हर एका
सरितून
प्रेम तुझे...
अंतरी या
भिजले गं
रुजले गं
प्रेम तुझे...
चांद येई
अंगणात
शिंपडीत
प्रेम तुझे...
वेडा खुळा
चिंब होई
लेवुनिया
प्रेम तुझे...
रातराणी
खुलताना
दरवळे
प्रेम तुझे...
पालटला
ऋतू कसा
गंधाळले
प्रेम तुझे...
खुल्या नभी
चांदणीला
खिजवते
प्रेम तुझे...
कोसळत्या
प्राजक्ताला
रिझवते
प्रेम तुझे...
अंधारता
दाहि दिशा
सावरते
प्रेम तुझे...
दिशाहीन
गलबता
साथ नेते
प्रेम तुझे...
क्षणोक्षणी
बहरते
लहरते
प्रेम तुझे...
काळजाला
झंकारते
गोंजारते
प्रेम तुझे...
काळजाचा
ठाव घेते
विसावण्या
गाव देते
तोकड्या या
शब्दात मी
मांडू कसे
प्रेम तुझे?
-शब्दसखा
प्रेम तुझे
... संदीप सुरळे 0 प्रतिसाद
चारोळ्या
पावसाशी ओल्या, गूज होते पुन्हा,
मनी आठवांची, रूज होते पुन्हा
वेल्हाळ पावसा, तुझ्या पैजणाचा नाद
पैजणाशी तुझ्या, कुजबूज होते पुन्हा
--शब्द्सखा!
तोही पाऊस आठवत असेल ना,
जेव्हा मी छत्री घरी विसरायचो
तुला आवडायचं म्हणुनच
मी मुद्दाम तुला फ़सवायचो.
--शब्द्सखा!
आठवत असेल ना तो पाऊस,
ओलेती तुला चिंब करुन गेला होता.
कसा एक थेंब हट्टी त्याचा
तुझ्या ओठांवर मोहरुन आला होता.
--शब्द्सखा
तो ही पाऊस आठवेल तुला
जेव्हा मन उगाच बावरलं होतं
अन भरकटलेल्या मनांना
मुद्दामच्या अंतरानं सावरलं होतं
--शब्द्सखा
तो पाऊसही आठवणीत असेल
जेव्हा भिजलेली मनं होती
स्व:तचीच खोटी समजूत म्हणुन
दोघांनीही उगाच चोरलेली तनं होती
--शब्द्सखा
पावसालाही तुला भेटायला आवडतं
म्हणूनच मी आल्यावर तो बरसत असतो
पण तू चिंब होतेस माझ्या मिठीमध्ये
अन मग तो एकटाच तरसत असतो
--शब्द्सखा
गालावरती ओघळलेला थेंब तुझ्या
मी अलगदपणे टिपला होता
अन तुझ्या ओठांमधला शहार
मी माझ्या ओठांमध्ये जपला होता
--शब्द्सखा
तुझ्या आवडीचा पाऊस
अताशा तसा बरसत नाही
तू दूर, मी दूर, म्हणूनच
अताशा तोही तरसत नाही
--शब्द्सखा
पावसाचे काही उनाड थेंब
तुझ्या केसांमध्ये दडले होते
पौर्णिमेच्या चांदण्यांसारखे
तेही तुझ्या रेशमात जडले होते
--शब्द्सखा
ओलेती तू, अन मी ही धुंद
पाऊस अशातच कोसळत होता
तुझ्या माझ्यासवे तोही
आपल्या श्वासांमध्ये मिसळत होता
--शब्द्सखा
अश्रुंना दाखवायची गरज नसते
समोरच्याला ते कळून येतात
समजून घेणारं असतं कुणीतरी
म्हणुनच ते डोळ्यांतून ढळून येतात
--शब्दसखा
प्रत्येक वेळेस शब्दांची गरज नसते
कधी कधी तु ही हे कळून घेत जा
न बोलता काही, पापण्या मिटून
या मिठीमध्ये विरघळून जात जा
--शब्द्सखा!
