प्रेम म्हणजे एक महोत्सव!

प्रेम म्हणजे विश्वास?
की प्रेम म्हणजे समर्पण?
राधा की मीरा?
प्रेम म्हणजे जगापासून दूर जाणं? अगदी स्व:तपासूनही?
प्रेमात जगणं, घडीघडीला प्रेम जगणं?
प्रेमात विलीन होऊन जाणं?
हुश्श्श्श.....एका मिनीटात कितीतरी छोट्या छोट्या प्रेमाच्या व्याख्या समोर आल्या नाही?
अर्थात या माझ्यासारख्या एखाद्या पामरानं मांडलेल्या साध्या शब्दांमधल्या प्रेमाबद्दलच्या व्याख्या.

एखादा विचारवतं असेल तर तो म्हणेल,
" प्रत्येक पावलानं दुसर्‍या पावलाला पावलागणिक साद घालत आदिपासून अनादीपर्यंत केलेला प्रवास म्हणजे प्रेम!"

प्रत्येकाच्या दृष्टीने प्रेम म्हणजे कदाचित काहीतरी वेगळच असेल.
पण अनुभुती एकच. Same feelings!

कुणी शब्दातून आपलं प्रेम व्यक्त करेल, कुणी संगीतातून, कुणी मनातच ठेवेल, तर कुणी फ़क्त नजरेनं.
ती गोष्ट माहित आहे ना भुंग्याची. संध्याकाळ होताना ते स्व:तला फ़ुलामध्येच हरवून घेतं प्रेमाची सीमा पार करुन. हेही प्रेमच.

कितीही नाही म्हटलं तरी आपापल्या परिनं, जसं जमेल तसं प्रत्येकजण प्रेम करेल हे मात्र चौकस!

मी? माझं प्रेम?
मीही असाच एक तुमच्यासारखा साधा, प्रेमाच्या साध्या व्याख्या करणारा प्रियकर.
प्रेम म्हणजे काय ते अद्याप उलगडलं नाही तितकसं. वरती जे काही म्हटलो ते असतं काहो प्रेम?
आता विचारावं तरी कुणाला? प्रत्येकाचं प्रेम वेगळंच.
माझंही तसचं.
माझंही प्रेम वेगळच.

अवखळपणे, वळणं घेत घेत वाहणार्‍या नदिसारखी ती.. तिला मी प्रेम म्हणतो.
अल्लड होऊन वार्‍यावरती दरवळणारा सुगंध ती ..तिला मी प्रेम म्हणतो.
आकाशाचं होऊन आकाशात भिरभिरणार्‍या निरागस पाखरासारखी ती..तिला मी प्रेम म्हणतो.
पावसाची सर कोसळताना मनात चलबिचल घडवून आणणा‍री आठवण ती..तिला मी प्रेम म्हणतो.
डोळे मिटताना स्वप्न बनून रात्रींना चमचमणारी ती..तिला मी प्रेम म्हणतो.

त्या फ़ुलपाखरामागं धावताना, त्या पाखरासंगं उंच उंच उडताना, त्या आठवणींत भिजताना माझं प्रेम असं खुलत जातं.
अन मग या सगळ्यांना सारखं सारखं प्रेम वाटताना माझं मात्र प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं.

हा दरवळ जपायचा आहे मला, तिचा अल्लडपणा, तिच्या आठवणी, ती स्वप्न सारं सारं जपायचं आहे मला. तिच्यासाठी घडीघडीला.
कदाचीत हेच प्रेम असेल.

तिचं हसू, तिचं असणं, तिचं भिरभिरणं, तिचं माझ्या मनावर अधिराज्य कदाचित हेच माझं प्रेम असेल.
हेच प्रेम जपायचं आहे मला.

तिला जपायचं आहे मला. माझ्यासाठी आयुष्यभर.

खरंच! प्रेम म्हणजे एक महोत्सव असतो आयुष्यभर चालणारा!
हा महोत्सव खुलवायचा आहे मला असाच प्रत्येक घडीला.

कृष्णविवर..खोल अतिखोल!

दूर दूर अंतराळात
एक ठिपका आहे..इवलासा
अगदी काळाकभिन्न राक्षस वाटणारा
कुरूप इतका की प्रकाशानंही दूर रहावं
काय इतकं साठलं असेल त्याच्या अंतरात?
का इतकं दूर गेला असेल तो?
की चंद्रतारेच त्याच्यापासून दूर राहत असतील?
त्याला नक्की कसली ओढ असेल?
एखाद्या चंद्रानं त्याचीही परिक्रमा करावी?
रात्रीच्या अंधारात अंधार होऊन हरवताना,
त्यानंही कुणासाठीतरी लुकलुकावं?
हजार प्रश्न असतील असे...
जरासं डोकावून बघावं म्हटलं गाभ्यात,
पण पुन्हा आठवलं..हे तर कृष्णविवर..खोल अतिखोल!
मलाही ओढून घेईल आतमध्ये..
किती वेदना?
किती दु:ख?
आणि शेवटी अंत..
पण कुठवर?
एक ना एक दिवस,
त्याचं महाकाय गुरुत्वाकर्षण भारी पडेल असं वाटतंय...
आणि मग ओढला जाईल मी..
खोल खोल खोल..
कुठवर ते माहीत नाही....


दोघांमधील अंतर जपायचा प्रयत्न करतोय
पण अंतर कमी होत चाललंय आजकाल..

--शब्द्सखा!

माझिया वेदनांना कळाया लागलो मी

माझिया वेदनांना कळाया लागलो मी
होउनी रात आता ढळाया लागलो मी

सावल्या दाटल्या का अशा या पेटताना
राहुनी मौन आता जळाया लागलो मी

बोलुनी श्वास गेले ’पुरे हे खेळ आता’
माझियापासुनी अन पळाया लागलो मी

जाहले ओस सारे पुन्हा मी कोरडा रे
माझिया आसवांना छळाया लागलो मी

--शब्द्सखा!

आई गं!

आई गं!
आठवत असशील मला
तुळशीपाशी दिवा लावताना
देवाजवळ शुभंकरोती म्हणताना
भल्या सकाळी अंगणात सडा घालताना
गोड धोड बनवल्यावर हट्ट करायला मी नसताना
ओवाळण्यासाठी भाऊ जवळ नाही म्हणून बहिण रडताना
तुला समजावताना बाबांचाही आवाज नकळतपणे कापरा होताना
दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी परतणारी इतरांची मुलं पाहताना
एखादी आई आपल्या बाळासाठी अंगाई गाताना
लहाणपणी दाखवलेला चांदोबा बघताना
बाजारात गेल्यावर खाऊ घेताना
फ़ोनवर बोलून झाल्यावर
अश्रू ढाळताना
आई गं!
--शब्द्सखा!

आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

शब्दहो आज तुम्ही उडून जा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

'विसावायचे मज सावलीत आई
निजायचे पुन्हा ऐकायची अंगाई'
शब्द हे माझे तीला ऐकवा रे
आईस माझ्या माझा निरोप द्या रे....

समई जळते जरी, देवघर पोरके
डोळ्यात दाटते आई,खळकन ओघळते
ममतेस तिचिया गातात आसवे रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

जाहली सांज पाखरे निघाली घराला
उब मायेची गाईच्या पाडसाला
उंबरा माझ्या घराचा पोरका रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

अंगणात जाता जरा संथ व्हा रे
'शुभंकरोती’ गाता तुम्ही गुणगुणा रे
ममता मायेची घेउनी या रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

ढाळेल आसवे ती ऐकुनी बोल माझे
काळजास तिचीया भले जाणतो मी
शब्दहो शेवटी तुम्ही मौन व्हा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

शब्दहो आज तुम्ही उडून जा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

--शब्दसखा!

कुठे असशील तू?

कधीचा मौन मी
तुझ्या आठवणींशी पुन्हा बोलका होऊ लागतो
गर्भश्रिमंत शांततेतही
तुझ्या आठवणींचा गलका होऊ लागतो
आभाळ भरल्यागत मन भरुन येतं
डोळ्यात पाणी डबडबत..अडखळत..
मन तळमळत..तडफ़डत..
तुझ्या आठवणींशी झगडतं...
कातरवेळ..अजुन गहिरी होऊ लागते..
तसे तुझे भास गडद होत जातात...
मी विरत जातो मंद काळोखात... संथ होत होत
स्व:तला शोधू पाहतो...माझ्यात...तुझ्यात..
कुठे असेल का मी?
की तुच फ़क्त सगळीकडे?
कुठे असशील तू?
माझी असलीस तरीही....कुठे असशील तू?
--शब्द्सखा!

इतुकेच आज झाले

इतुकेच आज झाले सारे कळून आले
का दु:ख अंतरीचे हे भळभळून आले

झाले नको नकोसे होते पुन्हा पुन्हा जे
ते स्वप्न का अताशा मागे वळून आले?

होऊन वागलो मी माळी तुझ्या महाली
केसूंत फ़ूल तुझिया ते दरवळून आले

माझ्यात दंगलेलो झिंगून लास होतो
झाली पहाट ना अन तारे ढळून आले

मी जिंकलो जरीही उरलो किती कितीसा?
माझेच श्वास जेव्हा मजला छळून आले

ही वाहवा निघाली आता नको तयांची
सांगू कसे कुणाला मज हळहळून आले

--शब्द्सखा...१५.१०.०८

वरात

कुठलेच दु:ख आता माझ्या घरात नाही
काहीच आज 'तसले' उरले उरात नाही

माळून चांदण्यांना तू दूर दूर गेली
हरवून चांद गेला तो अंबरात नाही

वाटा कधीच सार्‍या इथल्या गळून गेल्या
पाऊल थांबलेले आता भरात नाही?

मागू नको मला तू आता उधार काही
झालो फ़कीर तुजविण तू अंतरात नाही

मी जिंकलेच असते इवल्या दिशांस दाही
का ओढ या फ़ुलाची त्या भ्रमरात नाही?

घे तू..रडून घे तू मी थांबणार नाही
अद्याप पाहिली तू असली वरात नाही

--शब्द्सखा!

तुम्हे ढुंढ रहा है प्यार

पतंग आणि दोरी..एक अनोखं नातं. अपुर्ण एकमेकांशिवाय दोघंही.
दूर दूर उंच आभाळात स्वैरपणे विहारणारा पतंग अन त्याच्यासंगे मोठ्या दिमाखात मिरवणारी दोरी. तसं पाहीलं तर पतंगामुळे दोरी नसते, तर दोरीमुळे पतंग असतो. दोरी म्हणजे बंधन असतं पतंगाचं. त्याचं हसणं, रडणं, असणं, नसणं, वादळात हेलकावणं, कधी वार्‍यासोबत डोलणं सारं सारं या दोरीसोबत. पतंगाचा प्राण दोरीत विसावलेला. असं हे अतूट नातं...अतूट बंधन.
एक दिवस असेच दोघं मस्तीत डूलत होते. पतंग आभाळातून दोरीला न्याहाळायचा. दोरी आपली लाजायची, पतंगाला इतकं उंच पाहून हरपून जायची. आणि आपली गाठ याच्यासोबतच जुळलेली आहे हे आठवून मनातल्या मनात हजारदा त्याला वरायची. मध्येच एखादा हवेचा झोका यायचा पतंग थोडा खाली झुकून दोरीला स्पर्शायचा...दोरी गुलाबी होऊन जायची. रंगात यायची. वार्‍यावर तीही डूलायची मग.
असा हा डाव रंगत असतानाच आभाळ भरून आलं. दोरी अन पतंगाचं घर असणार्‍या निळ्या आकाश ढगांनी भरुन आलं. वारा उधळून आला. झाडं वार्‍याशी भांडायला लागली. फ़ूलं धूळीनं माखली गेली. पालापाचोळा आभाळापर्यंत जाऊन घिरट्या घालायला लागला. विजांनी थैमान घातलं. क्षणापुर्वीचं सुंदर जग बघता बघता क्रूर झालं.
वादळात पतंग स्व:तला कसातरी सावरत होता. दोरीची नाजूक कुडी पतंगाला जमेल तसा आधार देत होती. सारं सारं सहन करुन पतंग एका ठिकाणी स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरुन दोरीला हेलकावे बसणार नाहीत. दोरीसाठी त्याचाही जीव तुटू लागला. इतक्यात वार्‍याच्या एका जोरदार तडाख्याने पतंगालं भिरकावलं. पतंग अन दोरीची गाठ सुटली. हळूहळू दोरी खाली कोसळू लागली. पतंगापासून दूर दूर चालली. इतका वेळ अतूट असणारं बंधन एका क्षणात तूटलं गेलं. अंधारल्या डोळ्यांनी दोरीने अखेरचं पतंगाला पाहून घेतलं आणि शेवटी भुईवर शांतपणे निजून तीने डोळे मिटले.
पतंगाने दोरीसाठी आक्रोश केले. हजार आवाज दिले त्याने तिला. त्या वादळात त्याचे आवाज विरुन गेले. अश्रू ढाळले त्याने. पण दोरी मात्र कधीच स्थितप्रज्ञ झाली होती.
इतका वेळ विहारणारा पतंग आता फ़डफ़डायला लागला होता. दोरीशिवाय खचलेला पतंग तिच्या जाण्यानेच निम्मा अर्धा संपला होता. इतका वेळ आभाळाला पंखांखाली घेणार्या पतंगाचे पंख गळून पडले होते.
वादळ वार्‍याला सोसत, वारा नेईल तिकडे तो जाणं आता त्याच्या नशिबी होतं.
नजर अजुनही दोरीवरच होती .
दोरीनंतर शेवट तर आपलाही आहेच हे कळुन चुकलं त्याला. आपण दोरीला वाचवू शकलो नाही ही खंत मनाला बोचत होती.
वार्याच्या तडाख्याने कधी उंच आभाळात जायचा कधी कोसळायचा. त्यातच पावसाने जोर धरला. वारा आणि पाउस यांनी एकत्रच त्याच्यावर वार सुरु केले. कसा टिकणार होता तो?

