कातरवेळ

दिवस संपेल कसातरी
अन संध्याकाळ होईल
हूरहूरणारं तुझं मन
कातरवेळेत निघून जाईल

बावरं मन तुझ्याशी
परक्यासारखं वागेल
तुझ्यापासून..जगापासून दूर..
आठवणींच्या मागं लागेल

तुझ्या आठवणीत असेल मी
समुद्रकिनारा असेल
खुलणारी सांजही असेल एखादी

गर्दिचा गोंगाट, गाड्यांची घरघर,
अन बाजूच्या सीटवर बसलेला मी..
तुझं आवडतं हाँटेल,
त्यासाठी उन्हात लावलेली रांग असेल..

गप्पा मारत उन्हातंन केलेली रपेट
तुझी माझी प्रत्येक भेट असेल..

तुझ्या आठवणींत,
स्पर्शांमधला मोहर असेल
श्वासांचा बहर असेल
ओठांमध्ये भिनलेली
ओठांची लहर असेल

तुझ्या आठवणीत असेल,
तुझी वाट पाहणारा मी
मला भेटण्यासाठीची तुझी लगबग
खास माझ्यासाठीचं तुझं सजणं असेल
तुझी वाट पाहताना माझं झुरणं असेल
तुझ्या हातातलं मी छेडलेलं कंगण असेल
तुला वाहिलेलं मनाचं आंदण असेल


निघण्याची जवळ आलेली वेळ
जड झालेली पावलं
दूर होतानाची एखादी संध्याकाळ
अन पाठमोरा मीही असेल... तुझ्या आठवणीत

भिजल्या पापण्यांनी मारलेली मिठी असेल
माझ्यासाठी लिहीलेली चिठ्ठी असेल

हे सारं आठवताना आजही
तुझ्या डोळ्यात पुन्हा
तेच पाणी दाटून येईल

...
दिवस संपेल कसातरी
अन संध्याकाळ होईल
हूरहूरणारं तुझं मन
कातरवेळेत निघून जाईल


--शब्द्सखा!

बालपणाला मायेचं अंगण होतं

बागडायला नितळसं आभाळ
अन फ़ुलायला खुलं रान होतं...

घरीदारी आणिक अवतीभवती
प्रेमाचं एक हळवार गोंदण होतं
खरंच,
बालपणाला मायेचं अंगण होतं

आजीच्या मायेची ओढ होती
अन आजोबांकडे हट्ट असायचे...

अजाणत्याशा पाखराला असं
प्रेमाचं लाभलेलं आंदण होतं
खरंच,
बालपणाला मायेचं अंगण होतं

गोष्टींत रमायचो, मनमुराद बागडायचो
आईवर रागवायचो, कधी रुसायचो...

लहाणपणी कौतुकानं सार्‍यांवर
माझ्या हट्टांच असं बंधन होतं
खरंच,
बालपणाला मायेचं अंगण होतं

आईचे धपाटे, बाबांचं जपणं
भावंडांचं सांभाळण असायचं...

खेळताना धडपडल्यावर नेहमी
मित्रांचं अवतिभवती रिंगण होतं
खरंच,
बालपणाला मायेचं अंगण होतं

बालपणीच्या आठवांचे दीवे अताशा
रोज रात्री आकाशात लुकलुकतात
हरवल्या त्या क्षणांच्या भेटीगाठी
कधीकधी आठवणीत झगमगतात

--शब्द्सखा!

का असे वागणे हे

नकोत सबबी आता
पुरे झाले बहाणे
का असे वागणे हे
होऊन उगी शहाणे
.....का असे वागणे हे
होऊन उगी शहाणे


बंध अंतरीचे खोल
काळजावरी अन वार
सोसून सारे रागरंग
जुलमी हे दूर रहाणे
.....का असे वागणे हे
होऊन उगी शहाणे

मल्हार गायचा
कधी जो ऐनवेळी
पावसाचे अताशा
होते उदास गाणे
...का असे वागणे हे
होऊन उगी शहाणे

लवत्या पापण्यांना
किती धीर द्यावा
स्वप्नी पुन्हा तुला मी
कितीदा पहाणे
...का असे वागणे हे
होऊन उगी शहाणे

....शब्दसखा

तुझं मन माझं मन...

भिरभिर दोघं निळ्याशा नभात
चांदण्यात कधि.. भरल्या ढगात
बागडतं स्वैर स्वप्नाच्या जगात
तुझं मन माझं मन...

होऊनि अल्लड प्रितीत थिजलेलं
गंधाळून कधि मिठीत निजलेलं
प्राजक्ताची धुंद पहाट भिजलेलं
तुझं मन माझं मन...

साठलेले मनी आठवांचे संग
रेंगाळती ओठी आठवांचे रंग
सजल्या नयनी आठवात दंग
तुझं मन माझं मन...

चांदण्यांनी वेढलेली एक रात
नजरेनं छेडलेली वेडी बात
प्रितवेडं होऊनिया गूज गात
तुझं मन माझं मन...

नजरेला पुरे उरे एक ध्यास
वाटतात खरे आता खोटे भास
एकरुप झाले घेई एक श्वास
तुझं मन माझं मन...


--शब्द्सखा!

आठवण

पेटलेल्या गुलमोहरालाही
उन्हाची झळ लागावी
उन्हानंही स्व:तला
स्व:तच कसंबसं सोसावं

रेडीओवर लागलेलं
’ए दील ए नादान...’ कानात घुमावं
लता मध्येच थांबल्यावर
गाणं अधिकच गहिरं वाटावं

वार्‍यावरती उडणार्‍या
एखाद्या वाळल्या पानाचं
फ़िरुन फ़िरुन पुन्हा
आपल्याच अंगणात येणं

सारे रस्ते पोरके
पेटलेले आभाळ
कोमेजलेली झाडं
रंग उडालेली फ़ुलं
वार्‍यानं हलणारं खिडकीच दार
अर्ध्या उघडल्या खिडकीतून
अंगावर येणारी उन्हाची एखादी तिरीप
सारं सारं भकास...

मनात रेंगाळणारी एखादी आठवण
अन खिडकीच्या गजांना धरुन शुन्यात हरवलेली नजर

--शब्द्सखा!

स्वप्नराणी

स्वप्नांचा तुझिया
मीच गाव आहे
आसवे तुझी गळाली
तो प्रेमभाव आहे

तोडशील नाते
तोडशील बंध
मनात माझा दरवळ गं
रमते..भिनते..मनात माझ्या
हरपल तुझाच परिमळ गं

स्वप्न सजवतो
स्वप्न रमवतो
होते तू मग प्रेमदिवाणी
पुन्हा पुन्हा मी स्वप्न जमवतो

जुनी कहाणी
नको विराणी
जडसर वाणी
नयनी पाणी.........

स्वप्नराणी,
ये फ़ुलोनी
दे मोहरुनी
तू हो चांदणी
उतर अंगणी
सारे सारे हे
या स्वप्नांनी

--शब्द्सखा!

सांग ना गं वेडे जरा

कुजबुज सांजवारा
देई हलका इशारा
तुझे केस भुरभुर
तनामनात शहारा

कसा खळाळ नदिचा
वेड्या सागरा भरती
रात रंगती संगती
वेडया किनार्‍यावरती

होई पहाट गुलाबी
दव थिजते लाजते
तुझ्या मिठीत मग
ही पहाट सजते

एक दव तुझ्या गाली
लाली खुलते खुलते
सांग ना गं वेडे जरा
अशी कशानं खुलते?

--शब्द्सखा!

कधी कधी मन उधाण वारा

कधी कधी मन उधाण वारा
भांबावते कधी कधी सैरावैरा
तडफ़डते कधी क्षीतिजावर ते
कोण कुठे अन कसा निवारा?

शोधू पहातो मीच मला मग
अवतीभवती तुझाच दरवळ
तुझ्या मिठीची शाल ओढुनी
श्वासांमध्ये तुझाच परिमळ

अलगद येते स्वप्ने लेवुनी
गुलाब होते रात्र लाजरी
बावरते तू सावरते तू
खुलुन येते मिठी साजरी

सये,
मन लाट होताना
तू किनारा होऊन येतेस
पेटलेल्या या वादळाला
नकळत शमवून नेतेस
--शब्द्सखा!

प्रेम म्हणजे एक महोत्सव!

प्रेम म्हणजे विश्वास?
की प्रेम म्हणजे समर्पण?
राधा की मीरा?
प्रेम म्हणजे जगापासून दूर जाणं? अगदी स्व:तपासूनही?
प्रेमात जगणं, घडीघडीला प्रेम जगणं?
प्रेमात विलीन होऊन जाणं?
हुश्श्श्श.....एका मिनीटात कितीतरी छोट्या छोट्या प्रेमाच्या व्याख्या समोर आल्या नाही?
अर्थात या माझ्यासारख्या एखाद्या पामरानं मांडलेल्या साध्या शब्दांमधल्या प्रेमाबद्दलच्या व्याख्या.

