तुम्हे ढुंढ रहा है प्यार

पतंग आणि दोरी..एक अनोखं नातं. अपुर्ण एकमेकांशिवाय दोघंही.
दूर दूर उंच आभाळात स्वैरपणे विहारणारा पतंग अन त्याच्यासंगे मोठ्या दिमाखात मिरवणारी दोरी. तसं पाहीलं तर पतंगामुळे दोरी नसते, तर दोरीमुळे पतंग असतो. दोरी म्हणजे बंधन असतं पतंगाचं. त्याचं हसणं, रडणं, असणं, नसणं, वादळात हेलकावणं, कधी वार्‍यासोबत डोलणं सारं सारं या दोरीसोबत. पतंगाचा प्राण दोरीत विसावलेला. असं हे अतूट नातं...अतूट बंधन.
एक दिवस असेच दोघं मस्तीत डूलत होते. पतंग आभाळातून दोरीला न्याहाळायचा. दोरी आपली लाजायची, पतंगाला इतकं उंच पाहून हरपून जायची. आणि आपली गाठ याच्यासोबतच जुळलेली आहे हे आठवून मनातल्या मनात हजारदा त्याला वरायची. मध्येच एखादा हवेचा झोका यायचा पतंग थोडा खाली झुकून दोरीला स्पर्शायचा...दोरी गुलाबी होऊन जायची. रंगात यायची. वार्‍यावर तीही डूलायची मग.
असा हा डाव रंगत असतानाच आभाळ भरून आलं. दोरी अन पतंगाचं घर असणार्‍या निळ्या आकाश ढगांनी भरुन आलं. वारा उधळून आला. झाडं वार्‍याशी भांडायला लागली. फ़ूलं धूळीनं माखली गेली. पालापाचोळा आभाळापर्यंत जाऊन घिरट्या घालायला लागला. विजांनी थैमान घातलं. क्षणापुर्वीचं सुंदर जग बघता बघता क्रूर झालं.
वादळात पतंग स्व:तला कसातरी सावरत होता. दोरीची नाजूक कुडी पतंगाला जमेल तसा आधार देत होती. सारं सारं सहन करुन पतंग एका ठिकाणी स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरुन दोरीला हेलकावे बसणार नाहीत. दोरीसाठी त्याचाही जीव तुटू लागला. इतक्यात वार्‍याच्या एका जोरदार तडाख्याने पतंगालं भिरकावलं. पतंग अन दोरीची गाठ सुटली. हळूहळू दोरी खाली कोसळू लागली. पतंगापासून दूर दूर चालली. इतका वेळ अतूट असणारं बंधन एका क्षणात तूटलं गेलं. अंधारल्या डोळ्यांनी दोरीने अखेरचं पतंगाला पाहून घेतलं आणि शेवटी भुईवर शांतपणे निजून तीने डोळे मिटले.
पतंगाने दोरीसाठी आक्रोश केले. हजार आवाज दिले त्याने तिला. त्या वादळात त्याचे आवाज विरुन गेले. अश्रू ढाळले त्याने. पण दोरी मात्र कधीच स्थितप्रज्ञ झाली होती.
इतका वेळ विहारणारा पतंग आता फ़डफ़डायला लागला होता. दोरीशिवाय खचलेला पतंग तिच्या जाण्यानेच निम्मा अर्धा संपला होता. इतका वेळ आभाळाला पंखांखाली घेणार्या पतंगाचे पंख गळून पडले होते.
वादळ वार्‍याला सोसत, वारा नेईल तिकडे तो जाणं आता त्याच्या नशिबी होतं.
नजर अजुनही दोरीवरच होती .
दोरीनंतर शेवट तर आपलाही आहेच हे कळुन चुकलं त्याला. आपण दोरीला वाचवू शकलो नाही ही खंत मनाला बोचत होती.
वार्याच्या तडाख्याने कधी उंच आभाळात जायचा कधी कोसळायचा. त्यातच पावसाने जोर धरला. वारा आणि पाउस यांनी एकत्रच त्याच्यावर वार सुरु केले. कसा टिकणार होता तो?

बरेच दिवस झाले. कदाचित बरीच झुंज दिली असेल त्याने. अन आज..आज तो कुठेतरी एखाद्या माळरानावर निपचीत पडला असेल जिर्ण झालेला. फ़ाटलेला. किंवा एखद्या काट्याच्या झाडामध्ये अडकलेला असेल शेवटच्या घटका मोजत..दोरीला आठवत.
दोरी एका क्षणात निघून गेली. पण तिच्यामागे पतंगही भरकटलाच.
बंधन तुटलं..पतंग बेबंध झाला. आणि अशा पतंगाला वादळ रों रों करत घेऊन गेलं.
कदाचित लवकरच दोघांची भेट होईल एका शांत ठिकाणी जिथं पुन्हा दोघांचं जग असेल.
पण तोवर...तोवर पतंगाला सोसायचंच आहे.