नकळतपणे येणार्या शब्दांनाही
कधी बोलायचं असतं
मनात दडलेल्या गुपीतांना
नकळतच खोलायचं असतं.
--शब्द्सखा!
शब्द रडतात, अन अश्रु वाहतात
अशाच वेळी कुणीतरी येतं..
न सांगताही कुणाला,
या अश्रुंना, कुणीतरी ओंजळ देऊन जातं.
--शब्दसखा
फ़ुलपाखरासारखी चंचल अन,
वार्यासारखी अल्लड वागतेस...
मी ही उधळतो मग प्रेम माझं,
जेव्हा तू निरागसपणे मागतेस...
--शब्दसखा!
सये,
तू सोबत असल्यावर
सगळं जग सोबत असतं
तुझ्याशिवाय मात्र
माझं मनही सुनं सुनं भासतं
--शब्दसखा!
सये, तू सोबत असल्यावर
आयुष्य आहे याची हमी पटते
तुझ्यासोबत जगायचं म्हणजे
आयुष्याची दोरी कितितरी कमी वाटते
--शब्द्सखा!
सये,
तू सोबत असल्यावर
माझं "मी" पण हरवून जातं
तूच उरतेस या मनभर
हे मनच तुझं होऊन राहतं
--शब्द्सखा
सये,
तू आहेस म्हणूनच
प्रत्येक क्षणाला अर्थ आहे
तुझ्याशिवाय जणूकाही
हा श्वासही व्यर्थ आहे
--शब्द्सखा!
सये,
तुझ्याशिवाय या शब्दांचं बरसणंही
अताशा तोकडं वाटू लागतं
डोळ्याच्या कडा ओलावतात आणि
मनात आठवणींचं आभाळ दाटू लागतं
--शब्दसखा
... संदीप सुरळे 0 प्रतिसाद
पाप
मना, किती हे व्याप रे...
क्षणाक्षणाला ताप रे!
कोण जाणे मागल्या जन्मी ,
काय घडले पाप रे !
... संदीप सुरळे 0 प्रतिसाद
आज व्हलेन्टाइन्स डे...
आज व्हलेन्टाइन्स डे,
पुन्हा तुझ्या आठवणींना उजाळा,
पुन्हा आठवणींत भिजलेली दोन गुलाबाची फुलं,
जपून ठेवलेली तुझी ग्रीटिंग कार्ड्स
काही निवडक एसएमएस,
अजून बरच काही.
अन सोबतीला "तो" एक दिवस आठवणीनी लगडलेला,
अगदी मंतरलेला.
सगळं वातावरण उल्हासीत,
अगदी एखाद्या सणावारासारखं.
तसे नेहमीच भेटायचो आपण,
पण तो दिवस वेगळा होता,
फ़क्त प्रेमाचा होता.
अल्लड, हसरी तू...
त्या दिवशी अजुनच सुंदर दिसत होतीस.
केसातल्या फ़ुलालाही तुझ्या शोभा आलेली.
जणु, प्रेमाचे रंग चहुवार उधळलेले होते त्या दिवशी...
अजूनही आठवते,
त्या दिवसाची ती संध्याकाळ,
समुद्रकिनार्यावरची..
माझ्या खांद्यावर मान ठेवुन सगळं विसरलेली तू,
माझ्या कानात घुमत असलेला तुझाच आवाज,
तुझ्या डोळ्यांतून ओथंबणारं प्रेम.....
अन तू घट्ट धरलेला माझा हात,
कधिही न सोडण्यासाठी...
जर ठाऊक असतं की,
विरहात झुरावं लागेल दोघांनाही आयुष्यभर,
तर, प्रत्येक दिवस Valentine's Day म्हणुन सजवला असता मी...
आता, ना Valentine आहे, ना Valentine's Day...
पण हो,
तू दिलेलं ते गुलाबाचं फ़ुल अजून डायरीत आहे!
डायरीची पानंही गुलाबी झालीत आता तर...तुझ्यासारखी!
--शब्द्सखा!
... संदीप सुरळे 1 प्रतिसाद