बरेच दिवस झाले. कदाचित बरीच झुंज दिली असेल त्याने. अन आज..आज तो कुठेतरी एखाद्या माळरानावर निपचीत पडला असेल जिर्ण झालेला. फ़ाटलेला. किंवा एखद्या काट्याच्या झाडामध्ये अडकलेला असेल शेवटच्या घटका मोजत..दोरीला आठवत.
दोरी एका क्षणात निघून गेली. पण तिच्यामागे पतंगही भरकटलाच.
बंधन तुटलं..पतंग बेबंध झाला. आणि अशा पतंगाला वादळ रों रों करत घेऊन गेलं.
कदाचित लवकरच दोघांची भेट होईल एका शांत ठिकाणी जिथं पुन्हा दोघांचं जग असेल.
पण तोवर...तोवर पतंगाला सोसायचंच आहे.

तसं कुणावाचून कुणाचं काही अडत नाही. वेळ थांबत नाही. हे खरं.
दोरीशीवाय जगायचा प्रयत्न पतंगानेही केलाच. पण कदाचित पतंग सर्वसामान्यांमध्ये मोडला नाही म्हणून दोरीशिवायचं जगणंही त्याला जमलं नाही.
आपलंही आयुष्य या पतंग-दोरी सारखं नसू शकत का?
आपल्यालाही आपलं कुणीतरी खुप जवळचं अचानकपणे सोडून जातं. जाणारी व्यक्ती निघून जाते.. सुटते. पण जाताना मात्र खुप सार्‍या वेदना देऊन जाते. आठवणी मागे ठेउन जाते.
अन मग आपल्या वाटेला येतं ते त्या आठवणींना कुरवाळत बसण. त्या विरहात जळणं.
अहं..हे लादलेलं नसतं. पण का कुणास ठाऊक आपणच ते लादून घेतो स्व:तवर.
ते रुसवे, फ़ुगवे. त्या सांजवेळी. प्रत्येक श्वासागणीक काढलेल्या त्या आठवणी. ती स्वप्नांची बांधलेली घरं.
सारं सारं अर्धवट राहून जातं. अधुरी राहिलेली वचनं, प्रेमात घेतलेल्या आणाभाका. ही सगळी कोरी चित्र एकट्याने कशी रंगवायची.
दिवसामागून दिवस येतात..निघून जातात. आपण मात्र शुन्य असतो. भावनाशुन्य! सगळ्या भावना त्या एका क्षणातच विरुन गेलेल्या असतात. पुरते रुक्ष झालेलो असतो आपण.
पुन्हा तशी सांज कधी खुलत नाही. फ़ुलांना गंध येत नाही.
पाऊस कोसळत राहतो पण आपण भिजत नाही. भिजतं ते फ़क्त तन. मनातून मात्र कोरडेच राहतो आपण .
आठ्वणींना आठवत एक एक क्षण कसातरी पुढे ढकलायचा. चालत रहायचं. कुठे जायचं ते ठाऊक नाही. कुठवरं चालायचं हिशोब नाही. का चालायचं ठरलेलं नाही. इतकच माहीत की शेवटापर्यंत जायचं.
सारं असून काहीच नसल्याचं जाणवत राहतं, आणि सगळं असलं तरी त्या कुणातरीशिवाय ते अपुर्ण वाटत. जीवन अपुर्ण वाटतं.

