होते

का कत्तले तयांनी माझी हजारो केली?
माझे इथे कितीक झाले आगाज होते?

"या" वादळास मी कैकदा बोलेल आता
सारेच बोल इथले फ़क्त हवाबाज होते

येथे उगा कशाला अता मी भीक मागू?
माझेच शब्द् श्रिमंत माझा साज होते