चारोळ्या

पावसाशी ओल्या, गूज होते पुन्हा,
मनी आठवांची, रूज होते पुन्हा
वेल्हाळ पावसा, तुझ्या पैजणाचा नाद
पैजणाशी तुझ्या, कुजबूज होते पुन्हा

--शब्द्सखा!

तोही पाऊस आठवत असेल ना,
जेव्हा मी छत्री घरी विसरायचो
तुला आवडायचं म्हणुनच
मी मुद्दाम तुला फ़सवायचो.

--शब्द्सखा!

आठवत असेल ना तो पाऊस,
ओलेती तुला चिंब करुन गेला होता.
कसा एक थेंब हट्टी त्याचा
तुझ्या ओठांवर मोहरुन आला होता.

--शब्द्सखा

तो ही पाऊस आठवेल तुला
जेव्हा मन उगाच बावरलं होतं
अन भरकटलेल्या मनांना
मुद्दामच्या अंतरानं सावरलं होतं

--शब्द्सखा

तो पाऊसही आठवणीत असेल
जेव्हा भिजलेली मनं होती
स्व:तचीच खोटी समजूत म्हणुन
दोघांनीही उगाच चोरलेली तनं होती

--शब्द्सखा

पावसालाही तुला भेटायला आवडतं
म्हणूनच मी आल्यावर तो बरसत असतो
पण तू चिंब होतेस माझ्या मिठीमध्ये
अन मग तो एकटाच तरसत असतो

--शब्द्सखा

गालावरती ओघळलेला थेंब तुझ्या
मी अलगदपणे टिपला होता
अन तुझ्या ओठांमधला शहार
मी माझ्या ओठांमध्ये जपला होता

--शब्द्सखा

तुझ्या आवडीचा पाऊस
अताशा तसा बरसत नाही
तू दूर, मी दूर, म्हणूनच
अताशा तोही तरसत नाही

--शब्द्सखा

पावसाचे काही उनाड थेंब
तुझ्या केसांमध्ये दडले होते
पौर्णिमेच्या चांदण्यांसारखे
तेही तुझ्या रेशमात जडले होते

--शब्द्सखा

ओलेती तू, अन मी ही धुंद
पाऊस अशातच कोसळत होता
तुझ्या माझ्यासवे तोही
आपल्या श्वासांमध्ये मिसळत होता

--शब्द्सखा

अश्रुंना दाखवायची गरज नसते
समोरच्याला ते कळून येतात
समजून घेणारं असतं कुणीतरी
म्हणुनच ते डोळ्यांतून ढळून येतात

--शब्दसखा

प्रत्येक वेळेस शब्दांची गरज नसते
कधी कधी तु ही हे कळून घेत जा
न बोलता काही, पापण्या मिटून
या मिठीमध्ये विरघळून जात जा

--शब्द्सखा!

नकळतपणे येणार्‍या शब्दांनाही
कधी बोलायचं असतं
मनात दडलेल्या गुपीतांना
नकळतच खोलायचं असतं.

--शब्द्सखा!

शब्द रडतात, अन अश्रु वाहतात
अशाच वेळी कुणीतरी येतं..
न सांगताही कुणाला,
या अश्रुंना, कुणीतरी ओंजळ देऊन जातं.

--शब्दसखा

फ़ुलपाखरासारखी चंचल अन,
वार्‍यासारखी अल्लड वागतेस...
मी ही उधळतो मग प्रेम माझं,
जेव्हा तू निरागसपणे मागतेस...

--शब्दसखा!

सये,
तू सोबत असल्यावर
सगळं जग सोबत असतं
तुझ्याशिवाय मात्र
माझं मनही सुनं सुनं भासतं

--शब्दसखा!

सये, तू सोबत असल्यावर
आयुष्य आहे याची हमी पटते
तुझ्यासोबत जगायचं म्हणजे
आयुष्याची दोरी कितितरी कमी वाटते

--शब्द्सखा!

सये,
तू सोबत असल्यावर
माझं "मी" पण हरवून जातं
तूच उरतेस या मनभर
हे मनच तुझं होऊन राहतं

--शब्द्सखा

सये,
तू आहेस म्हणूनच
प्रत्येक क्षणाला अर्थ आहे
तुझ्याशिवाय जणूकाही
हा श्वासही व्यर्थ आहे

--शब्द्सखा!

सये,
तुझ्याशिवाय या शब्दांचं बरसणंही
अताशा तोकडं वाटू लागतं
डोळ्याच्या कडा ओलावतात आणि
मनात आठवणींचं आभाळ दाटू लागतं

--शब्दसखा

0 प्रतिसाद: