कधी कधी मन उधाण वारा

कधी कधी मन उधाण वारा
भांबावते कधी कधी सैरावैरा
तडफ़डते कधी क्षीतिजावर ते
कोण कुठे अन कसा निवारा?

शोधू पहातो मीच मला मग
अवतीभवती तुझाच दरवळ
तुझ्या मिठीची शाल ओढुनी
श्वासांमध्ये तुझाच परिमळ

अलगद येते स्वप्ने लेवुनी
गुलाब होते रात्र लाजरी
बावरते तू सावरते तू
खुलुन येते मिठी साजरी

सये,
मन लाट होताना
तू किनारा होऊन येतेस
पेटलेल्या या वादळाला
नकळत शमवून नेतेस
--शब्द्सखा!

प्रेम म्हणजे एक महोत्सव!

प्रेम म्हणजे विश्वास?
की प्रेम म्हणजे समर्पण?
राधा की मीरा?
प्रेम म्हणजे जगापासून दूर जाणं? अगदी स्व:तपासूनही?
प्रेमात जगणं, घडीघडीला प्रेम जगणं?
प्रेमात विलीन होऊन जाणं?
हुश्श्श्श.....एका मिनीटात कितीतरी छोट्या छोट्या प्रेमाच्या व्याख्या समोर आल्या नाही?
अर्थात या माझ्यासारख्या एखाद्या पामरानं मांडलेल्या साध्या शब्दांमधल्या प्रेमाबद्दलच्या व्याख्या.

एखादा विचारवतं असेल तर तो म्हणेल,
" प्रत्येक पावलानं दुसर्‍या पावलाला पावलागणिक साद घालत आदिपासून अनादीपर्यंत केलेला प्रवास म्हणजे प्रेम!"

प्रत्येकाच्या दृष्टीने प्रेम म्हणजे कदाचित काहीतरी वेगळच असेल.
पण अनुभुती एकच. Same feelings!

कुणी शब्दातून आपलं प्रेम व्यक्त करेल, कुणी संगीतातून, कुणी मनातच ठेवेल, तर कुणी फ़क्त नजरेनं.
ती गोष्ट माहित आहे ना भुंग्याची. संध्याकाळ होताना ते स्व:तला फ़ुलामध्येच हरवून घेतं प्रेमाची सीमा पार करुन. हेही प्रेमच.

कितीही नाही म्हटलं तरी आपापल्या परिनं, जसं जमेल तसं प्रत्येकजण प्रेम करेल हे मात्र चौकस!

मी? माझं प्रेम?
मीही असाच एक तुमच्यासारखा साधा, प्रेमाच्या साध्या व्याख्या करणारा प्रियकर.
प्रेम म्हणजे काय ते अद्याप उलगडलं नाही तितकसं. वरती जे काही म्हटलो ते असतं काहो प्रेम?
आता विचारावं तरी कुणाला? प्रत्येकाचं प्रेम वेगळंच.
माझंही तसचं.
माझंही प्रेम वेगळच.

अवखळपणे, वळणं घेत घेत वाहणार्‍या नदिसारखी ती.. तिला मी प्रेम म्हणतो.
अल्लड होऊन वार्‍यावरती दरवळणारा सुगंध ती ..तिला मी प्रेम म्हणतो.
आकाशाचं होऊन आकाशात भिरभिरणार्‍या निरागस पाखरासारखी ती..तिला मी प्रेम म्हणतो.
पावसाची सर कोसळताना मनात चलबिचल घडवून आणणा‍री आठवण ती..तिला मी प्रेम म्हणतो.
डोळे मिटताना स्वप्न बनून रात्रींना चमचमणारी ती..तिला मी प्रेम म्हणतो.

त्या फ़ुलपाखरामागं धावताना, त्या पाखरासंगं उंच उंच उडताना, त्या आठवणींत भिजताना माझं प्रेम असं खुलत जातं.
अन मग या सगळ्यांना सारखं सारखं प्रेम वाटताना माझं मात्र प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं.

हा दरवळ जपायचा आहे मला, तिचा अल्लडपणा, तिच्या आठवणी, ती स्वप्न सारं सारं जपायचं आहे मला. तिच्यासाठी घडीघडीला.
कदाचीत हेच प्रेम असेल.

तिचं हसू, तिचं असणं, तिचं भिरभिरणं, तिचं माझ्या मनावर अधिराज्य कदाचित हेच माझं प्रेम असेल.
हेच प्रेम जपायचं आहे मला.

तिला जपायचं आहे मला. माझ्यासाठी आयुष्यभर.

खरंच! प्रेम म्हणजे एक महोत्सव असतो आयुष्यभर चालणारा!
हा महोत्सव खुलवायचा आहे मला असाच प्रत्येक घडीला.

कृष्णविवर..खोल अतिखोल!

दूर दूर अंतराळात
एक ठिपका आहे..इवलासा
अगदी काळाकभिन्न राक्षस वाटणारा
कुरूप इतका की प्रकाशानंही दूर रहावं
काय इतकं साठलं असेल त्याच्या अंतरात?
का इतकं दूर गेला असेल तो?
की चंद्रतारेच त्याच्यापासून दूर राहत असतील?
त्याला नक्की कसली ओढ असेल?
एखाद्या चंद्रानं त्याचीही परिक्रमा करावी?
रात्रीच्या अंधारात अंधार होऊन हरवताना,
त्यानंही कुणासाठीतरी लुकलुकावं?
हजार प्रश्न असतील असे...
जरासं डोकावून बघावं म्हटलं गाभ्यात,
पण पुन्हा आठवलं..हे तर कृष्णविवर..खोल अतिखोल!
मलाही ओढून घेईल आतमध्ये..
किती वेदना?
किती दु:ख?
आणि शेवटी अंत..
पण कुठवर?
एक ना एक दिवस,
त्याचं महाकाय गुरुत्वाकर्षण भारी पडेल असं वाटतंय...
आणि मग ओढला जाईल मी..
खोल खोल खोल..
कुठवर ते माहीत नाही....


दोघांमधील अंतर जपायचा प्रयत्न करतोय
पण अंतर कमी होत चाललंय आजकाल..

--शब्द्सखा!

माझिया वेदनांना कळाया लागलो मी

माझिया वेदनांना कळाया लागलो मी
होउनी रात आता ढळाया लागलो मी

सावल्या दाटल्या का अशा या पेटताना
राहुनी मौन आता जळाया लागलो मी

बोलुनी श्वास गेले ’पुरे हे खेळ आता’
माझियापासुनी अन पळाया लागलो मी

जाहले ओस सारे पुन्हा मी कोरडा रे
माझिया आसवांना छळाया लागलो मी

--शब्द्सखा!

आई गं!

आई गं!
आठवत असशील मला
तुळशीपाशी दिवा लावताना
देवाजवळ शुभंकरोती म्हणताना
भल्या सकाळी अंगणात सडा घालताना
गोड धोड बनवल्यावर हट्ट करायला मी नसताना
ओवाळण्यासाठी भाऊ जवळ नाही म्हणून बहिण रडताना
तुला समजावताना बाबांचाही आवाज नकळतपणे कापरा होताना
दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी परतणारी इतरांची मुलं पाहताना
एखादी आई आपल्या बाळासाठी अंगाई गाताना
लहाणपणी दाखवलेला चांदोबा बघताना
बाजारात गेल्यावर खाऊ घेताना
फ़ोनवर बोलून झाल्यावर
अश्रू ढाळताना
आई गं!
--शब्द्सखा!

आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

शब्दहो आज तुम्ही उडून जा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

'विसावायचे मज सावलीत आई
निजायचे पुन्हा ऐकायची अंगाई'
शब्द हे माझे तीला ऐकवा रे
आईस माझ्या माझा निरोप द्या रे....

समई जळते जरी, देवघर पोरके
डोळ्यात दाटते आई,खळकन ओघळते
ममतेस तिचिया गातात आसवे रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

जाहली सांज पाखरे निघाली घराला
उब मायेची गाईच्या पाडसाला
उंबरा माझ्या घराचा पोरका रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

अंगणात जाता जरा संथ व्हा रे
'शुभंकरोती’ गाता तुम्ही गुणगुणा रे
ममता मायेची घेउनी या रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

ढाळेल आसवे ती ऐकुनी बोल माझे
काळजास तिचीया भले जाणतो मी
शब्दहो शेवटी तुम्ही मौन व्हा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

शब्दहो आज तुम्ही उडून जा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

--शब्दसखा!

कुठे असशील तू?

कधीचा मौन मी
तुझ्या आठवणींशी पुन्हा बोलका होऊ लागतो
गर्भश्रिमंत शांततेतही
तुझ्या आठवणींचा गलका होऊ लागतो
आभाळ भरल्यागत मन भरुन येतं
डोळ्यात पाणी डबडबत..अडखळत..
मन तळमळत..तडफ़डत..
तुझ्या आठवणींशी झगडतं...
कातरवेळ..अजुन गहिरी होऊ लागते..
तसे तुझे भास गडद होत जातात...
मी विरत जातो मंद काळोखात... संथ होत होत
स्व:तला शोधू पाहतो...माझ्यात...तुझ्यात..
कुठे असेल का मी?
की तुच फ़क्त सगळीकडे?
कुठे असशील तू?
माझी असलीस तरीही....कुठे असशील तू?
--शब्द्सखा!

इतुकेच आज झाले

इतुकेच आज झाले सारे कळून आले
का दु:ख अंतरीचे हे भळभळून आले

झाले नको नकोसे होते पुन्हा पुन्हा जे
ते स्वप्न का अताशा मागे वळून आले?

होऊन वागलो मी माळी तुझ्या महाली
केसूंत फ़ूल तुझिया ते दरवळून आले

माझ्यात दंगलेलो झिंगून लास होतो
झाली पहाट ना अन तारे ढळून आले

मी जिंकलो जरीही उरलो किती कितीसा?
माझेच श्वास जेव्हा मजला छळून आले

ही वाहवा निघाली आता नको तयांची
सांगू कसे कुणाला मज हळहळून आले

--शब्द्सखा...१५.१०.०८

वरात

कुठलेच दु:ख आता माझ्या घरात नाही
काहीच आज 'तसले' उरले उरात नाही

माळून चांदण्यांना तू दूर दूर गेली
हरवून चांद गेला तो अंबरात नाही

वाटा कधीच सार्‍या इथल्या गळून गेल्या
पाऊल थांबलेले आता भरात नाही?

मागू नको मला तू आता उधार काही
झालो फ़कीर तुजविण तू अंतरात नाही

मी जिंकलेच असते इवल्या दिशांस दाही
का ओढ या फ़ुलाची त्या भ्रमरात नाही?

घे तू..रडून घे तू मी थांबणार नाही
अद्याप पाहिली तू असली वरात नाही

--शब्द्सखा!

तुम्हे ढुंढ रहा है प्यार

पतंग आणि दोरी..एक अनोखं नातं. अपुर्ण एकमेकांशिवाय दोघंही.
दूर दूर उंच आभाळात स्वैरपणे विहारणारा पतंग अन त्याच्यासंगे मोठ्या दिमाखात मिरवणारी दोरी. तसं पाहीलं तर पतंगामुळे दोरी नसते, तर दोरीमुळे पतंग असतो. दोरी म्हणजे बंधन असतं पतंगाचं. त्याचं हसणं, रडणं, असणं, नसणं, वादळात हेलकावणं, कधी वार्‍यासोबत डोलणं सारं सारं या दोरीसोबत. पतंगाचा प्राण दोरीत विसावलेला. असं हे अतूट नातं...अतूट बंधन.
एक दिवस असेच दोघं मस्तीत डूलत होते. पतंग आभाळातून दोरीला न्याहाळायचा. दोरी आपली लाजायची, पतंगाला इतकं उंच पाहून हरपून जायची. आणि आपली गाठ याच्यासोबतच जुळलेली आहे हे आठवून मनातल्या मनात हजारदा त्याला वरायची. मध्येच एखादा हवेचा झोका यायचा पतंग थोडा खाली झुकून दोरीला स्पर्शायचा...दोरी गुलाबी होऊन जायची. रंगात यायची. वार्‍यावर तीही डूलायची मग.
असा हा डाव रंगत असतानाच आभाळ भरून आलं. दोरी अन पतंगाचं घर असणार्‍या निळ्या आकाश ढगांनी भरुन आलं. वारा उधळून आला. झाडं वार्‍याशी भांडायला लागली. फ़ूलं धूळीनं माखली गेली. पालापाचोळा आभाळापर्यंत जाऊन घिरट्या घालायला लागला. विजांनी थैमान घातलं. क्षणापुर्वीचं सुंदर जग बघता बघता क्रूर झालं.
वादळात पतंग स्व:तला कसातरी सावरत होता. दोरीची नाजूक कुडी पतंगाला जमेल तसा आधार देत होती. सारं सारं सहन करुन पतंग एका ठिकाणी स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरुन दोरीला हेलकावे बसणार नाहीत. दोरीसाठी त्याचाही जीव तुटू लागला. इतक्यात वार्‍याच्या एका जोरदार तडाख्याने पतंगालं भिरकावलं. पतंग अन दोरीची गाठ सुटली. हळूहळू दोरी खाली कोसळू लागली. पतंगापासून दूर दूर चालली. इतका वेळ अतूट असणारं बंधन एका क्षणात तूटलं गेलं. अंधारल्या डोळ्यांनी दोरीने अखेरचं पतंगाला पाहून घेतलं आणि शेवटी भुईवर शांतपणे निजून तीने डोळे मिटले.
पतंगाने दोरीसाठी आक्रोश केले. हजार आवाज दिले त्याने तिला. त्या वादळात त्याचे आवाज विरुन गेले. अश्रू ढाळले त्याने. पण दोरी मात्र कधीच स्थितप्रज्ञ झाली होती.
इतका वेळ विहारणारा पतंग आता फ़डफ़डायला लागला होता. दोरीशिवाय खचलेला पतंग तिच्या जाण्यानेच निम्मा अर्धा संपला होता. इतका वेळ आभाळाला पंखांखाली घेणार्या पतंगाचे पंख गळून पडले होते.
वादळ वार्‍याला सोसत, वारा नेईल तिकडे तो जाणं आता त्याच्या नशिबी होतं.
नजर अजुनही दोरीवरच होती .
दोरीनंतर शेवट तर आपलाही आहेच हे कळुन चुकलं त्याला. आपण दोरीला वाचवू शकलो नाही ही खंत मनाला बोचत होती.
वार्याच्या तडाख्याने कधी उंच आभाळात जायचा कधी कोसळायचा. त्यातच पावसाने जोर धरला. वारा आणि पाउस यांनी एकत्रच त्याच्यावर वार सुरु केले. कसा टिकणार होता तो?

