दुपारी

अशाच एका भकास तापलेल्या दुपारी..

घरात उन्हं...दारात उन्हं..
जळलेली शरीरं..करपलेली मनं...
रस्त्याच्या कडेला रडणारं पोर
मातीला उगाचच चाटणार ढोर
वाळलेलं झाडं...वाळलेलं पान...
प्रत्येक जीवानं जपलेला त्राण..
डोळ्यात उभी कोरडीचा आसवं
रस्त्यावर दाटलेलं पाणी फ़सवं
जळालेली शेतं...जळालेली रानं..
पाखरांच्या ओठात उदास गाणं..
विहीरीत खोल काळे खडक..
पेटलेला सुर्य लालभडक...
दावणीची दावं तुटणारी...
वासरांची घरं सुटणारी
महाग पाणी...अश्रु स्वस्त...
Koradyaa आशांवर Koradiच भीस्त..
उन्हाचं तांडव पावलोपावली..
सावलीही आता शोधते सावली..
वावटळीनं घेतलेला तांबुस रंग..
झाडांची झालेली आखुड अंगं..
सुकलेले अंगण..सुकलेला पार...
सुकलेल्या शेतांचे मनावर वार...
जमीनींना रुतलेल्या खोल खोल भेगा..
भेगांनी घेतलेल्या झर्‍यांच्या जागा..
भयान रात्रींना अंधार गडप..
चांदण्यांचा पाऊस..कोरडीच सडक..
दूर कुठेतरी एक ढग आकाशात दिसतो..
म्हातारा नातवासमोर खोटंच हसतो..

शब्द --संदीप सुरळे

विसावा

नजरेत भाव तुझिया
नजरेत ठाव तुझिया

का छेडशी अशी मज?
नजरेत घाव तुझिया

नजरेस खेळवी तू
नजरेत डाव तुझिया

तू चोरशी अशी मज
नजरेत माव तुझिया

भिडतेस काळजाशी
नजरेत धाव तुझिया

घेतो जरा विसावा
नजरेत गाव तुझिया

--शब्द: संदीप

वाटा

पाहुनी मज का अताशा वळतात वाटा ?
ओळखीचा मी जरी का छळतात वाटा ?

मृगजळाचा मी शिकारी हे जाणतो मी
वास्तवाला पाहुनी या पळतात वाटा

सावल्याही पेटल्या का या पावसाळी ?
वाळवंटी दूर कोठे जळतात वाटा

पापण्यांनी पाझरावे का ऐनवेळी ?
आठवांना का तुझ्या गं कळतात वाटा ?

छेडता मी जोगियाला तू आठवावे
मैफ़लींना का तुझ्या ह्या मिळतात वाटा ?

चालण्याला मी अताशा सुरवात केली
मी क्षितीजा गाठले की खळतात वाटा

सावल्या

शब्द त्यांचे पाळती ना सावल्या या
चालता मी जाळती मज सावल्या या

वादळांना मी सहारा देत आलो
रात होता का पळाल्या सावल्या या ?

तू अशी का सांग झाली पाठमोरी
थांब थोडी शोधतो मी सावल्या या

का वसंती या उन्हांना जोर आला ?
पेटलेल्या पावसाळी सावल्या या

मी वदंता ही कुणाला ऐकवावी ?
आसर्‍याला आज आल्या सावल्या या

व्यास

कोण आले? हा कुणाचा भास आहे?
सांजवेळी ही कुणाची आस आहे?

मी भिकारी माझियाही आसवांचा
कोरडी ही पापण्यांची प्यास आहे

पारध्याला मी उगा का दोष देऊ?
हा गळ्याला नेहमीचा फ़ास आहे

बैसलो मी मैफ़लीला या तुझ्यारे
सांग साकी काय आता खास आहे?

मावळावे का तुझ्या ही आठवांनी
वाटते हा शेवटाचा श्वास आहे

ढाळसी का आसवांना या तुझ्या तू
ओंजळीत तुझ्या अता मधुमास आहे

माझिया का या शब्दांना भाव यावा?
मी कुठे बोललो ’मी व्यास आहे’ ?

भास

हा तुझा जो भास आहे,
भास असला तरी खास आहे
कॊण आपले हमरस्त्यावर नेहमी?
सवंगडी काही क्षणांचा हा श्वास आहे

शोध तू, तू कोण? काय? का?
व्यर्थ सारेच इथे फ़ास आहे

फ़सवे सारेच इथे... अगदी भासही
भास होण्याचाही इथे आभास आहे

शब्दांना तुझ्या जन्म दिलास तू
वेल उभारेल ही अंगणी असा कयास आहे..

--संदीप

दिलं घेतलं संपलं

दिवस ढळला?
अरे पुन्हा उगवेलच की...
आजच उगा मी
उद्याची वाट का पाहतो आहे?

आजचा खेळ संपला?
अरे उद्याचं उद्या बघु
उद्यासाठी मी
आजच का जागतो आहे?

सुर्य नाही का
रोज जातो - येतो
मग मी का अढळ होऊन
रोज इथेच थांबतो आहे?

मी काय मागतो आहे?
मी कुणाकडं बघतो आहे?
दिलं घेतलं संपलं की सारं
अजुन कशाला जगतो आहे?

--संदीप

कातरवेळ.....पुन्हा येईपर्यंत

पुन्हा आली कातरवेळ,
पुन्हा आठवणींचं जाळं पसरु लागलं सभोवार...
पुन्हा एक नवी मैफ़ल सजेल आता आठवांची
,पुन्हा एकदा मी माझा उरणार नाही...
पुन्हा एकदा मी एकटा ठरणार नाही...
गेलेले कित्येक क्षण आता पुन्हा भेटतील मला...
आणी हो, या प्रत्येक क्षणाबरोबर तू आठवशील...
तुझं हसणं आठवेल, तुझं रुसणं आठवेल..
तुझं असणं आठवेल, तुझं नसणं आठवेल...
तू गायलेल्या ओळी आठवतील....
ती रातराणी आठवेल, तो प्राजक्तही आठवेल...
ती गुलाबी सांज, ते सागर किनारे आठवतील....
तुझं लाजणं आठवेल,
माझ्या मिठीत तुझं हळुवार थिजणं आठवेल....
सारं सारं आता एक एक करुन डोळ्यासमोर येईल..
तो चंद्र ज्याला बघुन तू काही निरोप पाठवायचीस माझ्यासाठी
तोही आठवेल आता...
ए, तू आजही तसेच निरोप धाडतेस का गं माझ्यासाठी?
सांग ना...बघं, चंद्र तर कधिचा आला आहे....
......
ठाऊक असतं मनाला,
या जाळ्यात आता मी गुंतलो जाणार,
वेढलो जाणार पुरता....
अगदी स्व:तलाही विसरेल इतका...
पण तरीही वाटतं,
वेढुन घ्यावं स्व:तला या आठवणींच्या जाळ्यात....
कातरवेळ पुन्हा येईपर्यंत.....

दगड

कधि पाऊस झेलायचा, कधि वादळ पेलायचा
कधि उन्हात तळपायचा, कधि थंडीत कुडकुडायचा .... तो होता एक दगड!
एकलाच होता, त्याला वाटायचं आहोत आपण एकलेच...
सवय करुन घेतली त्याने एकलेपणाची.
तो आणी त्याचं एकलेपण जगायचे एकमेकाची साथ देतज
गात राहुनही जगापासुन खुप खुप दूर
कधि वाटलं नाही जगात यावं...
थोडसं जगासारखं जगावं...
जगाला एका वेगळ्या नजरेनं बघावं...
आनंद मानलेला त्यानं त्याच्या आयुष्यात...कारण तो होता एक दगड!
एक दिवस खुप वेगळा उगवला.
कुठुनतरी कुणीतरी आलं...अगदी अचानक...
तो चक्रावला जरासा, इतक्या आनंदाची सवय नव्हती कधि त्याला.
ते कुणीतरी त्याला फ़ुलं वाहुन गेलं...
ते कुणीतरी त्याला नजर भरुन पाहुन गेलं...
जग अचानक बदललं..
उन, वारा, पाऊस आता त्याला आपलेसे वाटू लागले...
कुणीतरी आपल्याला मानतं म्हणुन दगडालाही पंख फ़ुटु लागले...
असेच दिवस सरत चालले..
.त्या दगडाला कुणीतरी देवपण दिलं..
.कुणीतरी त्याचं एकलेपण नेलं...सारं कसं अचानक झालं...
पुन्हा एक दिवस वेगळा उगवलाज्यानं देवपण दिलं तेच त्याला म्हटलं,
"तू आहेस एक दगड..."
"तू आहेस एक दगड..."
शब्द - संदीप सुरळॆ

हाक - गझल!

आसवांच्या पावसाला हाक देतो
आठवांच्या पाखराला हाक देतो

गायली तू माझिया गझलेस जेथे
मी पुन्हा त्या मैफलीला हाक देतो

काय होते सांग नाते आपले ते?
कोण माझे मी कुणाला हाक देतो?

गाव माझा दूर ना, मी दूर आहे
थांबलेल्या पावलाला हाक देतो

रात होता, गर्द मी काळोख होतो
एकटा मी हुंदक्याला हाक देतो

वाटते की आवरावा हा पसारा
संपताना संपण्याला हाक देतो?

शब्द - संदीप सुरळे