अबोली

वन-टू वन-टू करत आँफ़िसला जाताना नेहमीप्रमाणे सईचा मीस काँल आला.
तसा मीस काँल येणं हे ठरलेलंचं. पण हा मीस काँल कधी येईल त्याला काही नियम नाहीत.
म्हणजे लहान मूल अगदी वेळ काळ न बघता बेलाशकपणे वाटेल त्या कारणावरुन वाटेल तिथे भोकाड पसरायला सुरवात करेल तसंच काहिसं म्हणाना.
पण यारहो, काहिही म्हणा आवडंत हे असं कुणीतरी आपल्यावर आपल्याही अगोदर हक्क गाजवलेला. यातून दुसर्‍याच्या ठायी असलेलं आपलं महत्व आपल्याच लक्षात येतं.
आता मी अडकलोय इकडे साता समुद्रापार, मला आपल्या देशातून इकडे मीस काँल द्यायचा म्हटलं तरी बर्‍याच जणांच्या अंगावर काटा उभा राहत असावा(अर्थातच हा माझा तर्क) त्यामूळे, "मला फ़ोन आला" असं वाक्य आजकाल बोललंच जात नाही माझ्याकडून. मित्रमंडळींचा भेटीचा अड्डा म्हणजे मेसेंजर्स आणी आँर्कूट आणी कधी कधी १५ एक दिवसातून फ़ोनवर(अर्थातच तोही मी केलेला) .
पण एक मीस काँल मात्र अगदी नित्य निरंतर असतो.
त्यामूळे मीस काँल कुणाचा आला असेल हे बघण्याच्या भानगडीत न पडता मी मोबाईल खिशातून काढून सरळ सरळ अगोदर १ आणी नंतर ३ डायल केला. मी ’बोल’ अथवा ’हँलो’ अथवा इतर काहिही बोलायच्या आतच,
’ए दीप त्या(अमूक तमूक)ने काय सुंदर कविता टाकली यार आँर्कूटवर.."अबोली" वर’.
प्रेमरोग मध्ये ती बालीश पद्मिनी त्या प्रेमरोगी चंपू ला जेव्हा ’ए देव..’ म्हणायची ना तेव्हा जाम जळायचो मी त्या बिचार्‍या चंपू वर. जर त्याला आता कळलं की मला कुणीतरी ’ए दीप’ म्हणतं (पिक्चर मधल्या सारखं खोटं खोटं नाही) तर I hope की तो माझ्यावर जळायचा नाही.
तर आता पुढील आठ ते दहा मिनीटे ती कविता कशी आहे? त्या कवितेत हिला कोणत्या ओळी खुप जास्त आवडल्या? त्या कवितेला कुणी कुणी कसे (निवडक) रिप्लाय दिलेत? हिने रिप्लाय दिला का? दिला असेल तर ’मी तुला वाचून दाखवू का मी काय लिहीलं ते?’ असं उगीच विचारणं हे ओघानं येणार होतं. आणी ते आलंही. मीही शांतपणे ऐकत होतो(as usual) आणी ती बोलेल त्याला हो, अच्छा, ओके, अरे वा अशी उत्तरं देत होतो.
तसं हे माझं नेहमीचंच. ती कसली तरी तारिफ़ करत असेल तर काय बोलावं हे मला बर्‍याचदा सुचत नाही. बहूतेक कुणालाच सुचत नसावं.
मग त्या कवितेवरची चर्चा झाल्यावर, जरासं अबोलीच्या फ़ुलालर बोलण झालं. तेव्हा कळलं की सईला अबोली आवडते.आणी ठरवलं, आता भेटल्यावर अबोलीचा एक छानसा गजरा करुन माळायचा हिच्या केसांत.
सगळं बोलून झाल्यावर शेवटी सई म्हटली ’तुही लिहीना अबोलीवर एखादी कविता.’
आँफ़िसमधुन कधी एकदा घरी जातो आणी ती कविता वाचतो असं झालं होतं आता.
आँफ़िसमध्ये कसातरी दिवस संपला. दिवसभर कामात असल्यामुळे त्या कवितेची अथवा अबोलीची दोघींचीही आठवण झाली नाही.
आँफ़िसमधुन बाहेर पडलो अन घराची वाट धरली.
अन अचानक तिथेच, जिथं सकाळी फ़ोन वाजला होता तिथं आल्यावर पुन्हा त्या फ़ोनची, आणी अबोलीची आठवण झाली.
नजर आजुबाजुच्या गवतावर, उघड्या मैदनावर फ़िरायला लागली अबोलीचा शोध घेतं. कशी दिसत असेल अबोली? बरीच फ़ुलं असतील की एखादंच फ़ूल कुठंतरी डोकावत असेल? संध्याकाळी कशी असेल, सुकलेली असेल की अजुनही टवटवीत खुललेली असेल ही? मनात असे विचार आणी नजर इकडेतिकडे भिरभिरत घर कधी आलं ते कळलंही नाही.
मन थोडंसं जड झालं खरं, पण कारण कळेना.
अबोलीचं फ़ूल?
छे !!! काहितरीच काय? त्या फ़ुलावरुन मन का जड व्हाव?
पण काहितरी कुठंतरी सलायला लागलं हे मात्र नक्की.
थोडासा मागं गेलो, सकाळी सईनं सांगितलेली ’अबोली’ आठवली.
एका प्रश्नाजवळ थांबलो. या फ़ुलाला ’अबोली’च का म्हणायंच?
सारे तर्क वितर्क लढवून झाले. उत्तर सापडेना.
एव्हाना दररोज आँफ़िसवरुन आल्यावर काहितरी खाऊन कुणी आँनलाईन असेल तर गप्पा मारण्यात अथवा एखादा चित्रपट बघण्यात मशगूल झालेला असतो. पण आज हे नेहमीचं अंगवळणी पडलेलं वळण भलतीकडेच वळण घेऊन बसलं होतं.
क्षणभर मनाशीच पुटपुटलोही की ’का शोधायचं उत्तर? काय संबंध ह्या अबोलीचा आणि माझा? का उगाचच मन जळतय या अबोलीच्या फ़ुलापायी?’
पण हे उत्तर नव्हतं.
पुन्हा तेच सुरु.
मनाचे आरोह अवरोह सुरु झाले वेड्यासारखे.
वेडीपिशी होऊन खुलणारी ही नाजुक अबोली. एकदा खुलायला लागली की खुलतच राहणार. बरं त्यातही ही खुलणार माळरानी. पाणी असो वा नसो ती आपला अल्लडपणा जपत खुलणारच.
वळवाच्या पावसात बेधुंद होऊन तिच्याच मस्तीत डुलत असते तेव्हा तिचा हलका शेंद्री, गुलाबी रंग अधिकच खुलुन उठतो, गडद दिसायला लागतो.
नेहमीच टवटवीत, हसरी वाटणारी अबोली प्रत्येकालाच जवळची वाटू लागते.
पावसाच्या सरिचा एखादा थेंब तिच्या एखाद्या पाकळीवर अडकून रहावा आणी सुर्याच्या एखाद्या किरणानं त्या थेंबातून आरपार डोकावून अबोलीच्या रंगावर पडावं, तेही एखाद्या माळरानी.
इतकी ही सुंदर, मनमोहक अबोली. हे खरं की अबोलीच्या फ़ुलाला म्हणावा असा गंध नाही.
पण तिच्या रंगांनी ती मन जिंकते हेही तितकंच खरं.
तिच्या वेगवेगळ्या रंगांतून, पाकळ्यांतून आपल्याशी ती हीतगूज करत असते. नेहमीच खुलणारी, डुलणारी अबोली पाहताना, तिच्या रंगांनी आपल्या मनाच रितं रितं आभाळ भरुन येतं, तिला बघतच राहावसं वाटतं.