बरेच दिवस झाले. कदाचित बरीच झुंज दिली असेल त्याने. अन आज..आज तो कुठेतरी एखाद्या माळरानावर निपचीत पडला असेल जिर्ण झालेला. फ़ाटलेला. किंवा एखद्या काट्याच्या झाडामध्ये अडकलेला असेल शेवटच्या घटका मोजत..दोरीला आठवत.
दोरी एका क्षणात निघून गेली. पण तिच्यामागे पतंगही भरकटलाच.
बंधन तुटलं..पतंग बेबंध झाला. आणि अशा पतंगाला वादळ रों रों करत घेऊन गेलं.
कदाचित लवकरच दोघांची भेट होईल एका शांत ठिकाणी जिथं पुन्हा दोघांचं जग असेल.
पण तोवर...तोवर पतंगाला सोसायचंच आहे.

तसं कुणावाचून कुणाचं काही अडत नाही. वेळ थांबत नाही. हे खरं.
दोरीशीवाय जगायचा प्रयत्न पतंगानेही केलाच. पण कदाचित पतंग सर्वसामान्यांमध्ये मोडला नाही म्हणून दोरीशिवायचं जगणंही त्याला जमलं नाही.
आपलंही आयुष्य या पतंग-दोरी सारखं नसू शकत का?
आपल्यालाही आपलं कुणीतरी खुप जवळचं अचानकपणे सोडून जातं. जाणारी व्यक्ती निघून जाते.. सुटते. पण जाताना मात्र खुप सार्‍या वेदना देऊन जाते. आठवणी मागे ठेउन जाते.
अन मग आपल्या वाटेला येतं ते त्या आठवणींना कुरवाळत बसण. त्या विरहात जळणं.
अहं..हे लादलेलं नसतं. पण का कुणास ठाऊक आपणच ते लादून घेतो स्व:तवर.
ते रुसवे, फ़ुगवे. त्या सांजवेळी. प्रत्येक श्वासागणीक काढलेल्या त्या आठवणी. ती स्वप्नांची बांधलेली घरं.
सारं सारं अर्धवट राहून जातं. अधुरी राहिलेली वचनं, प्रेमात घेतलेल्या आणाभाका. ही सगळी कोरी चित्र एकट्याने कशी रंगवायची.
दिवसामागून दिवस येतात..निघून जातात. आपण मात्र शुन्य असतो. भावनाशुन्य! सगळ्या भावना त्या एका क्षणातच विरुन गेलेल्या असतात. पुरते रुक्ष झालेलो असतो आपण.
पुन्हा तशी सांज कधी खुलत नाही. फ़ुलांना गंध येत नाही.
पाऊस कोसळत राहतो पण आपण भिजत नाही. भिजतं ते फ़क्त तन. मनातून मात्र कोरडेच राहतो आपण .
आठ्वणींना आठवत एक एक क्षण कसातरी पुढे ढकलायचा. चालत रहायचं. कुठे जायचं ते ठाऊक नाही. कुठवरं चालायचं हिशोब नाही. का चालायचं ठरलेलं नाही. इतकच माहीत की शेवटापर्यंत जायचं.
सारं असून काहीच नसल्याचं जाणवत राहतं, आणि सगळं असलं तरी त्या कुणातरीशिवाय ते अपुर्ण वाटत. जीवन अपुर्ण वाटतं.

तुझ्या माझ्याबाबतीतही असं काहिसं होऊ शकतं ना?
कदाचित तू मला सोडुन जाशील. मी मागे उरेल एकटाच.
पण एक बरं होईल की तू मला बघू शकणार नाहीस. नाहीतर जगण्याला कफ़ल्लक झालेल्या मला पाहताना तुझं मन रडलं असतं. कोसळून गेली असतीस तुच.

एकटं बरेच जण जगतात. पण एकाकीपणात जगायला धैर्य लागतं.
मग खोटं खोटं हसू चेहर्‍यावर ओढून जगणं हा शाप ठरतो. कुठेही नसून उगाचच सगळ्यांत असावं लागतं.
मनाची तडप, तडफ़ड, रुदण कुणाला दाखवता येत नाही. कुठं ते व्यक्त होत नाही.
अबोल राहून सगळं सोसायचं असतं. हळूहळू तेही जमू लागतं.
आभासांचं जाळ पसरु लागतं सभोवार. नजर उगीचच त्या जुन्या वाटेभर भिरभिरते.
जुने क्षण आठवण होऊन एकत्र येतात. त्यांच एक वलय बनतं आपल्याभोवती. त्या वलयातच आपण जगणं पसंत करतो मग. जगापासून हळूहळू परके होऊ लागतो.
अवघड जातं हे सारं सारं सहन करणं. एक वेदना दिनरात, प्रत्येक क्षणी काळजात ठसठसत राहते.
ही वेदना भळभळून वाहत नाही, अन खपलीही धरत नाही. ती अशीच चिघळत राहते. शेवटपर्यंत.

ते गाणं आहे बघ एक,

"अब यादों के काटे इस दिल मे चुभते है,
ना दर्द ठहरता है, ना आसू रुकते है,
तुम्हे ढुंढ रहा है प्यार..हम कैसे करे इकरार ,
के हा तुम चले गये..."

हे गाणं समजलं तर सगळं समजलं. या गाण्यातच सगळं आलं.

--शब्द्सखा!


( ’चिठ्ठी ना कोई संदेश...’ लिहून खो दिल्याबद्दल सईचे आभार.)

'U, Me, Aur Hum' & Myself

आज पहाटे चार वाजता झोपूनही सकाळी आठ वाजता उठलो, तेही आळस न करता. आता यात काय ते विशेष? तसं विशेष काही नाही. पण माझ्यासारख्या आळशी प्राण्यासाठी लवकर उठणं(मग ते कधिही झोपेलेलो असेल तरी) हे जरा विषेशच. उशिरा उठण्याची सवय मी नित्यांनं जोपासत आलोय अगदी लहाणपनापासुन. असो.
आँफ़िसला जाण्यासाठी बाहेर पडलो तोच श्रीधर ने हात दाखवला, नरेंद्रच्या कारमधून जाण्यासाठी.आता आँफ़िसपर्यंत सवारी मिळणार म्हणून स्वारी खुश झाली, अर्थातच!
दिवस चांगला जातोय बहुतेक आजचा असं वाटायला लागलं.
काहि अपेक्षित गोष्टी अनपेक्षितपणे घडल्या तर तो आनंद काहि औरच, नाहि का?
आज शुक्रवार असल्यानं breakfast ला दांडी मारली होती. नाही नाही, शुक्रवारचा उपवास वगैरे असं काही नाही.(तसेही अमेरिकेत आल्यापासून कोणता उपवास कधी असतो हेही विसरायला झालंय)
आज आँफ़िसच्या बापाचं खाणार होतो, प्रत्येक शुक्रवारप्रमाणे.
तीन-चार मिनीटांच्या राईड नंतर आँफ़िसमध्ये उतरलो. Today narendraa was carrying b'fast for his team, so he invited me n Sridhar for b'fast. म्हटलं अरे नको, आँफ़िसकडून असतो b'fast मला प्रत्येक शुक्रवारी. आणि इथूनच चांगल्या वाटणार्‍या दिवसाची ’वाट’ लागायला सुरुवात झाली.
जर आता नरेंद्रने विचारलं की काय b'fast असतो तर काय सांगायचं. b'fast असतो तर खरा, पण काय असतो?
गेले सहा महिने प्रत्येक शुक्रवारी सकाळी b'fast म्हणून काय असत आँफ़िसकडून हेच विसरलो मी. अमेरिकेत आल्यापासून bread या categoryतला खाण्याचा एकमेव आवडता पदार्थ म्हणजे आंफ़िसमध्ये मिळणारा b'fast, आणि त्याचंच नाव विसरलो? वाटलं thank god Narendra didnt asked about, नाहितर मी प्रत्येक शुक्रवारी काय b'fast करतो हे मला आठवत नाही असे सांगून स्व:तच्या हाताने स्व:तची चव घालवून घेतली असती की काय?
कम्प्युटर समोर आलो आणी अगदि नेटानं विचार सुरु केला की काय b'fast असतो आज? गेले सहा महिने तोच b'fast प्रत्येक शुक्रवारी असतो, जो मला आवडतो त्यांचंच नाव मी विसरलो?
हे कसं शक्य आहे?
बर्गर? नाही.
सँन्डविच? अहं..सँन्डविचसुद्धा नाही.
Curiosity आता टोकाला लागली. साहजिकच आहे.
जर शोधायचा प्रयत्न केला तर लगेच सापडेल त्याचं नाव आंतरजालावर.
पण नको. आठवूयात ना थोडावेळ. माझी याददाश गेली आहे थोडीच?
असा स्व:तला धीर द्यायला सुरुवात केली.
आणि इतक्यात आठवलं,
काय खातो ते नाही आठवलं तर चित्राच्या सांगण्यावरुन बघितलेला चित्रपट 'U, Me Aur Hum' आठवला. आणि दिवसाची लागलेली वाट आता चांगलीच काट्याकुट्यांतून जाऊ लागली.
’ती’ पिया(काजोल), म्हणजेच या चित्रपटातली अभिनेत्री डोळ्यासमोर चक्क उभी राहिली. तेही हसून माझ्याकडे पाहत. आता सगळा चित्रपट पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या पहावा लागणार याची खात्री पटली. पावसात स्व:तच्या घरचा address विसरलेली पिया, अजयचा फ़ोन नंबर विसरलेली तीच, स्व:तच्या मुलाला bath tub मध्ये टाकून विसरलेली तीच, आणि अशा कितीतरी गोष्टी विसरलेली पिया समोर आली. काळजात धस्स झालं.
कम्प्युटर सुरु केला खरा पण नुसताच screenकडे बघत होतो. काय करायचं आहे काहि सुचेना.
Google वरती जाउन शोधाशोध सुरु केली ’या’ पियाची. Alzheimer's हा disease झालेला असतो पियाला. या आजारात पेशंट सगळं काहि विसरायला लागतो. आपली माणसं, आपलं घर, आपला भूतकाळ, आणि आपली ओळखही.
जे काहि जगत असतो आपण तेवढंच काय ते आयुष्य. काय होऊन गेलं आहे त्याची कुठेही नोंद होत नाही. काय होणार आहे याची कल्पनाही नाही.
विचार करता करता मी पियाच्या रोल मध्ये कधी उतरलो ते कळलेच नाही. आणि Alzheimer's झालेल्या पेशंटचे विचार कर लागलो.
जर आपण फ़ोन नंबर विसरलो तर?
आपण घरातून बाहेर पडलो आणि आँफ़िसचा addressच विसरलो तर?
आपण असं करुया का? सगळे फ़ोन नंबर एका कागदावर लिहून तो कागद आपल्या पाकिटात ठेवूया का?
हो, हे बरं होईल!
पण जर आपण हेच विसरलो की आपल्याकडे एक कागद आहे ज्याच्यावर सगळे फ़ोन नंबर आहेत तर?
जर संध्याकाळी घरी जाताना आपण आपल्याच घरचा address विसरलो तर? जाणार कुठे मग?
असे एक ना अनेक विचीत्र प्रश्न, शंका मनात येऊ लागल्या.
पियाचं character रंगात आलं होतं चांगलंच आता.
अधूनमधून b'fast ला काय असतं हे आठवायची लढाई सुरु होतीच.
Height म्हणजे पियाला घरातून काढून special care मध्ये ठेवलं होतं हे मी अनुभवायला लागलो.
मलाही कुणीतरी असंच special care ward मध्ये सोडून निघून जाईल?
मला सोडून जाताना अजय सारखं कुणी रडेल का?
मीही तिथे एकटाच असेल?
काही आठवणार नाही?
मी कोण?
माझं कोण?
कुठून आलो?
आपण कधितरी बरे होऊ का?
चित्रपटात तरी शेवटी तिला सारं आठवतं आणि ती पुन्हा अजयबरोबर असते असं दाखवलं. पण कितीही म्हटलं तरी तो चित्रपट. चित्रपटाचा The End नेहमीच चांगला करतात. Real Life मध्ये तसं होईलचं असं नाही. कदाचित मला कधीतरी सगळं आठवेल, कदाचित कधीच आठवणार नाही.
पियाला तो आजार एकाएकी नाही जडत. ती हळूहळू विसरायला सुरुवात होते. माझंही तसंच असेल का? आज b'fast काय असतो हे विसरलो. आता उद्या अजून काही विसरु का आपण?
आता आपण आपलंच निरीक्षण करत राहूया, अजून आपण काय काय विसरतो ते. आणि एखाद्या डाँक्टरला consult करुयात वेळ हातची जाण्यापुर्वी.
मला(न) झालेला आजार त्याच्यावरचे परिणाम आणि त्या आजारातून तरण्याचे उपाय हे सगळे चक्र सुरु होतेच. इतक्यात चंद्रा आँफ़िसला आला. आणि मी सवयीप्रमाणे त्याला म्हटलं, ’चलो यार बेगल खाते है’ आणि तोही सवयीप्रमाणे म्हटला, ’एक मिनट मै कम्प्युटर स्टार्ट करता हू’ . आणि अचानक लक्षात आलं, ’बेगल’. हो, आपण प्रत्येक शुक्रवारी सकाळी ’बेगल’ खातो आणि आजही खाणार.
आणि लगेचच पियाचं character संपुष्टात आलं. जणूकाही तो एक ड्रामा होता आणि मी त्यात leading actor ची भुमिका करत होतो.
संदिपचं character सोडून ४५ मिनीटे मी पियाचं character अनपेक्षितपणे का होईना जगून आलो.
आपण कोण आहोत याची जाणीवसुद्धा नसेल तर ते आयुष्य कसं जगलं जात असेल? अर्थातच जर तीला आयुष्य ही संकल्पनाच माहीत नसेल त्या phase मध्ये तर तिला काही वाटणार नाही कदाचित. पण तिच्या कुणालातरी ते जाणवेल. तीच्या मनातले विचार, वेदना, तीचं एकाकीपण, तिचं असून नसलेलं आयुष्य सारं अनुभवलं मी जरासं का होईना काही वेळ.अर्थातच, जे अनुभवलं ते जसंच्या तसं शब्दांत मांड्ता येणं केवळ अशक्य.

कसोशीने जे आठवायचा प्रयत्न करत होतो, ते आठवून आठवून आठवलं नाही आणि न आठवता अचानक आठवलं गेलं.
’आपण एकदम ठणठणीत आहोत’ असं स्व:तशीच पुटपुटलो आणि तसं पटवून दिलं स्व:तलाच.
एक मोठ्ठा उसासा टाकला आणि हुंदडत हुंदडत माझा आवडीचा b'fast करायला गेलो.

बहिणाबाईंचं ’मन वढाय वढाय..’ हे गाणं किती सार्थक आहे नाही का? आपलं मन आपल्याला कुठून कुठे घेऊन जाईल ते मनालाही माहीत नसतं.

--शब्द्सखा!