तुझ्या माझ्याबाबतीतही असं काहिसं होऊ शकतं ना?
कदाचित तू मला सोडुन जाशील. मी मागे उरेल एकटाच.
पण एक बरं होईल की तू मला बघू शकणार नाहीस. नाहीतर जगण्याला कफ़ल्लक झालेल्या मला पाहताना तुझं मन रडलं असतं. कोसळून गेली असतीस तुच.

एकटं बरेच जण जगतात. पण एकाकीपणात जगायला धैर्य लागतं.
मग खोटं खोटं हसू चेहर्‍यावर ओढून जगणं हा शाप ठरतो. कुठेही नसून उगाचच सगळ्यांत असावं लागतं.
मनाची तडप, तडफ़ड, रुदण कुणाला दाखवता येत नाही. कुठं ते व्यक्त होत नाही.
अबोल राहून सगळं सोसायचं असतं. हळूहळू तेही जमू लागतं.
आभासांचं जाळ पसरु लागतं सभोवार. नजर उगीचच त्या जुन्या वाटेभर भिरभिरते.
जुने क्षण आठवण होऊन एकत्र येतात. त्यांच एक वलय बनतं आपल्याभोवती. त्या वलयातच आपण जगणं पसंत करतो मग. जगापासून हळूहळू परके होऊ लागतो.
अवघड जातं हे सारं सारं सहन करणं. एक वेदना दिनरात, प्रत्येक क्षणी काळजात ठसठसत राहते.
ही वेदना भळभळून वाहत नाही, अन खपलीही धरत नाही. ती अशीच चिघळत राहते. शेवटपर्यंत.

ते गाणं आहे बघ एक,

"अब यादों के काटे इस दिल मे चुभते है,
ना दर्द ठहरता है, ना आसू रुकते है,
तुम्हे ढुंढ रहा है प्यार..हम कैसे करे इकरार ,
के हा तुम चले गये..."

हे गाणं समजलं तर सगळं समजलं. या गाण्यातच सगळं आलं.

--शब्द्सखा!


( ’चिठ्ठी ना कोई संदेश...’ लिहून खो दिल्याबद्दल सईचे आभार.)

