तुझे शब्द दाटून येतात जेव्हा

मनात दाटलेलं आभाळ तुझ्या
पिऊन टाकावसं वाटतं...
उधळावेसे वाटतात
आयुष्याचे सगळेच रंग तुझ्यावर...तुझे शब्द दाटून येतात जेव्हा

तुला मिठीत घेऊन
क्षितीजापार जावसं वाटत
तुझ्या मनात मीच दाटून
तुझ्या शब्दांतून मीच वहावंस वाटतं...तुझे शब्द दाटून येतात जेव्हा

सारं सारं सोडून
सारं जग ओलांडून
तुझ्या डोळ्यात साठलेला
एक अश्रू बनून ओघळावंस वाटतं...तुझे शब्द दाटून येतात जेव्हा

तुझा हात हातात घेऊन
मनातलं गुपित खोलून
मी तुझाच आहे फ़क्त
हे पुन्हा पुन्हा तुला सांगावसं वाटतं...तुझे शब्द दाटून येतात जेव्हा

तुझ्या हळव्या मनाला
स्पर्शावसं वाटतं
तुझ्या मनात उतरुन
तुझ्यातच उरुन रहावसं वाटतं...तुझे शब्द दाटून येतात जेव्हा

मलाही विसरून
तुझ्याकडं धावावसं वाटतयं
थकलेला, दमलेला मी
तुझ्या मिठीत विसावसं वाटतयं...तुझे शब्द दाटून येतात जेव्हा

-शब्द्सखा!

स्वप्ने माझी....भिजते तू

वार्‍यावरती लहरत जाशी...अंबरास तू कवेत घेशी
गंध कधी..कधी मधूशालाही...मोरपिसापरी मोहरशी

खुलते कधी तू शामलसंध्या....क्षितीजावर अन दरवळते
मुक्त मुक्त तू..धुंद धुंद तू....खळ खळ तू गं खळखळते

फ़ुलाहूनही नाजूक होते...इवलेसे दव मिठीत घेते
रंगहीन त्या दवास सारे..रंग तुझे तू देऊन येते

खुलते तू झगमगते तू...नभी चांद अन झुलते तू
रातराणी तू गंधीत होते...मस्तीत तुझिया डूलते ते

थकते..शिनते..निजते तू...स्वप्नकुशीत मग थिजते तू
स्वप्नांचा मी सौदागर गं...स्वप्ने माझी....भिजते तू


--शब्द्सखा!

अपवाद

मौन मी जरी मी परी संवाद आहे
मांडला अताशा खरा मी वाद आहे

तापल्या निखार्‍या तमा ना मोसमांची
लाख वादळांचे फुके छळवाद आहे

का पुराण आता असे वाचाळ झाले?
(पोट पाळण्या होत युक्तिवाद आहे)

तेच चांदतारे कितीदा आळवावे?
शब्द आज हे मांडती प्रवाद आहे

लेखणी अता का अशी पेटून उठली?
पेटल्या मनाचा कसा अनुवाद आहे?

धुंद राहुनी कैक सरले वादळाने
'दीप'स्तंभ मी आजही अपवाद आहे

--शब्द्सखा !

उठाव

स्वप्नात कोणता मी, शोधीत गाव आहे?
सत्यात हारलो मी, हर एक डाव आहे

पाहून येथ गेला, जो तो मला असा की
बेनाम जिंदगीचे, बदनाम नाव आहे

'होऊ नको दिवाणी', सांगू कसे तुला मी?
येथे खर्‍याखर्‍यांचा, मोडीत भाव आहे

मी गायलेच नाही, या मैफलीत गाणे
खोटेच सूर सारे, खोटा जमाव आहे

का शोक श्रावणाचा, खोटा घरात माझ्या?
सांगा कुणी तयाला, मजला सराव आहे

आता पसंत ना मज, स्वर्गात राहणेही
ध्रुवापरी अटळ मी, शोधीत ठाव आहे

ना दाद मागतो मी, ना वाहवा हवी मज
शब्दात आज माझ्या, दिसतो उठाव आहे

--शब्द्सखा!