अबोली

वन-टू वन-टू करत आँफ़िसला जाताना नेहमीप्रमाणे सईचा मीस काँल आला.
तसा मीस काँल येणं हे ठरलेलंचं. पण हा मीस काँल कधी येईल त्याला काही नियम नाहीत.
म्हणजे लहान मूल अगदी वेळ काळ न बघता बेलाशकपणे वाटेल त्या कारणावरुन वाटेल तिथे भोकाड पसरायला सुरवात करेल तसंच काहिसं म्हणाना.
पण यारहो, काहिही म्हणा आवडंत हे असं कुणीतरी आपल्यावर आपल्याही अगोदर हक्क गाजवलेला. यातून दुसर्‍याच्या ठायी असलेलं आपलं महत्व आपल्याच लक्षात येतं.
आता मी अडकलोय इकडे साता समुद्रापार, मला आपल्या देशातून इकडे मीस काँल द्यायचा म्हटलं तरी बर्‍याच जणांच्या अंगावर काटा उभा राहत असावा(अर्थातच हा माझा तर्क) त्यामूळे, "मला फ़ोन आला" असं वाक्य आजकाल बोललंच जात नाही माझ्याकडून. मित्रमंडळींचा भेटीचा अड्डा म्हणजे मेसेंजर्स आणी आँर्कूट आणी कधी कधी १५ एक दिवसातून फ़ोनवर(अर्थातच तोही मी केलेला) .
पण एक मीस काँल मात्र अगदी नित्य निरंतर असतो.
त्यामूळे मीस काँल कुणाचा आला असेल हे बघण्याच्या भानगडीत न पडता मी मोबाईल खिशातून काढून सरळ सरळ अगोदर १ आणी नंतर ३ डायल केला. मी ’बोल’ अथवा ’हँलो’ अथवा इतर काहिही बोलायच्या आतच,
’ए दीप त्या(अमूक तमूक)ने काय सुंदर कविता टाकली यार आँर्कूटवर.."अबोली" वर’.
प्रेमरोग मध्ये ती बालीश पद्मिनी त्या प्रेमरोगी चंपू ला जेव्हा ’ए देव..’ म्हणायची ना तेव्हा जाम जळायचो मी त्या बिचार्‍या चंपू वर. जर त्याला आता कळलं की मला कुणीतरी ’ए दीप’ म्हणतं (पिक्चर मधल्या सारखं खोटं खोटं नाही) तर I hope की तो माझ्यावर जळायचा नाही.
तर आता पुढील आठ ते दहा मिनीटे ती कविता कशी आहे? त्या कवितेत हिला कोणत्या ओळी खुप जास्त आवडल्या? त्या कवितेला कुणी कुणी कसे (निवडक) रिप्लाय दिलेत? हिने रिप्लाय दिला का? दिला असेल तर ’मी तुला वाचून दाखवू का मी काय लिहीलं ते?’ असं उगीच विचारणं हे ओघानं येणार होतं. आणी ते आलंही. मीही शांतपणे ऐकत होतो(as usual) आणी ती बोलेल त्याला हो, अच्छा, ओके, अरे वा अशी उत्तरं देत होतो.
तसं हे माझं नेहमीचंच. ती कसली तरी तारिफ़ करत असेल तर काय बोलावं हे मला बर्‍याचदा सुचत नाही. बहूतेक कुणालाच सुचत नसावं.
मग त्या कवितेवरची चर्चा झाल्यावर, जरासं अबोलीच्या फ़ुलालर बोलण झालं. तेव्हा कळलं की सईला अबोली आवडते.आणी ठरवलं, आता भेटल्यावर अबोलीचा एक छानसा गजरा करुन माळायचा हिच्या केसांत.
सगळं बोलून झाल्यावर शेवटी सई म्हटली ’तुही लिहीना अबोलीवर एखादी कविता.’
आँफ़िसमधुन कधी एकदा घरी जातो आणी ती कविता वाचतो असं झालं होतं आता.
आँफ़िसमध्ये कसातरी दिवस संपला. दिवसभर कामात असल्यामुळे त्या कवितेची अथवा अबोलीची दोघींचीही आठवण झाली नाही.
आँफ़िसमधुन बाहेर पडलो अन घराची वाट धरली.
अन अचानक तिथेच, जिथं सकाळी फ़ोन वाजला होता तिथं आल्यावर पुन्हा त्या फ़ोनची, आणी अबोलीची आठवण झाली.
नजर आजुबाजुच्या गवतावर, उघड्या मैदनावर फ़िरायला लागली अबोलीचा शोध घेतं. कशी दिसत असेल अबोली? बरीच फ़ुलं असतील की एखादंच फ़ूल कुठंतरी डोकावत असेल? संध्याकाळी कशी असेल, सुकलेली असेल की अजुनही टवटवीत खुललेली असेल ही? मनात असे विचार आणी नजर इकडेतिकडे भिरभिरत घर कधी आलं ते कळलंही नाही.
मन थोडंसं जड झालं खरं, पण कारण कळेना.
अबोलीचं फ़ूल?
छे !!! काहितरीच काय? त्या फ़ुलावरुन मन का जड व्हाव?
पण काहितरी कुठंतरी सलायला लागलं हे मात्र नक्की.
थोडासा मागं गेलो, सकाळी सईनं सांगितलेली ’अबोली’ आठवली.
एका प्रश्नाजवळ थांबलो. या फ़ुलाला ’अबोली’च का म्हणायंच?
सारे तर्क वितर्क लढवून झाले. उत्तर सापडेना.
एव्हाना दररोज आँफ़िसवरुन आल्यावर काहितरी खाऊन कुणी आँनलाईन असेल तर गप्पा मारण्यात अथवा एखादा चित्रपट बघण्यात मशगूल झालेला असतो. पण आज हे नेहमीचं अंगवळणी पडलेलं वळण भलतीकडेच वळण घेऊन बसलं होतं.
क्षणभर मनाशीच पुटपुटलोही की ’का शोधायचं उत्तर? काय संबंध ह्या अबोलीचा आणि माझा? का उगाचच मन जळतय या अबोलीच्या फ़ुलापायी?’
पण हे उत्तर नव्हतं.
पुन्हा तेच सुरु.
मनाचे आरोह अवरोह सुरु झाले वेड्यासारखे.
वेडीपिशी होऊन खुलणारी ही नाजुक अबोली. एकदा खुलायला लागली की खुलतच राहणार. बरं त्यातही ही खुलणार माळरानी. पाणी असो वा नसो ती आपला अल्लडपणा जपत खुलणारच.
वळवाच्या पावसात बेधुंद होऊन तिच्याच मस्तीत डुलत असते तेव्हा तिचा हलका शेंद्री, गुलाबी रंग अधिकच खुलुन उठतो, गडद दिसायला लागतो.
नेहमीच टवटवीत, हसरी वाटणारी अबोली प्रत्येकालाच जवळची वाटू लागते.
पावसाच्या सरिचा एखादा थेंब तिच्या एखाद्या पाकळीवर अडकून रहावा आणी सुर्याच्या एखाद्या किरणानं त्या थेंबातून आरपार डोकावून अबोलीच्या रंगावर पडावं, तेही एखाद्या माळरानी.
इतकी ही सुंदर, मनमोहक अबोली. हे खरं की अबोलीच्या फ़ुलाला म्हणावा असा गंध नाही.
पण तिच्या रंगांनी ती मन जिंकते हेही तितकंच खरं.
तिच्या वेगवेगळ्या रंगांतून, पाकळ्यांतून आपल्याशी ती हीतगूज करत असते. नेहमीच खुलणारी, डुलणारी अबोली पाहताना, तिच्या रंगांनी आपल्या मनाच रितं रितं आभाळ भरुन येतं, तिला बघतच राहावसं वाटतं.

आता उमजलं, सकाळी का इतंक बोललं जात होतं अबोलीबद्दल.

पण अबोली का म्हणायचं हिला? इतके रंग, इतकी सुंदरता आहेच ना हिच्याकडे मग तरिही उगाचच का?
’अबोली’ म्हणजे त्यागाचं प्रतिक.
काहीच न बोलणारी. बरंच काही आपल्या मनाशीच दडवून बसलेली.
खोलवर कुठंतरी, मनाच्या तळाशी आपल्यातच हरवलेली.
सगळ्या जगाला दिसणारी अबोली आणी प्रत्यक्षात असणारी ’अबोली’ या दोन्ही वेगळ्या असू शकतील ना?
तिचा सालसपणा, अल्लड्पणा नजरेत भरतो, मग ती ’अबोली’ का?
की खरोखरचं या नितळ, निखळ, अल्लड अबोलीत एखादी अबोल अबोली दडलेली असेल, जगापासून दूर?
खुललेली अबोली पाहिली की मन टवटवीत होतं, पण ’अबोली’ हे नाव उच्चारल की मन जड होतं. का असं?
कदाचीत कुठल्यातरी गर्तेत गुंतलेली असेलही नेहमीच ती. हे कुणा ना कळे.


’सई’ सुद्धा अशीच आहे. मनमुरादपणे खुलणार्‍या याच ’अबोली’सारखी.

आता उमजलं ही ’अबोली’ मनाला का साद घालत होती ते.
मन अधिकच बेचैन झालं आणि पुन्हा एकदा मनाचे आरोह अवरोह सुरु झालेत.
आता अबोली मागे पडली होती, पण तीच्या नावाने मनाशी फ़ेर धरला होता.

--शब्द्सखा!

आसवांचा सडा...

सांगायचे नाही सगळे सांगावेसे वाटले तरी
रोखायचे नाहीत आसवे डोळ्यातून सुटले तरी
मोडायचे सारे नियम, तोडायचे सारे बंध
भरल्या मनाला वाहू द्यायच...व्हायचं निर्बंध
झेलायचा पाऊस, पेलायचा वादळवारा
समजायचं..प्रत्येकाचा असेल असा पसारा !
ओलसर कडा...
खोलवर तडा...
आसवांचा सडा...
तळहातावर झेलायचा....
निरखून पहायचं आसवांच तळं
दिसेल का कुठं आकाश निळं?
शोधत शोधत तळाशी जायचं
तळ्यात शिरून तळ्याचं व्हायचं
आपलीच आसवं आपण लपवतो
मुखवट्यात राहून हसू खपवतो
कधी कधी रडावं..
ढळावं...
भिजावं..आपल्याच अश्रुंत
मायेनं एखादा हात पुढं येईल
साचलेल्य तळ्याला वाहून नेईल...

मी नसेल तेव्हा असं काहिसं होईल का?

सांग ना,
मी नसेल तेव्हा असं काहिसं होईल का?
माझ्या आठवणीत तुझी पापणी थोडीतरी वाहील का?
सांग ना,
मी नसेल तेव्हा असं काहिसं होईल का?

तुझ्या माझ्या प्रेमात खुलल्या कितीतरी सांजवेळा
मी नसताना हीच संध्या कातर होऊन येइल का?
सांग ना,
मी नसेल तेव्हा असं काहिसं होईल का?

दोघांच्या प्रेमात आपल्या, भिजल्या किती श्रावण्सरी
मी नसताना ही सर कोरडीच राहून जाईल का?
सांग ना,
मी नसेल तेव्हा असं काहिसं होईल का?

मीच आवडतो ना तुला?फ़क्त मी!
मी नसेल तेव्हा दुसरं कुणी माझ्याचसारखं होईल का?
लाखमोलांच्या अश्रुंना तुझ्या ओंजळीत कुणी घेईल का?
अल्लड तुझ्या हसण्याला आभाळ कुणी देईल का?
सांग ना,
मी नसेल तेव्हा असं काहिसं होईल का?

तू खुलशील पुन्हा, पुन्हा वार्‍यासंगे भिरभिरशील
वेडं प्रेम माझं, तुझ्या मनात खोलवर दडून कुठं राहिल का?
सांग ना,
मी नसेल तेव्हा असं काहिसं होईल का?

'यदा यदा ही धर्मस्य..'

वादळाच्या सळसळणार्‍या जिव्हांना
अन समुद्राच्या अघोरी भयप्रस्त लाटांना
जेव्हा स्व:तच्या अस्तित्वाचा रंग चढू लागतो...
जेव्हा जेव्हा काळरात डोळे विस्फ़ारते
अन पायवाटाच पायांमध्ये अड्खळू लागतात माझ्या
तेव्हा तेव्हा मी पेटून उठतो..
मी सांगतो वादळाला, त्या महाकाय लाटांना...
त्या काळरातीला अन त्या वाटेलाही..
मी 'त्राहीमाम..त्राहीमाम..' ची भीक नाही मागणार इतक्यात
माथा नाही टेकणार तुमच्या माजलेल्या अस्तित्वासमोर
दोन हात करेल..लढेल..
जिंकेल की कोसळेल ठाऊक नाही..
पण संपणार नाही..
कोसळलो तरी उठेल..पुन्हा पेटेल..
पुन्हा झुंज देईल...मीही आग होईल..
'मी' काय?
'मी' कोण?
जाणाल मग मला तुम्हीही.. मी तोच प्रत्येकात दडलेला..
वेळ येईल मग...
माझ्या विचारांची श्रुंखला, माझ्या शब्दांच्या बेड्या
तुमच्या अजस्र बाहुंना विळख्यात घेतील
तुमचा कालिया होईल...
बुडला जाल तुम्ही..
तुमचेच डाव तुमच्याविरुद्ध होतील..
आणी पुन्हा एकदा...
पुन्हा एकदा मग
'यदा यदा ही धर्मस्य..' सार्थ होईल...

तुझे शब्द दाटून येतात जेव्हा

मनात दाटलेलं आभाळ तुझ्या
पिऊन टाकावसं वाटतं...
उधळावेसे वाटतात
आयुष्याचे सगळेच रंग तुझ्यावर...तुझे शब्द दाटून येतात जेव्हा

तुला मिठीत घेऊन
क्षितीजापार जावसं वाटत
तुझ्या मनात मीच दाटून
तुझ्या शब्दांतून मीच वहावंस वाटतं...तुझे शब्द दाटून येतात जेव्हा

सारं सारं सोडून
सारं जग ओलांडून
तुझ्या डोळ्यात साठलेला
एक अश्रू बनून ओघळावंस वाटतं...तुझे शब्द दाटून येतात जेव्हा

तुझा हात हातात घेऊन
मनातलं गुपित खोलून
मी तुझाच आहे फ़क्त
हे पुन्हा पुन्हा तुला सांगावसं वाटतं...तुझे शब्द दाटून येतात जेव्हा

तुझ्या हळव्या मनाला
स्पर्शावसं वाटतं
तुझ्या मनात उतरुन
तुझ्यातच उरुन रहावसं वाटतं...तुझे शब्द दाटून येतात जेव्हा

मलाही विसरून
तुझ्याकडं धावावसं वाटतयं
थकलेला, दमलेला मी
तुझ्या मिठीत विसावसं वाटतयं...तुझे शब्द दाटून येतात जेव्हा

-शब्द्सखा!

स्वप्ने माझी....भिजते तू

वार्‍यावरती लहरत जाशी...अंबरास तू कवेत घेशी
गंध कधी..कधी मधूशालाही...मोरपिसापरी मोहरशी

खुलते कधी तू शामलसंध्या....क्षितीजावर अन दरवळते
मुक्त मुक्त तू..धुंद धुंद तू....खळ खळ तू गं खळखळते

फ़ुलाहूनही नाजूक होते...इवलेसे दव मिठीत घेते
रंगहीन त्या दवास सारे..रंग तुझे तू देऊन येते

खुलते तू झगमगते तू...नभी चांद अन झुलते तू
रातराणी तू गंधीत होते...मस्तीत तुझिया डूलते ते

थकते..शिनते..निजते तू...स्वप्नकुशीत मग थिजते तू
स्वप्नांचा मी सौदागर गं...स्वप्ने माझी....भिजते तू


--शब्द्सखा!

अपवाद

मौन मी जरी मी परी संवाद आहे
मांडला अताशा खरा मी वाद आहे

तापल्या निखार्‍या तमा ना मोसमांची
लाख वादळांचे फुके छळवाद आहे

का पुराण आता असे वाचाळ झाले?
(पोट पाळण्या होत युक्तिवाद आहे)

तेच चांदतारे कितीदा आळवावे?
शब्द आज हे मांडती प्रवाद आहे

लेखणी अता का अशी पेटून उठली?
पेटल्या मनाचा कसा अनुवाद आहे?

धुंद राहुनी कैक सरले वादळाने
'दीप'स्तंभ मी आजही अपवाद आहे

--शब्द्सखा !

उठाव

स्वप्नात कोणता मी, शोधीत गाव आहे?
सत्यात हारलो मी, हर एक डाव आहे

पाहून येथ गेला, जो तो मला असा की
बेनाम जिंदगीचे, बदनाम नाव आहे

'होऊ नको दिवाणी', सांगू कसे तुला मी?
येथे खर्‍याखर्‍यांचा, मोडीत भाव आहे

मी गायलेच नाही, या मैफलीत गाणे
खोटेच सूर सारे, खोटा जमाव आहे

का शोक श्रावणाचा, खोटा घरात माझ्या?
सांगा कुणी तयाला, मजला सराव आहे

आता पसंत ना मज, स्वर्गात राहणेही
ध्रुवापरी अटळ मी, शोधीत ठाव आहे

ना दाद मागतो मी, ना वाहवा हवी मज
शब्दात आज माझ्या, दिसतो उठाव आहे

--शब्द्सखा!

या आसवांस माझ्या

या आसवांस माझ्या... तू साहतेस का गं?
अन आठवांत माझ्या... तू राहतेस का गं?

हरवून सूर गेले...मज सांजवेळ येता
या मैफ़लीत माझ्या... तू नाहतेस का गं?

होतेस का पुजारी... अन फूल ही कधी तू
तुज मंदिरात माझ्या... तू वाहतेस का गं?

आता उरात झरती... या वेदना सदाच्या
या वेदनेस माझ्या... तू चाहतेस का गं?

तू दूर दूर जाता... बघ निखळले सहारे
पडक्या घरास माझ्या... तू पाहतेस का गं?

--शब्द्सखा!

वाटे जरा जगावे

तुषारदा तुझ्या या "गझलेपुढे" माझे शब्द काही नाही.मी थोडंसं लिहीलं आहे. तुझ्या गझलेला रिप्ल्याय म्हणुन नाही. सुचलं म्हणुन लिहीलं.

वाटे जरा जगावे
सारीच बंद दारे

कोणास कोण येथे?
कोणीच ना सहारे

का पावसात आता
हे तापती निखारे?

माझे न दु:ख काही
डोळ्यात आसरा रे?

"माझाच तू", खरे हे
खोटेच सांगना रे

खोटेच भास माझे
पाहून आरसा रे

--शब्द्सखा!

बाग

फ़ूलही कसे सलते उरात आहे?

वादळे कशी या अंतरात आहे?

वाट संपता माझा प्रवास होतो

पावले कशी वेड्या भरात आहे?

चुकवुनी रस्ते निघुन मरण गेले

वेदना अशा माझ्या घरात आहे

सोसतो असा आजकाल मज मी

आसवे बरी साध्या दरात आहे

वाळवंट रे हे बाग का खुलावी?

मेघ त्या कितीसे अंबरात आहे?

चांदणे ढळाले एकटा पुन्हा मी

काजळी कशी ही चांदरात आहे?

--शब्द्सखा!

तुझी आठवण येता - चारोळ्या!

तुझी आठवण येता
नजर उगाचचं भिरभिरते
जुन्या आठवांना आठवुन
पापणी क्षणभर पुन्हा डबडबते

--शब्द्सखा!

तुझी आठवण येता
शब्द बेभान होतात
लेखणीचा पाऊस
डायरीची पानं रान होतात

--शब्द्सखा!

तुझी आठवण येता
मन सैरभैर होतं
तुझ्या आठवणी विसरुन
तुझ्या अवतीभवती भिरभिरतं

--शब्द्सखा!

तुझी आठवण येता
माझे सारे क्षण रिते वाटतात
प्रत्येक क्षणात माझ्या
फ़क्त तुझ्या आठवणी दाटतात

--शब्द्सखा!

सुरांनो..

कुठे रे दडलात सुरांनो?

आज केविलवाणे झालात सुरांनो?

छेडल्या ज्या तारा आजवर

घायाळ त्यांनीच आज केले सुरांनो?

मैफ़ली सजतील...उठतील...

शब्दांसाठी माझिया, तुम्ही जगायचे सुरांनो!

--शब्द्सखा!

मी प्रसिद्ध होत गेलो

वाचाळले कोण...मी प्रसिद्ध होत गेलो
तू कुजबुजला फ़क्त..मी ग्वाही देत गेलो

तू घरात तुझिया कितीही भाषणे केली
आवाज उंच माझा मी घोषणा देत आलो

म्हणशील मज बिचारा दयेने कधितरी तू
सुकवुन आसवे सारीच मी आता येथ आलो

पाहू नको मला तू..मी गुन्हेगार नाही
अंत अद्याप न झाला...मी सुरवात होत आलो

फ़ुलांना खुडण्याचा इथला धर्म निराळा आहे
होतो प्रभात कधी आता होऊन रात आलो

--संदीप सुरळे

आता उपाव नाही

येथे कफ़न देऊनी त्यांनी मला सजवले
"पेटुनी उठ"ल्या परीच आता उपाव नाही

ते समजतील स्व:तला भले ते थोर होते
मी चोर नाही हे उमजण्याखेरीच उपाव नाही

मी कधीचा होतो शब्दांत या दंगलेला
आता रणात आलो...आता उपाव नाही

का म्यानात वितळल्या तलवारी गंजलेल्या
आता आमनेसामने...आता उपाव नाही

--संदीप सुरळे

पसंत मजला असे मरणे नाही

वारा भरला शिडात ज्या
गलबत ते परतणे नाही


शोधेल किनारा ते कसेही
अर्ध्यात त्याचे उतरणे नाही

वादळा कापताना संपेल ते
लपुन बसुन इथे उरणे नाही

लाटांस तोंड देणे गैर कसले?
असेल ती मोठी...डरणे नाही

मी सहज मरावे असे वाटले का?
पसंत मजला असे मरणे नाही

--संदीप सुरळे

मी धृव आहे....

असशील तू चंद्र रातींना खुलणारा..
अंधार्‍या राती चमकणारा..
तुझ्या रुपाने खुलवशील तू काळोख क्षणभर..
सगळे बघतीलही तुला..क्षणभर.

तू नेहमीच नितळ दिसशील
कधीकधी बिच्चारा होऊन दडुनही बसशील
ओवाळतील तुला सगळेच
मानतीलही तुला सगळेच..

पण तू..
तू त्या सुर्यामुळे चमकतोस
सुर्य आहे म्हणुन तुझी रोशनी आहे
त्याच्याचमुळे तुझी निशाणी आहे..

मी आहे लहानगा.
दूर दूर आकाशी...
एखाद्या ठिपक्यासारखा वावरणारा..

पण मी...
मी अटळ आहे...
मी अढळ आहे..
मी स्वयंप्रकाशी आहे..
मी धृव आहे....

--शब्द्सखा!

आगाज

का शब्द मौन हे मौन का आवाज होते?
माझ्यासवे निघाले जळाया राज होते

का कत्तले तयांनी माझी हजारो केली?
माझे इथे कितीक झाले आगाज होते?

"या" वादळास मी कैकदा बोलेल आता
सारेच बोल इथले फ़क्त हवाबाज होते

येथे उगा कशाला अता मी भीक मागू?
माझेच शब्द् श्रिमंत माझा साज होते

रुदाली

श्रावणी कोठून आली ही वावटळ
वाळवंटी स्वैर झाली ही वावटळ

का फ़ुलांनी सजविले खोटेच मजला
भावली मज आज आली ही वावटळ

वादळाने बांधली कधिची सोयरी
वीज बनुनी आज व्याली ही वावटळ

आजही होते इरादे साधेच रे
सांडली का आज प्याली ही वावटळ

नेहमी तू भग्न, आता का रंगली
रंग माझे आज ल्याली ही वावटळ

'दीप' विझला, थांबला झंझावात ही
आज का झाली 'रुदाली' ही वावटळ

--शब्दसखा!

कोकीळा

विवेकच्या कवितेला reply..

मीत्रा....तुझी कवीता भिडली खुपच!


मनाच्या फ़ांदीवर कधी एखादी कोकीळा,
काही क्षणांसाठी विसाव्याला येते
आपण भटकत असतो उनाड्पणे
अन नकळतच ती एखादी तान छेडून जाते.....
त्या सुरेल, सुमधुर सुरानं
आपणही वेडावतो... नादावतो...
क्षणभर का होईना पण
आपणही ती धून ऐकुन हरवतो
असेच क्षण येतात जातात
आपण आपल्यापासुन कुठंतरी दूर गेलेलो असतो
सारं सारं फ़िकं वाटू लागतं जगातलं
त्या सुरात आपण पुरते चिंब झालेलो असतो
अचानक क्षणभरासाठी कोकीळेचे ते सूर बंद होतात
कोकिळा आपल्याशी हितगुज करु लागते
आपण कावरेबावरे होतो
"माझे हे सूर अर्पायचे आहेत तुला आयुष्यभरासाठी..."असं काहीसं ती बोलू लागते...
क्षणभर आपल्यालाही प्रेमाचा पाझर फ़ुटतो
हातात चंद्र, तारे आल्यासारखं वाटतं
कोकीळा आपल्याकडे आसं लावून बसलेली असते
अन आपल्याला मात्र आपलं "ते" जग आठवू लागतं
....
...
...
इथंच सारी गोची होते...
अमूल्य, निस्वार्थ असे ते कोकीळेचे सूर...तीचं ते प्रेम
आपण तसंच मनाच्या त्या फ़ांदीवर ठेवुन
"वेगळ्या" सावलीच्या शोधात निघतो..
ही वेगळी सावली कोणती हे आपल्यालाही माहीत नसतं..
तरीही आपला प्रवास सुरु राहतो..भर उन्हात!!!
कोकीळाही तशीच झुरत राहते...भर उन्हात!!!

--शब्द्सखा!

सुने श्वास...

सुने श्वास...
शब्दही सुनेच आता...
तू गेलीस तुझ्या सुरांना घेऊन
अन माझे शब्द पोरके झाले
मी शोधत असतो माझ्या शब्दांना
वेडा होऊन...
पण तुझ्या सुरांशिवाय
माझे शब्द कधी उमटले होते?

--शब्द्सखा!

काव्या

आपल्या आवडीच्या लोकांबद्दल आपल्याला बोलायला खुप आवडतं नाही का?
आणी त्यातल्या त्यात लिहायला तर खुपच!
आणी तेही असं मैफ़लीत असेल तर क्या केहने....
माझी "सगळ्यात" आवडती कवयित्री "काव्या ताई" इथे.
काव्या ताई बद्दल लीहीण्यासाठी वाट बघत होतो आणी सनिलदा ने हा थ्रेड काढला...थँक्स सनिलदा!
मी एकदाच भेटलो काव्याताईला....अरे आपल्या काव्यांजलीच्या शीबीरात ठाण्याला होत्या ना त्या...


तीच्या शब्दांत एक "ऐट"..
..
..
शब्दांनी बेभान करणारी ती..काव्या
शब्दांनी मनं जिंकणारी ती..काव्या

कधी तीचे शब्द् वादळात खेळतात
कधी हवेच्या झोक्यावर हळुवार डुलतात
...
...
...
तीच्या शब्दांत आयुष्याचे श्वास विणलेले जणु
तीच्या शब्दांत आपलेच आयुष्य लपलेले जणु
हेच शब्द कधी फ़ुलांसारखे इवलेसे,नाजुकसे..
हेच शब्द कधी श्रावणसरीसारखे अलगदसे..
..
..
..
बोलक्या डोळ्यांत तीच्या भावनेचा पूर...
शब्द तीचे कधी मनात दाटवीती हूरहूर..
...
"काव्या"... एक प्रवाह "सुरेल" शब्दांचा...
"काव्या"... एक प्रवाह "सुंदर" आयुष्याचा...
"काव्या"... एक गीत आपुल्या ओठांतले
"काव्या"...एक हिरवेसे झाड आयुष्याच्या वाटांतले...

--संदीप (शब्द्सखा)
काव्याताई तुला खुप सार्‍या शुभेच्छा !!!

एखादा थेंब

पावसाची एक सर
भिजवील तुला आता...
चिंब चिंब करेल नखशिखांत..
तुझ्या रुपाला अजुनच खुलवेल ती..
तीच्या अजाण... हळुवार थेंबांना
तू ओंजळीत घे तुझ्या
आता बघ या थेंबांकडं...
बघ..
एखादा चेहरा दिसतो का?
बघ..एखादा थेंब या सरिचा,
तुझ्या काळजाला भिडतो का?
--शब्द्सखा!

वाटते मोगर्याचे मी फूल व्हावे

वाटते मोगर्याचे मी फूल व्हावे
ओंजळीत तू मला डोळे भरुन पहावे

वाटते मोगर्याचा गजरा मी बनावे
तुझिया केसुंत मला तू माळून घ्यावे

वाटते मोगर्याची मी पाकळी व्हावे
तुझिया ओठांवरी मी शांत पहुडावे

वाटते मज् मोगर्याचा मी गंध व्हावे
गंधास या श्वासात तू भरून घ्यावे

वाटते मोगर्याचे मी झाड व्हावे
तुझ्यासवे अंगणी तुझ्या मी झुलावे

तू झरा हो..

तू झरा हो..
जमेल तसा वाहत जा..
मनामनात राहत जा...

तू वारा बन..
गंध फ़ुलांचा पेरत जा...
दुसर्‍यांसाठी सरत जा...

तू बन घन काळा
मनमुराद बरसत जा..
स्व:तसाठी नाही..दुनियेसाठी तरसत जा...