'U, Me, Aur Hum' & Myself

आज पहाटे चार वाजता झोपूनही सकाळी आठ वाजता उठलो, तेही आळस न करता. आता यात काय ते विशेष? तसं विशेष काही नाही. पण माझ्यासारख्या आळशी प्राण्यासाठी लवकर उठणं(मग ते कधिही झोपेलेलो असेल तरी) हे जरा विषेशच. उशिरा उठण्याची सवय मी नित्यांनं जोपासत आलोय अगदी लहाणपनापासुन. असो.
आँफ़िसला जाण्यासाठी बाहेर पडलो तोच श्रीधर ने हात दाखवला, नरेंद्रच्या कारमधून जाण्यासाठी.आता आँफ़िसपर्यंत सवारी मिळणार म्हणून स्वारी खुश झाली, अर्थातच!
दिवस चांगला जातोय बहुतेक आजचा असं वाटायला लागलं.
काहि अपेक्षित गोष्टी अनपेक्षितपणे घडल्या तर तो आनंद काहि औरच, नाहि का?
आज शुक्रवार असल्यानं breakfast ला दांडी मारली होती. नाही नाही, शुक्रवारचा उपवास वगैरे असं काही नाही.(तसेही अमेरिकेत आल्यापासून कोणता उपवास कधी असतो हेही विसरायला झालंय)
आज आँफ़िसच्या बापाचं खाणार होतो, प्रत्येक शुक्रवारप्रमाणे.
तीन-चार मिनीटांच्या राईड नंतर आँफ़िसमध्ये उतरलो. Today narendraa was carrying b'fast for his team, so he invited me n Sridhar for b'fast. म्हटलं अरे नको, आँफ़िसकडून असतो b'fast मला प्रत्येक शुक्रवारी. आणि इथूनच चांगल्या वाटणार्‍या दिवसाची ’वाट’ लागायला सुरुवात झाली.
जर आता नरेंद्रने विचारलं की काय b'fast असतो तर काय सांगायचं. b'fast असतो तर खरा, पण काय असतो?
गेले सहा महिने प्रत्येक शुक्रवारी सकाळी b'fast म्हणून काय असत आँफ़िसकडून हेच विसरलो मी. अमेरिकेत आल्यापासून bread या categoryतला खाण्याचा एकमेव आवडता पदार्थ म्हणजे आंफ़िसमध्ये मिळणारा b'fast, आणि त्याचंच नाव विसरलो? वाटलं thank god Narendra didnt asked about, नाहितर मी प्रत्येक शुक्रवारी काय b'fast करतो हे मला आठवत नाही असे सांगून स्व:तच्या हाताने स्व:तची चव घालवून घेतली असती की काय?
कम्प्युटर समोर आलो आणी अगदि नेटानं विचार सुरु केला की काय b'fast असतो आज? गेले सहा महिने तोच b'fast प्रत्येक शुक्रवारी असतो, जो मला आवडतो त्यांचंच नाव मी विसरलो?
हे कसं शक्य आहे?
बर्गर? नाही.
सँन्डविच? अहं..सँन्डविचसुद्धा नाही.
Curiosity आता टोकाला लागली. साहजिकच आहे.
जर शोधायचा प्रयत्न केला तर लगेच सापडेल त्याचं नाव आंतरजालावर.
पण नको. आठवूयात ना थोडावेळ. माझी याददाश गेली आहे थोडीच?
असा स्व:तला धीर द्यायला सुरुवात केली.
आणि इतक्यात आठवलं,
काय खातो ते नाही आठवलं तर चित्राच्या सांगण्यावरुन बघितलेला चित्रपट 'U, Me Aur Hum' आठवला. आणि दिवसाची लागलेली वाट आता चांगलीच काट्याकुट्यांतून जाऊ लागली.
’ती’ पिया(काजोल), म्हणजेच या चित्रपटातली अभिनेत्री डोळ्यासमोर चक्क उभी राहिली. तेही हसून माझ्याकडे पाहत. आता सगळा चित्रपट पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या पहावा लागणार याची खात्री पटली. पावसात स्व:तच्या घरचा address विसरलेली पिया, अजयचा फ़ोन नंबर विसरलेली तीच, स्व:तच्या मुलाला bath tub मध्ये टाकून विसरलेली तीच, आणि अशा कितीतरी गोष्टी विसरलेली पिया समोर आली. काळजात धस्स झालं.
कम्प्युटर सुरु केला खरा पण नुसताच screenकडे बघत होतो. काय करायचं आहे काहि सुचेना.
Google वरती जाउन शोधाशोध सुरु केली ’या’ पियाची. Alzheimer's हा disease झालेला असतो पियाला. या आजारात पेशंट सगळं काहि विसरायला लागतो. आपली माणसं, आपलं घर, आपला भूतकाळ, आणि आपली ओळखही.
जे काहि जगत असतो आपण तेवढंच काय ते आयुष्य. काय होऊन गेलं आहे त्याची कुठेही नोंद होत नाही. काय होणार आहे याची कल्पनाही नाही.
विचार करता करता मी पियाच्या रोल मध्ये कधी उतरलो ते कळलेच नाही. आणि Alzheimer's झालेल्या पेशंटचे विचार कर लागलो.
जर आपण फ़ोन नंबर विसरलो तर?
आपण घरातून बाहेर पडलो आणि आँफ़िसचा addressच विसरलो तर?
आपण असं करुया का? सगळे फ़ोन नंबर एका कागदावर लिहून तो कागद आपल्या पाकिटात ठेवूया का?
हो, हे बरं होईल!
पण जर आपण हेच विसरलो की आपल्याकडे एक कागद आहे ज्याच्यावर सगळे फ़ोन नंबर आहेत तर?
जर संध्याकाळी घरी जाताना आपण आपल्याच घरचा address विसरलो तर? जाणार कुठे मग?
असे एक ना अनेक विचीत्र प्रश्न, शंका मनात येऊ लागल्या.
पियाचं character रंगात आलं होतं चांगलंच आता.
अधूनमधून b'fast ला काय असतं हे आठवायची लढाई सुरु होतीच.
Height म्हणजे पियाला घरातून काढून special care मध्ये ठेवलं होतं हे मी अनुभवायला लागलो.
मलाही कुणीतरी असंच special care ward मध्ये सोडून निघून जाईल?
मला सोडून जाताना अजय सारखं कुणी रडेल का?
मीही तिथे एकटाच असेल?
काही आठवणार नाही?
मी कोण?
माझं कोण?
कुठून आलो?
आपण कधितरी बरे होऊ का?
चित्रपटात तरी शेवटी तिला सारं आठवतं आणि ती पुन्हा अजयबरोबर असते असं दाखवलं. पण कितीही म्हटलं तरी तो चित्रपट. चित्रपटाचा The End नेहमीच चांगला करतात. Real Life मध्ये तसं होईलचं असं नाही. कदाचित मला कधीतरी सगळं आठवेल, कदाचित कधीच आठवणार नाही.
पियाला तो आजार एकाएकी नाही जडत. ती हळूहळू विसरायला सुरुवात होते. माझंही तसंच असेल का? आज b'fast काय असतो हे विसरलो. आता उद्या अजून काही विसरु का आपण?
आता आपण आपलंच निरीक्षण करत राहूया, अजून आपण काय काय विसरतो ते. आणि एखाद्या डाँक्टरला consult करुयात वेळ हातची जाण्यापुर्वी.
मला(न) झालेला आजार त्याच्यावरचे परिणाम आणि त्या आजारातून तरण्याचे उपाय हे सगळे चक्र सुरु होतेच. इतक्यात चंद्रा आँफ़िसला आला. आणि मी सवयीप्रमाणे त्याला म्हटलं, ’चलो यार बेगल खाते है’ आणि तोही सवयीप्रमाणे म्हटला, ’एक मिनट मै कम्प्युटर स्टार्ट करता हू’ . आणि अचानक लक्षात आलं, ’बेगल’. हो, आपण प्रत्येक शुक्रवारी सकाळी ’बेगल’ खातो आणि आजही खाणार.
आणि लगेचच पियाचं character संपुष्टात आलं. जणूकाही तो एक ड्रामा होता आणि मी त्यात leading actor ची भुमिका करत होतो.
संदिपचं character सोडून ४५ मिनीटे मी पियाचं character अनपेक्षितपणे का होईना जगून आलो.
आपण कोण आहोत याची जाणीवसुद्धा नसेल तर ते आयुष्य कसं जगलं जात असेल? अर्थातच जर तीला आयुष्य ही संकल्पनाच माहीत नसेल त्या phase मध्ये तर तिला काही वाटणार नाही कदाचित. पण तिच्या कुणालातरी ते जाणवेल. तीच्या मनातले विचार, वेदना, तीचं एकाकीपण, तिचं असून नसलेलं आयुष्य सारं अनुभवलं मी जरासं का होईना काही वेळ.अर्थातच, जे अनुभवलं ते जसंच्या तसं शब्दांत मांड्ता येणं केवळ अशक्य.

कसोशीने जे आठवायचा प्रयत्न करत होतो, ते आठवून आठवून आठवलं नाही आणि न आठवता अचानक आठवलं गेलं.
’आपण एकदम ठणठणीत आहोत’ असं स्व:तशीच पुटपुटलो आणि तसं पटवून दिलं स्व:तलाच.
एक मोठ्ठा उसासा टाकला आणि हुंदडत हुंदडत माझा आवडीचा b'fast करायला गेलो.

बहिणाबाईंचं ’मन वढाय वढाय..’ हे गाणं किती सार्थक आहे नाही का? आपलं मन आपल्याला कुठून कुठे घेऊन जाईल ते मनालाही माहीत नसतं.

--शब्द्सखा!