या आसवांस माझ्या

या आसवांस माझ्या... तू साहतेस का गं?
अन आठवांत माझ्या... तू राहतेस का गं?

हरवून सूर गेले...मज सांजवेळ येता
या मैफ़लीत माझ्या... तू नाहतेस का गं?

होतेस का पुजारी... अन फूल ही कधी तू
तुज मंदिरात माझ्या... तू वाहतेस का गं?

आता उरात झरती... या वेदना सदाच्या
या वेदनेस माझ्या... तू चाहतेस का गं?

तू दूर दूर जाता... बघ निखळले सहारे
पडक्या घरास माझ्या... तू पाहतेस का गं?

--शब्द्सखा!

वाटे जरा जगावे

तुषारदा तुझ्या या "गझलेपुढे" माझे शब्द काही नाही.मी थोडंसं लिहीलं आहे. तुझ्या गझलेला रिप्ल्याय म्हणुन नाही. सुचलं म्हणुन लिहीलं.

वाटे जरा जगावे
सारीच बंद दारे

कोणास कोण येथे?
कोणीच ना सहारे

का पावसात आता
हे तापती निखारे?

माझे न दु:ख काही
डोळ्यात आसरा रे?

"माझाच तू", खरे हे
खोटेच सांगना रे

खोटेच भास माझे
पाहून आरसा रे

--शब्द्सखा!

बाग

फ़ूलही कसे सलते उरात आहे?

वादळे कशी या अंतरात आहे?

वाट संपता माझा प्रवास होतो

पावले कशी वेड्या भरात आहे?

चुकवुनी रस्ते निघुन मरण गेले

वेदना अशा माझ्या घरात आहे

सोसतो असा आजकाल मज मी

आसवे बरी साध्या दरात आहे

वाळवंट रे हे बाग का खुलावी?

मेघ त्या कितीसे अंबरात आहे?

चांदणे ढळाले एकटा पुन्हा मी

काजळी कशी ही चांदरात आहे?

--शब्द्सखा!

तुझी आठवण येता - चारोळ्या!

तुझी आठवण येता
नजर उगाचचं भिरभिरते
जुन्या आठवांना आठवुन
पापणी क्षणभर पुन्हा डबडबते

--शब्द्सखा!

तुझी आठवण येता
शब्द बेभान होतात
लेखणीचा पाऊस
डायरीची पानं रान होतात

--शब्द्सखा!

तुझी आठवण येता
मन सैरभैर होतं
तुझ्या आठवणी विसरुन
तुझ्या अवतीभवती भिरभिरतं

--शब्द्सखा!

तुझी आठवण येता
माझे सारे क्षण रिते वाटतात
प्रत्येक क्षणात माझ्या
फ़क्त तुझ्या आठवणी दाटतात

--शब्द्सखा!

सुरांनो..

कुठे रे दडलात सुरांनो?

आज केविलवाणे झालात सुरांनो?

छेडल्या ज्या तारा आजवर

घायाळ त्यांनीच आज केले सुरांनो?

मैफ़ली सजतील...उठतील...

शब्दांसाठी माझिया, तुम्ही जगायचे सुरांनो!

--शब्द्सखा!

मी प्रसिद्ध होत गेलो

वाचाळले कोण...मी प्रसिद्ध होत गेलो
तू कुजबुजला फ़क्त..मी ग्वाही देत गेलो

तू घरात तुझिया कितीही भाषणे केली
आवाज उंच माझा मी घोषणा देत आलो

म्हणशील मज बिचारा दयेने कधितरी तू
सुकवुन आसवे सारीच मी आता येथ आलो

पाहू नको मला तू..मी गुन्हेगार नाही
अंत अद्याप न झाला...मी सुरवात होत आलो

फ़ुलांना खुडण्याचा इथला धर्म निराळा आहे
होतो प्रभात कधी आता होऊन रात आलो

--संदीप सुरळे