कधी कधी तू सुर्यही हो..
मान्य आहे, तू जळशील..
पण दुसर्‍यांसाठी तू वरदान ठरशील..

नाहीच जमलं काही तर
तर तू वाळलेल्या झाडाची काठी हो...
कुणा एखाद्या आजोबाच्या हातातली लाठी हो...

--शब्द्सखा!

माकडीणीची गोष्ट

रात्र एकटी असते..
दिवसही एकटाच...
अरे...तु एकटा..
मीही एकटाच
साथ असतात ते फ़क्त भास
कुणीतरी साथ असण्याचे
तू घाबरु नकोस...
इथं तुझं कूणी नाही ना?
अरे इथं माझंही कुणी नाही...
इतकंच काय?
विचार कुणालाही...
इथं कुणाचंच कुणी नाही...
इथं सगळेचजण जपतात ’नातं’
फ़क्त एक ओझं म्हणुन...
..
...
तुला ती गोष्ट आठवते?
त्या माकडीणीची?

--शब्द्सखा!

तू झरा हो..

तू झरा हो..
जमेल तसा वाहत जा..
मनामनात राहत जा...

तू वारा बन..
गंध फ़ुलांचा पेरत जा...
दुसर्‍यांसाठी सरत जा...

तू बन घन काळा
मनमुराद बरसत जा..
स्व:तसाठी नाही..दुनियेसाठी तरसत जा..

.कधी कधी तू सुर्यही हो.
.मान्य आहे, तू जळशील..
पण दुसर्‍यांसाठी तू वरदान ठरशील..

नाहीच जमलं काही तर
तर तू वाळलेल्या झाडाची काठी हो...
कुणा एखाद्या आजोबाच्या हातातली लाठी हो...

--शब्द्सखा!

साथ असतात ते फ़क्त भास

रात्र एकटी असते..
दिवसही एकटाच...
अरे...तु एकटा..
मीही एकटाच
साथ असतात ते फ़क्त भास
कुणीतरी साथ असण्याचे
तू घाबरु नकोस...
इथं तुझं कूणी नाही ना?
अरे इथं माझंही कुणी नाही...
इतकंच काय?
विचार कुणालाही...
इथं कुणाचंच कुणी नाही...
इथं सगळेचजण जपतात ’नाते’
फ़क्त एक ओझं म्हणुन..
..
..
..
तुला ती गोष्ट आठवते?
त्या माकडीणीची?

--शब्द्सखा!

रंगतरंग

तू खुलावे अन फ़ुलांचे रंग घ्यावे
तू मला या चांदराती रंगवावे

तुज गुलाबी या पहाटे जाग यावी
श्वास श्वासांनी पुन्हा मग दंग व्हावे

थरथरे हे ओठ आणिक सूर कापे
तनमनी या आज रंगतरंग यावे

मंतरावी रात, आता ओढ वाटे
चांद वेड्या चांदणीचे अंग ल्यावे

का मिठी उबदार ऐशी दूर आहे
'दीप' जळतो तू तयाचा संग व्हावे

--शब्द्सखा!

औदाच्या पावसानं

आरं...
पिकलं शिवार,राखलं शिवार
औदाच्या पावसानं...
आरं...
वांगी न गवार,गहू न जवार
औदाच्या पावसानं...

आरं...
सपान तारलं, ढोरांना चारलं
औदाच्या पावसानं...
आरं...
पाणी बी मुरलं, शेतीत जिरलं
औदाच्या पावसानं...


आरं...
रुबाब डौल नं,देवाचा कौल
औदाच्या पावसानं...
आरं...
घबाड गावलं,नशिब धावलं
औदाच्या पावसानं...

आरं...
सुखाचं गान, सुखाची खाण
औदाच्या पावसानं...
आरं...
हिरवं हे मन, हिरवं हे रान
औदाच्या पावसानं...


--शब्द्सखा

बाबा तला ना...

बाबा बाबा तला ना
आपण पावथामदी दाउ
तिथ दाल थेलू
आपण मातिमदी लोलू

बाबा त्या धालांना
थंदी नाही वादत?
बाबा त्या फ़ुलांना
त्या दाला नाही लादत?

पावथाच्या धली
फ़्लीज आहे ता बाबा?
त्याच्या फ़्लीजमधे
छोता छोता बल्फ़ तथा ताय बाबा?

बाबा धोलानाथ तुथंय
पाउत तल आला
दाल दाल पाणी
पाउत वल्ला धाला

बाबा ताददाची होली
तलायचीये मला
होलीत बथुन
पावथाच्या धली दायतंय मला

बाबा बाबा पाउत तुथं लाहतो?
तुथं ये त्यातं धल ?
बाबा शिली तल नाही
मंग तो तथा दातो वल?

बाबा पाऊत तुदं देला?
पाऊत हलउन देला
तो भिदला म्हनुन
त्याच्या मम्मीने माल्ल त्याला?

बाबो!!! लथ्यावल तिती पाणी
आता लत्था वाहुन देला?
उद्या शालाच नाही आता
लत्था हलवुन देला

बाबा बाबा, मी देलो नाही म्हणुन
पावथाला लाग आला ना...
बाबा थांगा ना
पाउत माध्यावल लुसला ना....

--शब्द्सखा!

आसवांचा पाऊस

पाऊस आल्यावरी हा
आठवणी तुझ्याच दाटे
हरएक थेंब त्याचा
बनती हजार काटे

मल्हार साज घेई
मी कावरा बावरा
थेंब चिंब आसवांनी
आसवांचा हा आसरा

का तुझ्या गीतांनी
अताशा साद द्यावी?
मी तुझ्यावीना का
सरिंची दाद घ्यावी?

परतुन घरात जेव्हा
मी दार बंद करतो
तो हरवलेला बाहेर
आसवांचा पाऊस उरतो

--शब्दसखा!

प्रेमबोल

चिंब पावसाच्या धारा
सवे ओथंबल्या गारा
अशा या गं सरीसवे
सये यावे तू आधारा

चिंब रान सारे झाले
थेंबा थेंबात भिजले
झरले गं थेंब कसे?
हे उराउरात उरले

तुझ्या गालावर थेंब
ओठावर ओघळावे
तुला चिंब भिजवावे
मीच एक थेंब व्हावे

चिंब सरिंनी गं तुला
सये चिंब भिजवावे
उन्हं पावसात यावी
रुप तुझे गं खुलावे

हात गुंफ़ुनीया हाती
झेलु दोन थेंब चल
पाऊसही न इथे अता
बोलू थोडे प्रेमबोल

Happy Birthday Shraddha !

प्रत्येक शब्दाने तुझ्या
मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे
दूर दूर जावे

तुजपुढे ठेंगणे व्हावे
त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी
यशाच्या प्रत्येक शिखराने

बागडावे तू
नभी उंच उडावे तू
बनुन मोती सुंदरसा
शिंपल्यात पडावे तू

प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल

सई..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पावसाच्या प्रत्येक सरिच्या,
प्रत्येक थेंबाइतका आनंद, प्रेम...
तुझ्या आयुष्यात यावं.
तुझ्यासाठी ग्रिष्मानही श्रावण व्हावं...
प्रत्येक फ़ुलाच्या प्रत्येक पाकळीसवे तू फ़ुलावं...
हवेच्या प्रत्येक झोक्यावर तू मनमुक्त झुलावं...
तू म्हणशील तसा हा ऋतु खुलावा...
तू म्हणशील तसा गंध तुला भुलावा...
तू धुंद..
तू स्वैर..
तू स्वर..
तू साज..
तू ’सई’.................

सई..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा!

गंध हवेत दरवळावा चहुवार
हसू तुझे असे खुलावे
प्रत्येक क्षणाच्या प्रत्येक क्षणी
तू प्राजक्त बनुन फ़ुलावे ...

...प्राजक्त जेव्हा खुलतो ना तेव्हा अगदी मनमुराद खुलतो...सगळीकडे त्याचा गंध आणी त्याची सुंदरता..तुही असंच खुलावसं...प्राजक्तासारखं...प्रत्येक क्षणाच्या प्रत्येक क्षणी ...

वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा!

’दीप’वेडी

हाय..नजरेशी नजरही भिडली होती
स्पंदने अन ह्रदयाची अडली होती

पाहिले ना मी फ़ुलांना त्या फ़ुलणार्‍या
मी कळी नाजूकशी ही खुडली होती

हासलो मी ही जरासा का, हे न कळे
पाकळ्यांवरती खळी मग पडली होती

गंध दाटू लागला या वाटेवरती
रातराणी तुच इथे का दडली होती?

’दीप’वेडी ’दीप’ची तू गं होताना
प्रित ही वेडी युगांची जडली होती

--शब्द्सखा

सूर तुझे आहेत माझ्याचसाठी

तुझे सूर,
असे तनमनी भिनले....
विसरलो मी मलाही क्षणभर
पाऊल जागीच थबकले...
मी लिहील अखंड..
तुझ्यासाठी...
तुझ्या सुरांसाठी......
.....जाणतो मी,
सूर तुझे,
आहेत माझ्याचसाठी........

--शब्द्सखा!

रिमझिमत्या पावसाला

रिमझिमत्या पावसाला
सखये तू मिठीत घ्यावे
तोच पाऊस अंगणी या
मी त्याच्यात चिंब व्हावे

मी झेलुन घेईल सखये
हर एक थेंब त्याचा
प्रत्येक थेंबात तुझी भेट
इतके प्रेम तू पावसाला द्यावे

सर ओथंबून येई
प्रेम तुझे बरसून जाई
तुझ्या प्रेमात भिजल्या सरिने
सखये तुझे गीत गावे

एक थेंब माझ्याही गाली
हलकेच त्यास अशी लाज यावी
तू ओठांनी टिपशी थेंब जे
सरिने पुन्हा त्यांना भरावे


--शब्द्सखा!

आधार

मन जड झालंय,
हलकं करावंस वाटतंय...
चहुवार नजर फ़िरवली
पण सगळेच खांदे कमजोर...
कोण कुणाला आधार देणार?
कुणाच्या मनाला कोण उमजणार?
सगळेच जण आधार शोधतात
थोडेच जण मात्र आधार होतात.

मग मी कोण?
मी आधार शोधणारा
की मी आधार होणारा?
मी आधार होणारा आहे की नाही ते माहित नाही
पण मी आधार शोधणारा नक्किच नाही.
माझ्यासारखंच मी माझ्या मनालाही बजावलं होतं,
"स्व:तच्या आधाराला स्व:तचा खांदा शोध"
पण मनच ते........

....आता मन आधार शोधतय,
अन मला त्याचा आधार बनायचंय...

--शब्द्सखा

मी लिहील अखंड

तुझे सूर,
असे तनमनी भिनले....
विसरलो मी मलाही क्षणभर
पाऊल जागीच थबकले...
मी लिहील अखंड..
तुझ्यासाठी...
तुझ्या सुरांसाठी...........
जाणतो मी,
सूर तुझे,
आहेत माझ्याचसाठी........

--शब्द्सखा!

’कूळ तुमचे नष्ट व्हावे’

जयपूर मध्ये प्राण गमावलेल्यांना श्रध्दांजली.....
देश माझा मीच उसने श्वास घ्यावे
मी शिकार घरात माझ्या का ठरावे?

मांडती बाजार बडवे हे जिवांचा
का मला त्यांनी लिलावी धरावे?

मीठ खाती त्याच ताटी थुंकती हे
लोकशाही अन मागते येथे पुरावे

आपले होऊन त्यांचे वागणे हे
कुंपणाने शेत येथे मग चरावे?

भ्याड साला वार तू पाठीत करशी
एकदा रे होऊनी तू मर्द यावे

कोवळ्याशा या जिवांना मारणारे
शाप माझा ’कूळ तुमचे नष्ट व्हावे’

--शब्दसखा!

हुंदके

ऐन राती कापले का हुंदके हे?
झोपलो मी जागले का हुंदके हे?

आसवांना या ढळाया वाट नाही
पापण्यांनी व्यापले का हुंदके हे

का जरासा तुजसमोरी हासलो मी
मीच माझे दाबले का हुंदके हे?

जाळुनी गेल्या सरी मज पावसाळी
श्रावणी या तापले का हुंदके हे?

हासणे मी मागता तुजला जरासे
सांग ना तू लाभले का हुंदके हे?


--शब्द्सखा!

श्वास माझ्या श्वासांत दरळले

सूर माझे जुळले
सूर तुझे जुळले
कसे गं हे नाते
सुरांचे सुरांना कळले?

सूर शब्दात तुझ्या
सूर साजात तुझ्या
जीवनात माझ्या गं
कसे हे सूर तुझे ढळले?

तुझे गीत
तुझे सूर
तुझे प्रेम
तुझे श्वास माझ्या श्वासांत दरळले...

--शब्द्सखा!

माझे सूर

तुझ्या शब्दांनीच
माझ्या सुरांना साज येतो...
कधिचे मूक झालेले सूर माझे
तुझ्या शब्दांनी त्यांनाही आवाज येतो....
तुझे शब्दच गं
या जीवनाचे सूर झाले
माझ्या नकळत तुझ्या शब्दांसाठी
माझे सूर आले....

--शब्द्सखा!

तुझे सूर

तुझी पैजणं...
तुझी कंकणं...
तुझे श्वास..
तुझे भास...
सूर तुझे असे भोवताली..
मन वेडे, कावरे बावरे...
तुझ्या पापण्यांत वावरे
तू श्रावणाची सर चिंब..
तू माझेच प्रतिबिंब....
सूर तुझे मधूर
मनास असे हेलावती....
माझ्या उनाड शब्दांनाही...
तुझे सूर तालात बांधती....


--शब्द्सखा!

तुझ्या सुरांना फ़क्त आठवत

तुझ्या सुरानेच तर
पावलं अडखळली जराशी...
त्यालाही नाही होता आलं मीरेचं..
माझंही तेचं झालं..
तोही बंधनात अडकला होता..
अन मीही...बंधनात...
कदाचित ही बंधनं,
तुझ्या सुरांना वरचढ ठरलीत.........
.......आणी आता,
अता जगण्याची बंधनं आहेत...
तुझ्या सुरांना फ़क्त आठवत.................


--शब्दसखा!

सुरांच्या या पावसात

चिंब पाऊस..
सोबतीला तुझ्या सुरांची मैफ़ल...
तुझ्या सुरांच्या तालावर बरसणारे
ते सरिंचे थेंब...
गिरक्या घेणारी ती झाडं...
खुलणारी फ़ूलं.........
वेडा पाऊसही माझ्यासवे
तुझ्या सुरांत चिंब भिजलेला...
आता थांबवू नकोस तुझे सूर
मला आयुष्यभर भिजायचंय..
तुझ्या सुरांच्या या पावसात....

--शब्द्सखा!

