माझिया वेदनांना कळाया लागलो मी

माझिया वेदनांना कळाया लागलो मी
होउनी रात आता ढळाया लागलो मी

सावल्या दाटल्या का अशा या पेटताना
राहुनी मौन आता जळाया लागलो मी

बोलुनी श्वास गेले ’पुरे हे खेळ आता’
माझियापासुनी अन पळाया लागलो मी

जाहले ओस सारे पुन्हा मी कोरडा रे
माझिया आसवांना छळाया लागलो मी

--शब्द्सखा!

आई गं!

आई गं!
आठवत असशील मला
तुळशीपाशी दिवा लावताना
देवाजवळ शुभंकरोती म्हणताना
भल्या सकाळी अंगणात सडा घालताना
गोड धोड बनवल्यावर हट्ट करायला मी नसताना
ओवाळण्यासाठी भाऊ जवळ नाही म्हणून बहिण रडताना
तुला समजावताना बाबांचाही आवाज नकळतपणे कापरा होताना
दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी परतणारी इतरांची मुलं पाहताना
एखादी आई आपल्या बाळासाठी अंगाई गाताना
लहाणपणी दाखवलेला चांदोबा बघताना
बाजारात गेल्यावर खाऊ घेताना
फ़ोनवर बोलून झाल्यावर
अश्रू ढाळताना
आई गं!
--शब्द्सखा!

आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

शब्दहो आज तुम्ही उडून जा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

'विसावायचे मज सावलीत आई
निजायचे पुन्हा ऐकायची अंगाई'
शब्द हे माझे तीला ऐकवा रे
आईस माझ्या माझा निरोप द्या रे....

समई जळते जरी, देवघर पोरके
डोळ्यात दाटते आई,खळकन ओघळते
ममतेस तिचिया गातात आसवे रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

जाहली सांज पाखरे निघाली घराला
उब मायेची गाईच्या पाडसाला
उंबरा माझ्या घराचा पोरका रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

अंगणात जाता जरा संथ व्हा रे
'शुभंकरोती’ गाता तुम्ही गुणगुणा रे
ममता मायेची घेउनी या रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

ढाळेल आसवे ती ऐकुनी बोल माझे
काळजास तिचीया भले जाणतो मी
शब्दहो शेवटी तुम्ही मौन व्हा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

शब्दहो आज तुम्ही उडून जा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

--शब्दसखा!

कुठे असशील तू?

कधीचा मौन मी
तुझ्या आठवणींशी पुन्हा बोलका होऊ लागतो
गर्भश्रिमंत शांततेतही
तुझ्या आठवणींचा गलका होऊ लागतो
आभाळ भरल्यागत मन भरुन येतं
डोळ्यात पाणी डबडबत..अडखळत..
मन तळमळत..तडफ़डत..
तुझ्या आठवणींशी झगडतं...
कातरवेळ..अजुन गहिरी होऊ लागते..
तसे तुझे भास गडद होत जातात...
मी विरत जातो मंद काळोखात... संथ होत होत
स्व:तला शोधू पाहतो...माझ्यात...तुझ्यात..
कुठे असेल का मी?
की तुच फ़क्त सगळीकडे?
कुठे असशील तू?
माझी असलीस तरीही....कुठे असशील तू?
--शब्द्सखा!

इतुकेच आज झाले

इतुकेच आज झाले सारे कळून आले
का दु:ख अंतरीचे हे भळभळून आले

झाले नको नकोसे होते पुन्हा पुन्हा जे
ते स्वप्न का अताशा मागे वळून आले?

होऊन वागलो मी माळी तुझ्या महाली
केसूंत फ़ूल तुझिया ते दरवळून आले

माझ्यात दंगलेलो झिंगून लास होतो
झाली पहाट ना अन तारे ढळून आले

मी जिंकलो जरीही उरलो किती कितीसा?
माझेच श्वास जेव्हा मजला छळून आले

ही वाहवा निघाली आता नको तयांची
सांगू कसे कुणाला मज हळहळून आले

--शब्द्सखा...१५.१०.०८