मातीला गंध पावसाचा..

ढगाढगाच्या मागुन ढग नभात पळे
मातीमातीत गंध पावसाचा दरवळे

सरीसरीच्या मागुन सर झेपावली खाली
थेंब थंडगार ओले अंग अंग शहारले

चिऊचिमणी झाडाझाडांच्या वरती
धुंद होऊन गाती चिंब होऊन नहाती

भिती जराशी दाटली फ़ुलपाखरांच्या मनी
फ़ुलवित पिसारा निळा नाचे मोर रानोरानी

चंद्र रमला पुन्हा लपंडावाच्या खेळात
न्याहाळीतो रुपडे इंद्रधनुच्या रंगात

पायवाटा जुन्या झाल्या त्या गेल्या पाण्याखाली
मैत्रि पावलांची सरली क्षणभर दुरावली

थेंब होऊनिया मोती... सवे सजणाची प्रिती
सजणीच्या दारी येती...गीत सजणाचे गाती

सरींचं येणं, सरींचं जाणं हा खेळ दिवसाचा
ओसाड उजाड मातीलाही आज पुन्हा गंध पावसाचा...

0 प्रतिसाद: