तुझं मन माझं मन...

भिरभिर दोघं निळ्याशा नभात
चांदण्यात कधि.. भरल्या ढगात
बागडतं स्वैर स्वप्नाच्या जगात
तुझं मन माझं मन...

होऊनि अल्लड प्रितीत थिजलेलं
गंधाळून कधि मिठीत निजलेलं
प्राजक्ताची धुंद पहाट भिजलेलं
तुझं मन माझं मन...

साठलेले मनी आठवांचे संग
रेंगाळती ओठी आठवांचे रंग
सजल्या नयनी आठवात दंग
तुझं मन माझं मन...

चांदण्यांनी वेढलेली एक रात
नजरेनं छेडलेली वेडी बात
प्रितवेडं होऊनिया गूज गात
तुझं मन माझं मन...

नजरेला पुरे उरे एक ध्यास
वाटतात खरे आता खोटे भास
एकरुप झाले घेई एक श्वास
तुझं मन माझं मन...


--शब्द्सखा!

आठवण

पेटलेल्या गुलमोहरालाही
उन्हाची झळ लागावी
उन्हानंही स्व:तला
स्व:तच कसंबसं सोसावं

रेडीओवर लागलेलं
’ए दील ए नादान...’ कानात घुमावं
लता मध्येच थांबल्यावर
गाणं अधिकच गहिरं वाटावं

वार्‍यावरती उडणार्‍या
एखाद्या वाळल्या पानाचं
फ़िरुन फ़िरुन पुन्हा
आपल्याच अंगणात येणं

सारे रस्ते पोरके
पेटलेले आभाळ
कोमेजलेली झाडं
रंग उडालेली फ़ुलं
वार्‍यानं हलणारं खिडकीच दार
अर्ध्या उघडल्या खिडकीतून
अंगावर येणारी उन्हाची एखादी तिरीप
सारं सारं भकास...

मनात रेंगाळणारी एखादी आठवण
अन खिडकीच्या गजांना धरुन शुन्यात हरवलेली नजर

--शब्द्सखा!

स्वप्नराणी

स्वप्नांचा तुझिया
मीच गाव आहे
आसवे तुझी गळाली
तो प्रेमभाव आहे

तोडशील नाते
तोडशील बंध
मनात माझा दरवळ गं
रमते..भिनते..मनात माझ्या
हरपल तुझाच परिमळ गं

स्वप्न सजवतो
स्वप्न रमवतो
होते तू मग प्रेमदिवाणी
पुन्हा पुन्हा मी स्वप्न जमवतो

जुनी कहाणी
नको विराणी
जडसर वाणी
नयनी पाणी.........

स्वप्नराणी,
ये फ़ुलोनी
दे मोहरुनी
तू हो चांदणी
उतर अंगणी
सारे सारे हे
या स्वप्नांनी

--शब्द्सखा!

सांग ना गं वेडे जरा

कुजबुज सांजवारा
देई हलका इशारा
तुझे केस भुरभुर
तनामनात शहारा

कसा खळाळ नदिचा
वेड्या सागरा भरती
रात रंगती संगती
वेडया किनार्‍यावरती

होई पहाट गुलाबी
दव थिजते लाजते
तुझ्या मिठीत मग
ही पहाट सजते

एक दव तुझ्या गाली
लाली खुलते खुलते
सांग ना गं वेडे जरा
अशी कशानं खुलते?

--शब्द्सखा!

कधी कधी मन उधाण वारा

कधी कधी मन उधाण वारा
भांबावते कधी कधी सैरावैरा
तडफ़डते कधी क्षीतिजावर ते
कोण कुठे अन कसा निवारा?

शोधू पहातो मीच मला मग
अवतीभवती तुझाच दरवळ
तुझ्या मिठीची शाल ओढुनी
श्वासांमध्ये तुझाच परिमळ

अलगद येते स्वप्ने लेवुनी
गुलाब होते रात्र लाजरी
बावरते तू सावरते तू
खुलुन येते मिठी साजरी

सये,
मन लाट होताना
तू किनारा होऊन येतेस
पेटलेल्या या वादळाला
नकळत शमवून नेतेस
--शब्द्सखा!

प्रेम म्हणजे एक महोत्सव!

प्रेम म्हणजे विश्वास?
की प्रेम म्हणजे समर्पण?
राधा की मीरा?
प्रेम म्हणजे जगापासून दूर जाणं? अगदी स्व:तपासूनही?
प्रेमात जगणं, घडीघडीला प्रेम जगणं?
प्रेमात विलीन होऊन जाणं?
हुश्श्श्श.....एका मिनीटात कितीतरी छोट्या छोट्या प्रेमाच्या व्याख्या समोर आल्या नाही?
अर्थात या माझ्यासारख्या एखाद्या पामरानं मांडलेल्या साध्या शब्दांमधल्या प्रेमाबद्दलच्या व्याख्या.

एखादा विचारवतं असेल तर तो म्हणेल,
" प्रत्येक पावलानं दुसर्‍या पावलाला पावलागणिक साद घालत आदिपासून अनादीपर्यंत केलेला प्रवास म्हणजे प्रेम!"

प्रत्येकाच्या दृष्टीने प्रेम म्हणजे कदाचित काहीतरी वेगळच असेल.
पण अनुभुती एकच. Same feelings!

कुणी शब्दातून आपलं प्रेम व्यक्त करेल, कुणी संगीतातून, कुणी मनातच ठेवेल, तर कुणी फ़क्त नजरेनं.
ती गोष्ट माहित आहे ना भुंग्याची. संध्याकाळ होताना ते स्व:तला फ़ुलामध्येच हरवून घेतं प्रेमाची सीमा पार करुन. हेही प्रेमच.

कितीही नाही म्हटलं तरी आपापल्या परिनं, जसं जमेल तसं प्रत्येकजण प्रेम करेल हे मात्र चौकस!

मी? माझं प्रेम?
मीही असाच एक तुमच्यासारखा साधा, प्रेमाच्या साध्या व्याख्या करणारा प्रियकर.
प्रेम म्हणजे काय ते अद्याप उलगडलं नाही तितकसं. वरती जे काही म्हटलो ते असतं काहो प्रेम?
आता विचारावं तरी कुणाला? प्रत्येकाचं प्रेम वेगळंच.
माझंही तसचं.
माझंही प्रेम वेगळच.

अवखळपणे, वळणं घेत घेत वाहणार्‍या नदिसारखी ती.. तिला मी प्रेम म्हणतो.
अल्लड होऊन वार्‍यावरती दरवळणारा सुगंध ती ..तिला मी प्रेम म्हणतो.
आकाशाचं होऊन आकाशात भिरभिरणार्‍या निरागस पाखरासारखी ती..तिला मी प्रेम म्हणतो.
पावसाची सर कोसळताना मनात चलबिचल घडवून आणणा‍री आठवण ती..तिला मी प्रेम म्हणतो.
डोळे मिटताना स्वप्न बनून रात्रींना चमचमणारी ती..तिला मी प्रेम म्हणतो.

त्या फ़ुलपाखरामागं धावताना, त्या पाखरासंगं उंच उंच उडताना, त्या आठवणींत भिजताना माझं प्रेम असं खुलत जातं.
अन मग या सगळ्यांना सारखं सारखं प्रेम वाटताना माझं मात्र प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं.

हा दरवळ जपायचा आहे मला, तिचा अल्लडपणा, तिच्या आठवणी, ती स्वप्न सारं सारं जपायचं आहे मला. तिच्यासाठी घडीघडीला.
कदाचीत हेच प्रेम असेल.

तिचं हसू, तिचं असणं, तिचं भिरभिरणं, तिचं माझ्या मनावर अधिराज्य कदाचित हेच माझं प्रेम असेल.
हेच प्रेम जपायचं आहे मला.

तिला जपायचं आहे मला. माझ्यासाठी आयुष्यभर.

खरंच! प्रेम म्हणजे एक महोत्सव असतो आयुष्यभर चालणारा!
हा महोत्सव खुलवायचा आहे मला असाच प्रत्येक घडीला.

कृष्णविवर..खोल अतिखोल!

दूर दूर अंतराळात
एक ठिपका आहे..इवलासा
अगदी काळाकभिन्न राक्षस वाटणारा
कुरूप इतका की प्रकाशानंही दूर रहावं
काय इतकं साठलं असेल त्याच्या अंतरात?
का इतकं दूर गेला असेल तो?
की चंद्रतारेच त्याच्यापासून दूर राहत असतील?
त्याला नक्की कसली ओढ असेल?
एखाद्या चंद्रानं त्याचीही परिक्रमा करावी?
रात्रीच्या अंधारात अंधार होऊन हरवताना,
त्यानंही कुणासाठीतरी लुकलुकावं?
हजार प्रश्न असतील असे...
जरासं डोकावून बघावं म्हटलं गाभ्यात,
पण पुन्हा आठवलं..हे तर कृष्णविवर..खोल अतिखोल!
मलाही ओढून घेईल आतमध्ये..
किती वेदना?
किती दु:ख?
आणि शेवटी अंत..
पण कुठवर?
एक ना एक दिवस,
त्याचं महाकाय गुरुत्वाकर्षण भारी पडेल असं वाटतंय...
आणि मग ओढला जाईल मी..
खोल खोल खोल..
कुठवर ते माहीत नाही....


दोघांमधील अंतर जपायचा प्रयत्न करतोय
पण अंतर कमी होत चाललंय आजकाल..

--शब्द्सखा!

माझिया वेदनांना कळाया लागलो मी

माझिया वेदनांना कळाया लागलो मी
होउनी रात आता ढळाया लागलो मी

सावल्या दाटल्या का अशा या पेटताना
राहुनी मौन आता जळाया लागलो मी

बोलुनी श्वास गेले ’पुरे हे खेळ आता’
माझियापासुनी अन पळाया लागलो मी

जाहले ओस सारे पुन्हा मी कोरडा रे
माझिया आसवांना छळाया लागलो मी

--शब्द्सखा!

आई गं!

आई गं!
आठवत असशील मला
तुळशीपाशी दिवा लावताना
देवाजवळ शुभंकरोती म्हणताना
भल्या सकाळी अंगणात सडा घालताना
गोड धोड बनवल्यावर हट्ट करायला मी नसताना
ओवाळण्यासाठी भाऊ जवळ नाही म्हणून बहिण रडताना
तुला समजावताना बाबांचाही आवाज नकळतपणे कापरा होताना
दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी परतणारी इतरांची मुलं पाहताना
एखादी आई आपल्या बाळासाठी अंगाई गाताना
लहाणपणी दाखवलेला चांदोबा बघताना
बाजारात गेल्यावर खाऊ घेताना
फ़ोनवर बोलून झाल्यावर
अश्रू ढाळताना
आई गं!
--शब्द्सखा!

आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

शब्दहो आज तुम्ही उडून जा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

'विसावायचे मज सावलीत आई
निजायचे पुन्हा ऐकायची अंगाई'
शब्द हे माझे तीला ऐकवा रे
आईस माझ्या माझा निरोप द्या रे....

समई जळते जरी, देवघर पोरके
डोळ्यात दाटते आई,खळकन ओघळते
ममतेस तिचिया गातात आसवे रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

जाहली सांज पाखरे निघाली घराला
उब मायेची गाईच्या पाडसाला
उंबरा माझ्या घराचा पोरका रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

अंगणात जाता जरा संथ व्हा रे
'शुभंकरोती’ गाता तुम्ही गुणगुणा रे
ममता मायेची घेउनी या रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

ढाळेल आसवे ती ऐकुनी बोल माझे
काळजास तिचीया भले जाणतो मी
शब्दहो शेवटी तुम्ही मौन व्हा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

शब्दहो आज तुम्ही उडून जा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

--शब्दसखा!