एखादा विचारवतं असेल तर तो म्हणेल,
" प्रत्येक पावलानं दुसर्‍या पावलाला पावलागणिक साद घालत आदिपासून अनादीपर्यंत केलेला प्रवास म्हणजे प्रेम!"

प्रत्येकाच्या दृष्टीने प्रेम म्हणजे कदाचित काहीतरी वेगळच असेल.
पण अनुभुती एकच. Same feelings!

कुणी शब्दातून आपलं प्रेम व्यक्त करेल, कुणी संगीतातून, कुणी मनातच ठेवेल, तर कुणी फ़क्त नजरेनं.
ती गोष्ट माहित आहे ना भुंग्याची. संध्याकाळ होताना ते स्व:तला फ़ुलामध्येच हरवून घेतं प्रेमाची सीमा पार करुन. हेही प्रेमच.

कितीही नाही म्हटलं तरी आपापल्या परिनं, जसं जमेल तसं प्रत्येकजण प्रेम करेल हे मात्र चौकस!

मी? माझं प्रेम?
मीही असाच एक तुमच्यासारखा साधा, प्रेमाच्या साध्या व्याख्या करणारा प्रियकर.
प्रेम म्हणजे काय ते अद्याप उलगडलं नाही तितकसं. वरती जे काही म्हटलो ते असतं काहो प्रेम?
आता विचारावं तरी कुणाला? प्रत्येकाचं प्रेम वेगळंच.
माझंही तसचं.
माझंही प्रेम वेगळच.

अवखळपणे, वळणं घेत घेत वाहणार्‍या नदिसारखी ती.. तिला मी प्रेम म्हणतो.
अल्लड होऊन वार्‍यावरती दरवळणारा सुगंध ती ..तिला मी प्रेम म्हणतो.
आकाशाचं होऊन आकाशात भिरभिरणार्‍या निरागस पाखरासारखी ती..तिला मी प्रेम म्हणतो.
पावसाची सर कोसळताना मनात चलबिचल घडवून आणणा‍री आठवण ती..तिला मी प्रेम म्हणतो.
डोळे मिटताना स्वप्न बनून रात्रींना चमचमणारी ती..तिला मी प्रेम म्हणतो.

त्या फ़ुलपाखरामागं धावताना, त्या पाखरासंगं उंच उंच उडताना, त्या आठवणींत भिजताना माझं प्रेम असं खुलत जातं.
अन मग या सगळ्यांना सारखं सारखं प्रेम वाटताना माझं मात्र प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं.

हा दरवळ जपायचा आहे मला, तिचा अल्लडपणा, तिच्या आठवणी, ती स्वप्न सारं सारं जपायचं आहे मला. तिच्यासाठी घडीघडीला.
कदाचीत हेच प्रेम असेल.

तिचं हसू, तिचं असणं, तिचं भिरभिरणं, तिचं माझ्या मनावर अधिराज्य कदाचित हेच माझं प्रेम असेल.
हेच प्रेम जपायचं आहे मला.

तिला जपायचं आहे मला. माझ्यासाठी आयुष्यभर.

खरंच! प्रेम म्हणजे एक महोत्सव असतो आयुष्यभर चालणारा!
हा महोत्सव खुलवायचा आहे मला असाच प्रत्येक घडीला.

कृष्णविवर..खोल अतिखोल!

दूर दूर अंतराळात
एक ठिपका आहे..इवलासा
अगदी काळाकभिन्न राक्षस वाटणारा
कुरूप इतका की प्रकाशानंही दूर रहावं
काय इतकं साठलं असेल त्याच्या अंतरात?
का इतकं दूर गेला असेल तो?
की चंद्रतारेच त्याच्यापासून दूर राहत असतील?
त्याला नक्की कसली ओढ असेल?
एखाद्या चंद्रानं त्याचीही परिक्रमा करावी?
रात्रीच्या अंधारात अंधार होऊन हरवताना,
त्यानंही कुणासाठीतरी लुकलुकावं?
हजार प्रश्न असतील असे...
जरासं डोकावून बघावं म्हटलं गाभ्यात,
पण पुन्हा आठवलं..हे तर कृष्णविवर..खोल अतिखोल!
मलाही ओढून घेईल आतमध्ये..
किती वेदना?
किती दु:ख?
आणि शेवटी अंत..
पण कुठवर?
एक ना एक दिवस,
त्याचं महाकाय गुरुत्वाकर्षण भारी पडेल असं वाटतंय...
आणि मग ओढला जाईल मी..
खोल खोल खोल..
कुठवर ते माहीत नाही....


दोघांमधील अंतर जपायचा प्रयत्न करतोय
पण अंतर कमी होत चाललंय आजकाल..

--शब्द्सखा!