शान

येतसे क्षण जातसे क्षण भान नाही
’त्या’ हिशेबी वाटते हे पान नाही

शब्द माझे गं हे तुझे दास झाले
ओठ तू अन मी तुझे का गान नाही

का तुला मी अन मला तू आठवावे?
जिंदगी हे आठवांचे रान नाही

सोडतो मी सुरांच्या या मैफ़लींना
गायिले मी उमजणारे कान नाही

मी उगा का ही दयेची भीक मागू?
भास्कराला सावल्यांचे दान नाही

वादळांना कापताना श्वास सरला
हा किनारा गलबताचे स्थान नाही

पेटती त्यांच्या मशाली का दुपारी?
’दीप’ जो तिमिरात त्याला शान नाही

काय वाचाळले ते? मी चोर होतो?
--शब्द्सखा!

मी गीत...माझे सूर तू

मी गीत...माझे सूर तू
मी रात...माझी भोर तू
मी देह...माझे श्वास तू
मी रुक्ष...माझी आस तू
मी प्रवासी...माझी वाट तू
मी किनारा..माझी लाट तू
मी मौन...माझा आवाज तू
मी गौण...माझा साज तू
मी जरासाच...तू खुप आहे
मी तुझ्या..तू माझ्या अंतरी राहे

--शब्द्सखा!

प्रवास

काळोख काजळाहुनी गहिरा...
पानांची सळसळ...
अंगाला थरकाप....
चंद्रही रुसलेला या रातीला...

पावलं झपझप चालतात..
वाट मीळेल तिकडे वळतात...

भरकटतेय मी दिशाहीन,
वादळात सापडलेल्या गलबतासारखी
मनी विचार डोकावतो जरासा,
उद्याची सकाळ येईल????
...
...
अन तेव्हा,
अगदी त्याच क्षणी
तुझे सूर घुमू लागतात कानी..
वाट सापडते जीवनाची..
अन सुरू होतो तुझ्या सुरांच्या दिशेनं माझा प्रवास....

--शब्द्सखा!

प्रेमधून...

किती रे वेड लावशील?
तुझ्या या नादमय बासरीने..
हरवायला होतं..
पाऊल नीघता नीघत नाही....
उन पाऊस..पावलं काहीच बघत नाही...
जरी मी म्हणते,
थांबव तुझी बासरी...
तरीही तू छेडत रहा तीच धून...
प्रेमधून...
काळजात उतरते...
तुझं प्रेम बनुन!

--शब्दसखा!

तुझे हट्ट

हे गं काय तुझ?
कधिही आपलं म्हणतेस,
" ...मला काही शब्द दे..
...प्रेम उधळ शब्दांतुन तुझं...
...मला तुझ्या शब्दांत हरवू दे..."
असले काहिशे तुझे हट्ट...
पण खरं सांगू?
आवडतात तुझे असले हट्ट...
कुणाला बोलू नकोस,
पण मनातलं सांगतो...
मलाही नाही समजत,
तुझ्यासाठी कसे... कुठुन येतात माझे शब्द...पाऊस बनुन......

--शब्द्सखा!

माझा होऊन जरासं जग रे...

माझं ’मी’पण विसरले रे मी...
तुझी... फ़क्त तुझी उरले रे मी...
तुझ्या शब्दांनी प्रीत सजते...
तुझ्या सुरांत चिंब भिजते..
मी श्यामवेडी राधिका...
बासुरी तू...धुंद मी गोपिका...
सजणा,
तुही जरासं तुझं ’तू’पण विसर रे...
माझा... फ़क्त माझा होऊन जरासं जग रे...

--शब्द्सखा!

तू आहेस म्हनूनच

माझ्या शब्दांचं तुझ्यासाठी झुरणं
माझ्या स्वरांचं तुलाच पुकारणं...
मग माझे शब्द अन माझे सूर
तुझ्यापासुन वेगळे कसे...
सांग ना?
अगं वेडे,
तू आहेस म्हनूनच,
माझे सूर या शब्दांना आळवतात...
तुझ्यावीणा माझे सूर अपुर्ण...
तुझ्यावीणा माझे शब्द जीर्ण...

--शब्द्सखा!

सूर

कुठंतरी सूर घुमतायेत..
अगदी काळजाला भिडणारे..
काळजाला साद घालणारे..
आपलेसे वाटणारे..
वेडापिसा होतोय आता...
कुंठं?कोण?माझ्यासाठी?
का सापडतं नाहिये मला?....
अगं राणी,
माझ्या शेजारी बसुन,
मनातल्या मनात मलाच पुकारते आहेस?

--शब्द्सखा!

ओळख

तुझ्यावर प्रेम करताना
हे आयुष्य अपुरं पडलंच कधी तर..
हे शब्द आहेत माझे..
तुझ्यावर प्रेम करायला..
माझंच रुप तेही..
तेही तुझ्यावर तितकंच प्रेम करतात..
तेही तुझ्यासाठी तितकंच झुरतात..
फ़क्त...
फ़क्त तू त्यांना तुझी ओळख दाखवं.....माझी सखी म्हणुन!!!


--शब्द्सखा!

साकी

सांज झाली साकी अताशा अताशा
प्यास आली साकी अताशा अताशा

आसवे माझी कोरडी ही कशी गं?
रात न्हाली साकी अताशा अताशा

वेदना अजुनी ह्या कशा जागताहे?
जाम खाली साकी अताशा अताशा

वाटते न्यावे दूर मज तू जरासे
चाल चाली साकी अताशा अताशा

विसर तू ही दु:खे तुझ्या जी उराशी
हास गाली साकी अताशा अताशा

काय उरले सोडून या मैफलींना ?
कोण वाली साकी अताशा अताशा?

----शब्दसखा!

पाऊलखुणा

मिटतील पाऊलखुणा
नवी वाट सुरु होईल
सागर किनारी पाऊलखुण
कितीशी वेळ राहील?

मी इथुन हटताच
एखादी लाट येईल
वाळुबरोबरच ती लाट मग
तुझ्या पाऊलखुणांनाही ओढुन नेईल

मीही म्हणेल जाऊदे
क्षणासाठीच होत्या तुझ्या पाऊलखुणा
तू गेलीस अन मिटल्या
तुझ्या पाऊलखुणा

पण,
पण तुझ्या आठवांच्या खुणा
रुतल्या आहेत खुप खोलवर मनात
आता का शोधू पाऊलखुणा
आता शोधतो तुझ्या आठवांना

--शब्दसखा!

पैलतीर

का जगावे? किती जगावे?
प्रश्न असे का मनी उतरावे?

कोण माझ्या सावलीत आहे?
माझेच मी किती शोध घ्यावे?

वाट एकट्याची चालायचीच आहे
वाटेला का मी उगा दोष द्यावे?

पेटत्या सुर्याला आपले म्हटलो
ऐन उन्हाळी त्याचे किती रोष घ्यावे?

धावतोच आहे..तरिही दूर अजुनी
पैलतीरानेच त्या मुद्दाम दूर जावे

--शब्दसखा!

’रात्र आरंभ’

अदृश्य रंगामध्ये मिसळुन
प्रकाशही बेईमान झाला...
सावलीही साथ सोडुन गेली
समोर उभा तो धिप्पाड अंध:कार...
मला गिळण्यासाठी..
त्या प्रकाशासारखंच...
फ़क्त एक क्षण...
माझा एकच क्षण त्याला हवा आहे..
त्या एकाच क्षणात तो जिंकेल..
पण मला,
मला प्रत्येक क्षणी जिंकायला हवं..
एकाच क्षणाची गफ़लत
आणी................
पण मला जगायचंय..
पुन्हा प्रकाश येईपर्यंत..
ह्या काळाला मला हरवायचंय..
ह्या काळरातीशी मला लढायचंय...
अहोरात्र...

सारं जग झोपेल आता
पण मला,
मला मात्र जागायला हवं त्याच्यासोबत,
कारण,
कारण ’रात्र आरंभ’ होतेय ...

--शब्द्सखा!

मुखवटे

ओढू किती मुखवटे?
शोधू कुठे मुखवटे?

का चेहरे हरवले?
उरले असे मुखवटे

खोटेच भाव सारे
येथे खरे मुखवटे

बघ पापणी ढळाली
का काढले मुखवटे?

जगणे खरे न येथे
येथे बरे मुखवटे

बाजार आज भरला
विकती इथे मुखवटे

--शब्द्सखा!

भिजलेले थेंब...

आज पुन्हा माझ्याकडे पाऊस पडला.....................................
भिजलेले थेंब आता
निथळतील पानावर
ओले थेंब...ओल त्यांची
भिज सार्‍या रानभर

वाट पाण्याखाली खोल
वर हिरवे डोंगर
निळ्या नभाळीचे मेघ
उतरले भुईवर

सर सर...सर आली
सुरा सुरात थेंब गाती
एक झुळुक वार्‍याची
कशी सरिला छेडती

एका फ़ुलावर एक थेंब
असा सजला...हसला
फ़ुल लाजले...खुलले
थेंब रुपाला भुलला

ओलं मन..ओलं तन
ओले थेंब अंगावर
आठवात एक फ़ुल
गंध त्याचा मनभर

--शब्द्सखा !

धरा भिजली भिजली

धरा भिजली भिजली
ओल्या मातीला सुवास
थेंब इवलेसे झाले
पाना फ़ुलांची आरास

चिंब पाखरांना आता
गीत प्रेमाचे स्फ़ुरले
आपल्या गं मिलनाचे
थेंब हवेत तरले

असा विसावला सये
एक थेंब तुझ्या गाली
मीही वाटे थेंब व्हावे
तुझ्या ओठांची गं लाली

थेंब कोवळे कोवळे
असे मनी पाझरती
सूर तुझ्याच प्रेमाचे
असे शब्दात झरती

ओले चिंब पावसाला
तुझ्या रुपानेच केले
भिजवुन मला थेंब
तुझ्या केसुत विरले

--शब्द्सखा!

गझल

उरावी गझल

तरावी गझल

शब्दांनी सदा

करावी गझल


भटांची मात्र

स्मरावी गझल


तनात मनात

शिरावी गझल


पुन्हा मैफ़ली

फ़िरावी गझल


मराठी शान

ठरावी गझल


--शब्द्सखा!

तुझ्या अजुन आठवणी हव्या होत्या

सांज उतरली सख्या
हळवार लाली पसरली क्षितीजावर
पाखरांचे थवे परतताना घरट्यांत
अन अशावेळी मी निघते तुझ्या भेटीला
आँफ़िस सुटल्यानंतर आपली भेटायची जागा...
ते चहाचं हाँटेल...
त्या रस्त्यावरुन मनसोक्त हिंडणं.
.दररोज जणू पहिल्यांदाच भेटणारे आपण..
पुन्हा एकदा भेटतो...आज...
तू मला घडवलंस...
माझ्याशी माझं नातं जडवलंस..
प्रत्येक क्षण जगायला शिकवलंस
इतकं सगळं करुनही सख्या
ऐन शेवटी रडवलंस..
आज दु:खी नाही रे मी
असुच कशी दु:खी...
तुझी साथ आहेच बरोबर
त्या आठवणींसंगे...
पण...तुझ्या अजुन आठवणी हव्या होत्या रे...
सख्या, थोड्याश्या आठवणी देण्यासाठी तरी ये ना रे...

--शब्द्सखा!

तुझ्या आठवणींच्या साठवणी

दीपा आणी गणेशच्या कवितेवरुन....
अपराध घडु पाहतोय पुन्हा
मन जडु पाहतंय पुन्हा
अल्ल्ड मन..वार्‍यासवे
इकडे तिकडे उडु पाहतंय पुन्हा

अन तुझाही दुजोरा
मला वार्‍याबरोबर वाहवायला
तु दुष्ट आहेस खरा
नवं जग देतोयसं मला जगायला

सिता पत्नि होती प्रभुरामांची...
मी सिता नाही रे
पण हो..पत्नि मात्र आहे तुझी
सितेसारखं थोडंसं जगु दे रे

आणी मी कुठे एकटी..
संगे आहेत की तुझ्या आठवणी
आणी घरभर दाटलेल्या
तुझ्या आठवणींच्या साठवणी...--शब्द्सखा!

तू सर्वशक्ति.. तू सर्वसाक्षी

तू सर्वशक्ति.. तू सर्वसाक्षी
तू सर्वव्यापी.. तू सर्वगुणी
तू चराचर..तू निरंतर
आशीष असुदे मी पामर
तू रात तुच दीन
जल, थल, अत्र तत्र तुच तू
अणू रेणुत व्यापलास तू
तनी मनी वसलास तू
कामधेनु तू, तुच वत्सला
तू इंद्रायणी,सावळ्या तुच विठठला
तू धरा..अंबरात साठलास तू
दशदिशा..पाताळही गाठलास तू
शोधु तुला कुठे मी?
मिटता डोळे सुडौल देह डोळ्यात दाटलास तू

!! श्रीगुरुदेव !!

कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो

देव च्या कवितेला रिप्लाय देताना.............
---------------------------------------

तू दिली डायरी जी
अजुन कोरीच ठेवली मी
का म्हणुन नको विचारुस
कारण,कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो...

कोरी डायरी माझी
अन कोरीच माझी कहाणी
वेड्या मनाला तरी वाटते का?
कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो...

मी चित्र रंगवले होते आपले
पण पाऊस कोसळला असा
जणु जाणतो तोही हे की
कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो...

सापडेल जेव्हा तुला डायरी माझी
नकोस ढाळु अश्रु एकही
राहु देत कोरेच कागद सगळे

तुही जाणशील..खरचं कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो...

डायरी कोरी असली तरी
वाटेल तशा रेघा ओढु नकोस..
अगं वेडे..कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो.

डायरीचं आयुष्य किती
ती कोरी आहे तोपर्यंतच, नंतर शब्दांची...
म्हणुनच..कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो

शब्द बरसु लागतील
पानं हरवुन जातील सगळी...कविताच उरतील
काही वेळ फ़क्त..कोर्‍या कागदांनाही अर्थ असतो

--शब्दसखा!

अखंड प्रवास

क्षणभंगुर जिणे
जिंकणे कितीक... कितीक हरणे...

एक श्वास तूटता
तुटतील सगळी नाती
हिशेब लावण्या
कित्येक क्षण जाती

सांज ढळेल कधिही
अंधार दाटेल रे
माझे कितीही म्हटले
संगे काय साठेल रे

मी कोण?
हजारो माझेच मला भास
परी मी न कुणाचा
हा फ़क्त अखंड प्रवास......................................

--शब्द्सखा!

कुंकवाचा करंडा....

दीपा आणी गणेशच्या कवितेवरुन....

सात फ़ेरे घेतले होतेस तू
सात वचनं दिली होतीस तू
सात जन्म साथ निभावणार होतास तू
झुठ सारं...
तुझी वचनं झुठ...
तुझं अस्तित्व झुठं...
अस्तित्व एकचं....मी एकटी तुझ्यावीना!
तू तर सुटलास रे..
झाल्या असतील वेदना तुला
मला सोडुन जाताना...
पण त्या क्षणभर होत्या...
अन मी...
मी मरतेय क्षणोक्षणी ..
अन श्वासागणीक सरतेय
.............सरेल मीही कधीतरी अशीच तुझ्यासारखी
कदाचित तुझ्यासाठी....
पण तोपर्यंत...
तोपर्यंत मला जगावं लागणार आहे
एकटीलाच...
तुझी विधवा म्हणुन...
एक अबला म्हणुन...
कारण...कारण आता सांडलाय माझ्या कुंकवाचा करंडा....