तसं कुणावाचून कुणाचं काही अडत नाही. वेळ थांबत नाही. हे खरं.
दोरीशीवाय जगायचा प्रयत्न पतंगानेही केलाच. पण कदाचित पतंग सर्वसामान्यांमध्ये मोडला नाही म्हणून दोरीशिवायचं जगणंही त्याला जमलं नाही.
आपलंही आयुष्य या पतंग-दोरी सारखं नसू शकत का?
आपल्यालाही आपलं कुणीतरी खुप जवळचं अचानकपणे सोडून जातं. जाणारी व्यक्ती निघून जाते.. सुटते. पण जाताना मात्र खुप सार्‍या वेदना देऊन जाते. आठवणी मागे ठेउन जाते.
अन मग आपल्या वाटेला येतं ते त्या आठवणींना कुरवाळत बसण. त्या विरहात जळणं.
अहं..हे लादलेलं नसतं. पण का कुणास ठाऊक आपणच ते लादून घेतो स्व:तवर.
ते रुसवे, फ़ुगवे. त्या सांजवेळी. प्रत्येक श्वासागणीक काढलेल्या त्या आठवणी. ती स्वप्नांची बांधलेली घरं.
सारं सारं अर्धवट राहून जातं. अधुरी राहिलेली वचनं, प्रेमात घेतलेल्या आणाभाका. ही सगळी कोरी चित्र एकट्याने कशी रंगवायची.
दिवसामागून दिवस येतात..निघून जातात. आपण मात्र शुन्य असतो. भावनाशुन्य! सगळ्या भावना त्या एका क्षणातच विरुन गेलेल्या असतात. पुरते रुक्ष झालेलो असतो आपण.
पुन्हा तशी सांज कधी खुलत नाही. फ़ुलांना गंध येत नाही.
पाऊस कोसळत राहतो पण आपण भिजत नाही. भिजतं ते फ़क्त तन. मनातून मात्र कोरडेच राहतो आपण .
आठ्वणींना आठवत एक एक क्षण कसातरी पुढे ढकलायचा. चालत रहायचं. कुठे जायचं ते ठाऊक नाही. कुठवरं चालायचं हिशोब नाही. का चालायचं ठरलेलं नाही. इतकच माहीत की शेवटापर्यंत जायचं.
सारं असून काहीच नसल्याचं जाणवत राहतं, आणि सगळं असलं तरी त्या कुणातरीशिवाय ते अपुर्ण वाटत. जीवन अपुर्ण वाटतं.

तुझ्या माझ्याबाबतीतही असं काहिसं होऊ शकतं ना?
कदाचित तू मला सोडुन जाशील. मी मागे उरेल एकटाच.
पण एक बरं होईल की तू मला बघू शकणार नाहीस. नाहीतर जगण्याला कफ़ल्लक झालेल्या मला पाहताना तुझं मन रडलं असतं. कोसळून गेली असतीस तुच.

एकटं बरेच जण जगतात. पण एकाकीपणात जगायला धैर्य लागतं.
मग खोटं खोटं हसू चेहर्‍यावर ओढून जगणं हा शाप ठरतो. कुठेही नसून उगाचच सगळ्यांत असावं लागतं.
मनाची तडप, तडफ़ड, रुदण कुणाला दाखवता येत नाही. कुठं ते व्यक्त होत नाही.
अबोल राहून सगळं सोसायचं असतं. हळूहळू तेही जमू लागतं.
आभासांचं जाळ पसरु लागतं सभोवार. नजर उगीचच त्या जुन्या वाटेभर भिरभिरते.
जुने क्षण आठवण होऊन एकत्र येतात. त्यांच एक वलय बनतं आपल्याभोवती. त्या वलयातच आपण जगणं पसंत करतो मग. जगापासून हळूहळू परके होऊ लागतो.
अवघड जातं हे सारं सारं सहन करणं. एक वेदना दिनरात, प्रत्येक क्षणी काळजात ठसठसत राहते.
ही वेदना भळभळून वाहत नाही, अन खपलीही धरत नाही. ती अशीच चिघळत राहते. शेवटपर्यंत.

ते गाणं आहे बघ एक,

"अब यादों के काटे इस दिल मे चुभते है,
ना दर्द ठहरता है, ना आसू रुकते है,
तुम्हे ढुंढ रहा है प्यार..हम कैसे करे इकरार ,
के हा तुम चले गये..."

हे गाणं समजलं तर सगळं समजलं. या गाण्यातच सगळं आलं.

--शब्द्सखा!


( ’चिठ्ठी ना कोई संदेश...’ लिहून खो दिल्याबद्दल सईचे आभार.)

4 प्रतिसाद:

devrai said...

खुपच सुन्दर्.....पतंगाच उदाहरण आवडल

Anonymous said...

व्वा तोड़लस रे मित्रा...

किती सुंदर शब्दात तू मनातली भावना व्यक्त केलीस..जे मी जगते आहे तेच तू सांगितले...अप्रतिम रे शब्दसख्या...

आशा जोगळेकर said...

फारच छान लिहिल आहेस.

*** Darshana *** said...

khup chaan...