आता उमजलं, सकाळी का इतंक बोललं जात होतं अबोलीबद्दल.

पण अबोली का म्हणायचं हिला? इतके रंग, इतकी सुंदरता आहेच ना हिच्याकडे मग तरिही उगाचच का?
’अबोली’ म्हणजे त्यागाचं प्रतिक.
काहीच न बोलणारी. बरंच काही आपल्या मनाशीच दडवून बसलेली.
खोलवर कुठंतरी, मनाच्या तळाशी आपल्यातच हरवलेली.
सगळ्या जगाला दिसणारी अबोली आणी प्रत्यक्षात असणारी ’अबोली’ या दोन्ही वेगळ्या असू शकतील ना?
तिचा सालसपणा, अल्लड्पणा नजरेत भरतो, मग ती ’अबोली’ का?
की खरोखरचं या नितळ, निखळ, अल्लड अबोलीत एखादी अबोल अबोली दडलेली असेल, जगापासून दूर?
खुललेली अबोली पाहिली की मन टवटवीत होतं, पण ’अबोली’ हे नाव उच्चारल की मन जड होतं. का असं?
कदाचीत कुठल्यातरी गर्तेत गुंतलेली असेलही नेहमीच ती. हे कुणा ना कळे.


’सई’ सुद्धा अशीच आहे. मनमुरादपणे खुलणार्‍या याच ’अबोली’सारखी.

आता उमजलं ही ’अबोली’ मनाला का साद घालत होती ते.
मन अधिकच बेचैन झालं आणि पुन्हा एकदा मनाचे आरोह अवरोह सुरु झालेत.
आता अबोली मागे पडली होती, पण तीच्या नावाने मनाशी फ़ेर धरला होता.

--शब्द्सखा!

5 प्रतिसाद:

सुप्रिया.... said...

बापरे!!!!!काय म्हणु...अबोली बद्दल इतक्या सगळ्या गोष्टी मांडल्य़ास ग्रेट आहेस..त्याही इतक्या सहज....आणि तुझी ’ही’ पण आवडली...keep writing yaar[:)]

स्नेहा---स्नेहासक्त said...

’अबोली’ म्हणजे त्यागाचं प्रतिक.
काहीच न बोलणारी. बरंच काही आपल्या मनाशीच दडवून बसलेली.
खोलवर कुठंतरी, मनाच्या तळाशी आपल्यातच हरवलेली.


mastach lihile aahes

Unknown said...

raje kay chalu ahe he...

शब्दमेघ said...

sundar pan he khaleel ek vakya vegaLe karun punha vachale .. aani hasalo majhach mee ..

’सई’ सुद्धा अशीच आहे. मनमुरादपणे खुलणार्‍या याच ’अबोली’सारखी.

*** Darshana *** said...

baap re baap kaay bhannaat lihil aahe....khupch chaan...