तुझ्या मनाशी

खेळ चांदण्यांचा तुझ्या मनाशी
आकाश दाटले तुझ्या मनाशी

मी शोधतो मलाही तुझ्या मनाशी
मी सांधतो मलाही तुझ्या मनाशी

बोलते मन हे का तुझ्या मनाशी?
खोलते गुज सारे का तुझ्या मनाशी?

सांग वेडे विचारुन तुझ्या मनाशी
काय नाते माझे तुझ्या मनाशी?

अर्पिलेस आज मज मी तुझ्या मनाशी
जोडिले नाते युगायुगांचे तुझ्या मनाशी

---शब्द्सखा!

ती आयुष्याचा श्वास झाली

वाटलं होतं,
पिंपळपान होऊन आता गळावं लागेल..
सुर्य पेटताना,
निखारा होऊन मलाही जळावं लागेल..

पावलांनाही समजावले
चालता किती जरी... वाट ही संपेना
कुठे जायचे...किती चालायचे
वाटेलाही अताशा उमजेना

घ्यायचाच होता श्वास शेवटाचा

ती श्रावणाची सर आली

ग्रिष्मातही वसंत खुलला
ती आयुष्याचा श्वास झाली

--शब्द्सखा!

परदेस

कसे जगावे येथे?
कसा हा देस आहे?
न्याराच रंग येथे
आगळा भेस आहे...
मी दूर येथे
मलाच शोधताना...
येथे कोण माझे
प्रत्येक घराला वेस आहे...
प्रत्येक वाट अनोळखी
अन काट्यातुन जाते...
प्रत्येक पावली येथे
उभा दरवेश आहे...
दूर देस माझा
फ़ुलांनी नटलेला
फ़ुलाला गंध खोटाच जेथे
असा हा परदेस आहे...

--शब्दसखा

आज मन वेडं...

आज मन वेडं...
आज मन धुंद
तुझ्या आठवणींत सारं सारं बेधुंद
तुझा स्पर्श, तुझे श्वास..
माझ्या शद्बांनाही तुझे भास
तुला लिहीतो तुला पाहतो
तुझ्यासवे हा अखंड प्रवास
उडावे आज अंबरी
तुझ्या अंगणी यावे
तुला पाहता क्षणात
त्या क्षणात जगुन घ्यावे

--शब्दसखा

कविता तुला वाहीलेली

अशी भर दुपार
बाहेर रणरणती उन्हं...
तुझ्या आठवणीच फ़क्त
बाकी सारं सारं सुनं
सुकलेली झाडं
सुकलेली पानं
तुझ्या आठवणीत माझं
विरहाचं गाणं
पुन्हा एक कविता
तुला वाहीलेली
पुन्हा माझ्या कवितेत
मी तुला पाहीलेली........

--शब्दसखा

कविता तुला वाहीलेली

अशी भर दुपार
बाहेर रणरणती उन्हं...
तुझ्या आठवणीच फ़क्त
बाकी सारं सारं सुनं
सुकलेली झाडं
सुकलेली पानं
तुझ्या आठवणीत माझं
विरहाचं गाणं
पुन्हा एक कविता
तुला वाहीलेली
पुन्हा माझ्या कवितेत
मी तुला पाहीलेली........

--शब्दसखा

पुन्हा सांजवेळ...

पुन्हा सांजवेळ..
.तुझ्या आठवांचा मेळ
पुन्हा चांदरात...
चांद पुन्हा भरात
तुझा गंध सभोवार...
हवेत दाटलेला
तुझ्या आठवणीत मी...
ओलाचिंब पेटलेला
तुला लपेटुन घ्यावं
तुझं होऊन जावं
तुझं सौदर्य आज सखे
तुझ्या नजरेने प्यावं...

--शब्दसखा

रात ही जाईना

शब्दात आता
प्रेम तुझे येईना
गीत माझे
प्रेम तुझे गायीना
काय झाले?
तू असे काय केले?
आता जराही
मी माझाही होईना
मला मी संपवावे
तुला सर्वस्व वरावे
पहाटेची वाट पाह्तो
रात ही जाईना

--शब्दसखा

तुच मी.....मीच तू

गीत मी.... आवाज तू
प्रेम मी..... साज तू
देह मी......श्वास तू
चांद मी.....रास तू
रात मी.....भोर तू
प्यास मी...घन घोर तू
कोण मी....कोण तू?
तुच मी.....मीच तू

--शब्दसखा!

सागर किनारे

सागर किनारे दूर दूर पसरलेले..
ओली वाळु...वाळुत मोती विखुरलेले...
तुझा गंध सांजवेळी...सांज बावरली जराशी
तुझ्या ओठांची लाली दूर त्या सागराशी
लाट एक तुज अशी भिजवुन जाते
वेडावतो मी मज ती रिझवुन जाते...

--शब्दसखा!

गालीचा

हातात हात तुझा
दूरवर पसरलेली वाट
तू शांत, मी शांत
निर्मोही अन निशब्द पहाट
गुलाबी थंडीचा
असा रंग ओला
या पहाटेस आज
तुझा साज आला
जरा थांब येथे
अजुन वाट दूर आहे
सखये पहाट ढळण्या
अवकाश भरपुर आहे
रातराणी अजुन खुललेली
प्राजक्तही आता बहरलेला
तुझ्या माझ्या वाटेवर
दोघांनीही गालीचा थाटलेला

--शब्दसखा

उन्हाचा रस्ता

तू चांदणी
अशी नभात चमकशी
मी पाहतो तुला
साहतो तुझ्या आठवाला
कधी धुंद व्हायचो
प्रेमात बेभान गायचो
शब्दांचे आता रिक्त रकाने
सुनेच आता हर एक गाणे
पहाट उजाडेल आता
चांद बुडेल आता
होईल सुना चांदण्याचा सूर
उन्हाचा रस्ता दूर दूर.....

--शब्दसखा

आतुरलेला चांद

कसा चांदण्यांना
आता नूर आला
तुझ्यासवे हा
कसा सूर आला
मी होतो कधिचा
आठवांशी झगडताना
तुझ्यासवे हा
नशेचा पूर आला
तू का अशी दूर सखये
आतुरलेला चांद मी
चांदणीसाठी बघ ना
किती दूर आला

--शब्दसखा

हक्क माझा ठरवुन दे

तू गंधाळलेली अशी
या अल्लड राती
सावरावे कसे मी
श्वास हर एक तुझे गीत गाती
तुझ्या केसुत
रात हरवली गर्द आज
दे उब प्रेमाची
बघ रात ही सर्द आज
लपेटुन घे मला तू
आज हरवुन दे मला तू
तू कोण, मी कोण तुझा
हक्क माझा ठरवुन दे मला तू

--शब्दसखा

येतेस माझ्या कवितेत?

चलं, आज माझ्या कवितेत हरवुयात दोघं...
खुप खुप दूर जाऊयात...
खुप खुप धुंद होऊयात...
चंद्राच्या कुशीत निजुयात....
गुलाबाच्या फ़ुलात भिजुयात...
श्रावणसरींत भिजवेल तुला..
मिठीत माझ्या थिजवेल तुला..
.माझी गीतं गातील तुला
शब्दसुमनं वाहतील तुला..
सप्तरंगी सूर सारे
आसमानीचे इथे नूर सारे..
दव अम्रुताचे इथे शिंपलेले..
चित्र वाटेल कुणी हे काढलेले
रात शराबी नशेत तुझीया
पहाट गुलाबी मस्तित तुझीया..
इंद्रधनु इथे रंग मुक्त होऊन उधळेल...
हर एक रंग तुझ्या केसात माळेल
शब्द हरएक तुझ्यासाठीच लिहील मी
तू गुणगुणावे मला अन तुला गायील मी..
सांग, येतेस माझ्या कवितेत ?माझ्यासवे.....

--शब्दसखा

तुझी वाट..

पहाटेचं दाटलेलं
अंधुकसं धुकं...
अन मी चालतोय
तुझी वाट..
दव लेवुन
खुललेली पानं..
हलकाच स्पर्श त्यांचा
मझ्या तनामनाला...
तू समोर येता
एक तारा निखळला
मज आधीच मिळाले जे
तो ज्यासाठी ढळला...

--शब्दसखा!

आठवण आज भिजणार आहे...

पावसाची टपटप अशीच सुरु राहणार आहे...
अन त्याच्या हरएक थेंबात
तुझी हर एक आठवण आज भिजणार आहे...
काही थेंब त्याचे
मला भिजवुन जातील, मला खिजवुन जातील
जरा वेळ थांबला असं वाटेल
पण पुन्हा एक जोरदर सर येणार आहे...
तुझी हर एक आठवण आज भिजणार आहे...
अंगाला हलकाच स्पर्श थेंबाचा
अगदी हळुवारपणे झाला
मन कावरे बावरे जरासे.......
पण क्षणात ते सावरणार आहे...
तुझी हर एक आठवण आज भिजणार आहे...
वीज... दूर नभी एक गर्जुन गेली
माझी मिठी तुझ्यावीणा
उगाचच....आता घट्ट होणार आहे
तुझी हर एक आठवण आज भिजणार आहे...
संपली सर...थांबले थेंब पावसाचे
आभाळ दाटले जे मनी
आता ते बरसणार आहे.........तुझी हर एक आठवण आज भिजणार आहे...

--शब्दसखा!

वाटही माझ्यासवे आसवांत भिजलेली...

हा पसारा चांदण्यांचा
आता उठणार आहे
आठवांचे ठसे हजारो
मागे वठणार आहे
तुझ्या पावलांचे
आवाज रुणझुण.....
खोटेच भास सारे
कानात खोटीच गुणगुण...
ती वाट अजुन तशीच
शांत निजलेली....
तू दूर चालुन गेली
वाटही माझ्यासवे आसवांत भिजलेली...

---शब्दसखा!

तू श्रावणाची सर

तू श्रावणाची सर................चिंब चिंब
भिजवी मला तुझ्या प्रेमाचा...थेंब थेंब
मिठीत तुझ्या मी..............दंग दंग
शहारते माझे हे.................अंग अंग
कसा हा जडला तुझा...........संग संग
कसा उधळला तू................रंग रंग
दाटला सभोवार तुझाच.........गंध गंध
श्वासात भरुन तुला जाहलो...धुंद धुंद
रेशमी केसुंचे हे तुझे...........बंध बंध
वाढते श्वासांची लय हलकेच...मंद मंद

--शब्दसखा!

तू श्रावणसर

सखे, मी मला ओळखतो
तुझी साथ आहे म्हणुन...
तुझ्यावीना... तसा मी काय गं?
एक श्वास घेणारा देह फ़क्त....
तू मला जगवलंस...
तू मला फ़ुलवलंस
स्व:तचे रंग दिलेस सारे
अन..तू मला खुलवलंस...
अशीच रहा नेहमी माझ्यासोबत
मला गरज आहे तुझी
मला ठाऊक आहे,
मी चालेल जेव्हा भर उन्हातुन
तू श्रावणसर होऊन कोसळशील....

--शब्द्सखा!

या रातीची तू पहाट होतेस

रात्र होता काळोख गहिरा होतो...
निरव शांतता दाटलेली...
अशात काळोख मला वेढुन घेतो
मी शोधतो मला अन अधिक हरवुन जातो
कुठे वाट अन मी कुठे जात आहे
कसेतरी मी कुठे थबकुन घेतो...
रात्र ही कधिच आता संपणार नाही वाटते
काळोखाचीही सभोवार सावली दाटते
तेव्हाच तू येतेस
मला तुझा प्रकाश देतेस
मीही मग उजळु लागतो
या रातीची तू पहाट होतेस

--शब्द्सखा!

सखी सोनकळी

सखी सोनकळी..नाजुक बाहुली
सखी पावलागणीक माझ्या.. माझीच साऊली...
सखी सैरावैरा धावणारा बेधुंद वारा
सखी माझी...माझ्यासाठी निखळणारा तारा...
सखी सागराची लाट ..अल्लडपणे झुलणारी
सखी शांत, गहिरी रात ..चांदण्यांत खुलणारी...
सखी सांजवेळ गुलाबी...माझ्याचसाठी सजणारी
सखी दवात न्हालेली सकाळ...हलकेच गाली लाजणारी...
सखी श्रावणाची सर...मुक्त होऊन बरसणारी..
सखी शब्द शब्द, सखी अर्थ अर्थ माझ्या कवीतेत उतरणारी...

--शब्दसखा!

प्रेम तुझे

सात रंगात आज नहाले प्रेम तुझे...
नितळ, निर्व्याज जाहले प्रेम तुझे..
शब्दात माझिया या साठले प्रेम तुझे...
सुरांनी माझिया या गायीले प्रेम तुझे...
श्वास माझा प्रत्येक जगतो प्रेम तुझे...
क्षण माझा हर एक जिंकतो प्रेम तुझे...

--शब्दसखा!

तुझ्यापुढे सखये...सारंच फ़िकं

पुन्हा रात आली...
चांदण्यांची बारात आली...
वाहणारा गंधित वारा...
चांदण्यांच्या चंचल शुभ्र धारा....
रातराणी गंधाळलेली...
तुझिया गंधास जणु ती माळलेली...
चांद उगाच सजलेला ...
पाहुन चांदणीला जरासा लाजलेला...
नदीचा काठ... हलकासा सूर..
नदीला आलेला सागराचा पूर...
तुझ्याच वाटेवर दाटलेलं धुकं....
ही रात, चांदणी, चांद, रातराणी तुझ्यापुढे सखये...सारंच फ़िकं................

--शब्द्सखा!

सखी वाटते कविता माझी

प्राजक्त होऊन बरसते कविता माझी
रातराणी होऊन गंधाळते कविता माझी
अस्तित्व माझं जपते कविता माझी
शुन्य होतो मी..... जेव्हा लपते कविता माझी
मनात अशी दाटते कविता माझी
अलगद शब्दांत साठते कविता माझी
मनातले ओठी आणजे कविता माझी
भेद मनातले सारे जाणते कविता माझी
बनुन श्वास तनामनात भिनते कविता माझी
शब्दसखा मी...सखी वाटते कविता माझी.

--शब्द्सखा!

कविता म्हणजे सोबतीण

शब्दांना सापडलेला मी म्हणजे कविता
शब्दांना आवडलेला मी म्हणजे कविता
भयाण रातीलाही काजव्याचं चमकणं म्हणजे कविता
अन पहाटेचं माझ्यासाठी क्षण्भर थबकणं म्हणजे कविता
कविता भिनलेली तनी मनी
कविता म्हणजे अर्धांगिनी..
कविता म्हणजे वसंताची सावली
कविता म्हणजे सोबतीण पावलोपावली...


--शब्दसखा!

कविता

अंधार गडद दाटता...
मी चक्रावतो...
कुठे जायचे?
कुणा शोधायचे?
जड पावलांना किती ओढायचे?
नजरेआड झालेल्या वाटा...
हरवलेले साखे सांगाती...
मी एकटा..
तीही एकटी......
या एकट्याला ती
अशी साथ देते..
कविता म्हणवत स्व:तला
शब्दांत माझ्या फ़ुलारुन येते

--शब्दसखा!

पुन्हा सजुन ये तू..

गहिर्‍या शांततेत या
मौन तुझे नी माझे
का असे ऐनवेळी बहरले?

हा दुरावा उगी का?
जाणुन जणू भेद मनीचे
तुझ्या पैजणांचे नाद झंकारले

हात हाती तुझा
आकाश चांदण्यांनी पेटले
श्वास गंधाने भारले

निरखुन तुला मी
नजरेत तुझ्या वीरुन जातो
होतो अताशा..अताशा सारे हारले

निखळला एक तारा...
तू मला मीळावी
त्याने हे उशिरा जाणले...

दव गाली तुझ्या...
रंग खुलुन आले
गंध प्राजक्ताचे भोवती दरवळले

रात सरली..
तरी मौन होते
नजरांनी नजरांना कित्येक इशारे केले

पुन्हा सजुन ये तू..
नजरेत विरुन जा तू..
जाताना मन हेलावुन गेले...

शब्द -- संदीप सुरळॆ

अस्तित्व

रात्र होता
तुझ्या साम्राज्याचा पाया मजबुत होतो
जगमगत्या जगाला
अगदी श्वासालाही कंप फ़ुटतो
हळुहळु तू गहिरा होत जातो
मलाही माझ्यापासुन हिरावुन घेतो
मी शोधतोच वाटा या काळोखात
पण महाकाय सावलीत तुझ्या हरवुन जातो
झाडं, पानं, फ़ुलं..
सारे सारे क्षणात हरवतात
दीवसभर फ़ुलांचे रस्ते
आता काटे रस्त्यावर दाटतात
सावलीही माझी मला सोडुन जाते
तीही तुझी आश्रीत होते

माझं अस्तित्व वीरु लागतं
नाईलाजाने तुझं अस्तित्व मान्य होतं
मीही मग थांबुन घेतो...
तुझ्या वीरण्याची वाट पाहतो...
शब्द -- संदीप सुरळॆ

बेनाम कवीता

बेनाम कवीता माझी
बेनाम राहणार आहे
कवीतेत तुच माझीया
तुला न ती सांगणार आहे
आले गेले कित्येक ऋतु
ओले, कोरडे शब्द झाले
शब्द माझे जगणार आहे
कवीता ही खुलणार आहे
कधि मी सांजवेडा
कधि मी उन्मुक्त झुला
मलाच शब्दात मी
आता मांडणार आहे
कधि रात...दीस कधि
सप्नातही मी जागणार आहे...
शब्दात मीच माझ्या
शब्दांस माझ्या मी उमगणर आहे..


--शब्द्सखा!

शब्द माझे

माझ्या भावनांचा
अविष्कार आहे
माझिया स्वप्नांचा
हा आकार आहे
शब्दांचा माझ्या
मला आधार आहे
शब्दात माझ्या
जीवनाचा सार आहे
शब्द माझे कधि
घोर प्रहार आहे
कधि प्रेमळ ते
अगदी हळवार आहे
शब्द माझे हे
माझाच अवतार आहे
मी अन शब्द माझे...एकतार आहे

--शब्दसखा!

दुपारी

अशाच एका भकास तापलेल्या दुपारी..

घरात उन्हं...दारात उन्हं..
जळलेली शरीरं..करपलेली मनं...
रस्त्याच्या कडेला रडणारं पोर
मातीला उगाचच चाटणार ढोर
वाळलेलं झाडं...वाळलेलं पान...
प्रत्येक जीवानं जपलेला त्राण..
डोळ्यात उभी कोरडीचा आसवं
रस्त्यावर दाटलेलं पाणी फ़सवं
जळालेली शेतं...जळालेली रानं..
पाखरांच्या ओठात उदास गाणं..
विहीरीत खोल काळे खडक..
पेटलेला सुर्य लालभडक...
दावणीची दावं तुटणारी...
वासरांची घरं सुटणारी
महाग पाणी...अश्रु स्वस्त...
Koradyaa आशांवर Koradiच भीस्त..
उन्हाचं तांडव पावलोपावली..
सावलीही आता शोधते सावली..
वावटळीनं घेतलेला तांबुस रंग..
झाडांची झालेली आखुड अंगं..
सुकलेले अंगण..सुकलेला पार...
सुकलेल्या शेतांचे मनावर वार...
जमीनींना रुतलेल्या खोल खोल भेगा..
भेगांनी घेतलेल्या झर्‍यांच्या जागा..
भयान रात्रींना अंधार गडप..
चांदण्यांचा पाऊस..कोरडीच सडक..
दूर कुठेतरी एक ढग आकाशात दिसतो..
म्हातारा नातवासमोर खोटंच हसतो..

शब्द --संदीप सुरळे

विसावा

नजरेत भाव तुझिया
नजरेत ठाव तुझिया

का छेडशी अशी मज?
नजरेत घाव तुझिया

नजरेस खेळवी तू
नजरेत डाव तुझिया

तू चोरशी अशी मज
नजरेत माव तुझिया

भिडतेस काळजाशी
नजरेत धाव तुझिया

घेतो जरा विसावा
नजरेत गाव तुझिया

--शब्द: संदीप

वाटा

पाहुनी मज का अताशा वळतात वाटा ?
ओळखीचा मी जरी का छळतात वाटा ?

मृगजळाचा मी शिकारी हे जाणतो मी
वास्तवाला पाहुनी या पळतात वाटा

सावल्याही पेटल्या का या पावसाळी ?
वाळवंटी दूर कोठे जळतात वाटा

पापण्यांनी पाझरावे का ऐनवेळी ?
आठवांना का तुझ्या गं कळतात वाटा ?

छेडता मी जोगियाला तू आठवावे
मैफ़लींना का तुझ्या ह्या मिळतात वाटा ?

चालण्याला मी अताशा सुरवात केली
मी क्षितीजा गाठले की खळतात वाटा

सावल्या

शब्द त्यांचे पाळती ना सावल्या या
चालता मी जाळती मज सावल्या या

वादळांना मी सहारा देत आलो
रात होता का पळाल्या सावल्या या ?

तू अशी का सांग झाली पाठमोरी
थांब थोडी शोधतो मी सावल्या या

का वसंती या उन्हांना जोर आला ?
पेटलेल्या पावसाळी सावल्या या

मी वदंता ही कुणाला ऐकवावी ?
आसर्‍याला आज आल्या सावल्या या

व्यास

कोण आले? हा कुणाचा भास आहे?
सांजवेळी ही कुणाची आस आहे?

मी भिकारी माझियाही आसवांचा
कोरडी ही पापण्यांची प्यास आहे

पारध्याला मी उगा का दोष देऊ?
हा गळ्याला नेहमीचा फ़ास आहे

बैसलो मी मैफ़लीला या तुझ्यारे
सांग साकी काय आता खास आहे?

मावळावे का तुझ्या ही आठवांनी
वाटते हा शेवटाचा श्वास आहे

ढाळसी का आसवांना या तुझ्या तू
ओंजळीत तुझ्या अता मधुमास आहे

माझिया का या शब्दांना भाव यावा?
मी कुठे बोललो ’मी व्यास आहे’ ?

भास

हा तुझा जो भास आहे,
भास असला तरी खास आहे
कॊण आपले हमरस्त्यावर नेहमी?
सवंगडी काही क्षणांचा हा श्वास आहे

शोध तू, तू कोण? काय? का?
व्यर्थ सारेच इथे फ़ास आहे

फ़सवे सारेच इथे... अगदी भासही
भास होण्याचाही इथे आभास आहे

शब्दांना तुझ्या जन्म दिलास तू
वेल उभारेल ही अंगणी असा कयास आहे..

--संदीप

दिलं घेतलं संपलं

दिवस ढळला?
अरे पुन्हा उगवेलच की...
आजच उगा मी
उद्याची वाट का पाहतो आहे?

आजचा खेळ संपला?
अरे उद्याचं उद्या बघु
उद्यासाठी मी
आजच का जागतो आहे?

सुर्य नाही का
रोज जातो - येतो
मग मी का अढळ होऊन
रोज इथेच थांबतो आहे?

मी काय मागतो आहे?
मी कुणाकडं बघतो आहे?
दिलं घेतलं संपलं की सारं
अजुन कशाला जगतो आहे?

--संदीप

कातरवेळ.....पुन्हा येईपर्यंत

पुन्हा आली कातरवेळ,
पुन्हा आठवणींचं जाळं पसरु लागलं सभोवार...
पुन्हा एक नवी मैफ़ल सजेल आता आठवांची
,पुन्हा एकदा मी माझा उरणार नाही...
पुन्हा एकदा मी एकटा ठरणार नाही...
गेलेले कित्येक क्षण आता पुन्हा भेटतील मला...
आणी हो, या प्रत्येक क्षणाबरोबर तू आठवशील...
तुझं हसणं आठवेल, तुझं रुसणं आठवेल..
तुझं असणं आठवेल, तुझं नसणं आठवेल...
तू गायलेल्या ओळी आठवतील....
ती रातराणी आठवेल, तो प्राजक्तही आठवेल...
ती गुलाबी सांज, ते सागर किनारे आठवतील....
तुझं लाजणं आठवेल,
माझ्या मिठीत तुझं हळुवार थिजणं आठवेल....
सारं सारं आता एक एक करुन डोळ्यासमोर येईल..
तो चंद्र ज्याला बघुन तू काही निरोप पाठवायचीस माझ्यासाठी
तोही आठवेल आता...
ए, तू आजही तसेच निरोप धाडतेस का गं माझ्यासाठी?
सांग ना...बघं, चंद्र तर कधिचा आला आहे....
......
ठाऊक असतं मनाला,
या जाळ्यात आता मी गुंतलो जाणार,
वेढलो जाणार पुरता....
अगदी स्व:तलाही विसरेल इतका...
पण तरीही वाटतं,
वेढुन घ्यावं स्व:तला या आठवणींच्या जाळ्यात....
कातरवेळ पुन्हा येईपर्यंत.....

दगड

कधि पाऊस झेलायचा, कधि वादळ पेलायचा
कधि उन्हात तळपायचा, कधि थंडीत कुडकुडायचा .... तो होता एक दगड!
एकलाच होता, त्याला वाटायचं आहोत आपण एकलेच...
सवय करुन घेतली त्याने एकलेपणाची.
तो आणी त्याचं एकलेपण जगायचे एकमेकाची साथ देतज
गात राहुनही जगापासुन खुप खुप दूर
कधि वाटलं नाही जगात यावं...
थोडसं जगासारखं जगावं...
जगाला एका वेगळ्या नजरेनं बघावं...
आनंद मानलेला त्यानं त्याच्या आयुष्यात...कारण तो होता एक दगड!
एक दिवस खुप वेगळा उगवला.
कुठुनतरी कुणीतरी आलं...अगदी अचानक...
तो चक्रावला जरासा, इतक्या आनंदाची सवय नव्हती कधि त्याला.
ते कुणीतरी त्याला फ़ुलं वाहुन गेलं...
ते कुणीतरी त्याला नजर भरुन पाहुन गेलं...
जग अचानक बदललं..
उन, वारा, पाऊस आता त्याला आपलेसे वाटू लागले...
कुणीतरी आपल्याला मानतं म्हणुन दगडालाही पंख फ़ुटु लागले...
असेच दिवस सरत चालले..
.त्या दगडाला कुणीतरी देवपण दिलं..
.कुणीतरी त्याचं एकलेपण नेलं...सारं कसं अचानक झालं...
पुन्हा एक दिवस वेगळा उगवलाज्यानं देवपण दिलं तेच त्याला म्हटलं,
"तू आहेस एक दगड..."
"तू आहेस एक दगड..."
शब्द - संदीप सुरळॆ

हाक - गझल!

आसवांच्या पावसाला हाक देतो
आठवांच्या पाखराला हाक देतो

गायली तू माझिया गझलेस जेथे
मी पुन्हा त्या मैफलीला हाक देतो

काय होते सांग नाते आपले ते?
कोण माझे मी कुणाला हाक देतो?

गाव माझा दूर ना, मी दूर आहे
थांबलेल्या पावलाला हाक देतो

रात होता, गर्द मी काळोख होतो
एकटा मी हुंदक्याला हाक देतो

वाटते की आवरावा हा पसारा
संपताना संपण्याला हाक देतो?

शब्द - संदीप सुरळे

शोध - ग़ज़ल !

कोण माझे ? मी कुणाचा शोध घेतो?
जे संपले , मी तयाचा शोध घेतो

पेटलेल्या या उन्हांना सोसताना
माझिया मी सावलीचा शोध घेतो

कोरड्या या पापण्यांना ओल देण्या
आसवांच्या वाहण्याचा शोध घेतो

चांद राती साथ होती कैकदा तू
मी अताशा आठवांचा शोध घेतो

चोर होई रात माझ्या अंगणी या
मी दुपारी चांदण्यांचा शोध घेतो

हुंदक्याला जोर येतो सांगताना
मीच आता त्या यमाचा शोध घेतो.....संदीप सुरळे

मन पाखरु पाखरु

मन पाखरु पाखरु
वेड्या मायेच्या आभाळी
मन शिकार शिकार
वेडी माया ही शिकारी

मन कधि वार्‍यावर
मन कधि थार्‍यावर
वेडे मन भिरभिरे
कधि भुईवर, कधि चांदतारे

उमजेना मज
मन समजेना मज
मन गुंत्याचाच गुंता
गुंतते अजुन त्यास सोडविता

रुप नाही त्यास
नाही कुठलाच साज
परी ते इतके चंचल
की ना कुणा उमगलं

मन शब्दात येईना
मन माझेही होईना
मन परके परके
मन मनाच्याच सारखे
--संदीप सुरळॆ

गैर येथे

गालगागा गालगागा गालगागा
***************************
हुंदक्याला टाळणेही गैर येथे
आसवांना ढाळणेही गैर येथे

फूल नाही मी कुणीही हुंगलेले
तू मला का माळणेही गैर येथे?

आठवांशी का अताशा वैर झाले
आठवांना चाळणेही गैर येथे

काठ ह्या नदिचा मला हा का मिळाला?
सोवळ्याला पाळणेही गैर येथे

पान मी एक त्रासलेले...संपलेले
संपताना वाळणेही गैर येथे

चार खांदे शोधताना हार झाली
का मला 'मी' जाळणेही गैर येथे?