पावसा...

पावसा...
तुझ्याशी माझं नातं खुप जुनं आहे
तुझ्याबद्द्ल कितीही लिहीलं तरी उनं आहे
मी रडत असताना माझे अश्रु तु पिलास
कधि थेंब बनुन तर कधि शब्दांच्या रुपात
नेहमीच तु माझा साथ दिलास
वाटतं तुझा प्रत्येक थेंब घ्यावा झेलुन स्वत:च्या अंगावर
घ्यावं रडुन एकदाचं डोकं ठेवुन तुझ्या खांद्यावर
पण नाही....
मला तु परका नाहीस कधि
तसं इतरांनाही परका होऊ नकोस
दे त्यांनाही तुझं आयुष्य थोडं
असा तु स्वार्थी होऊ नकोस
तु फ़िर रानावनांतुन...नदि नाल्यांतुन
कुणालातरी तुझ्या ओलाव्याची गरज असेल
बघ कुठंतरी रानांना भेगा पडल्या असतील
एखादा चातक तुझ्यासाठी अखेरच्या घटका मोजत असेल
तुला दिसतील चिमुरडी पोरं रस्त्यावर धावताना
आपल्या आईलाही विसरुन तुझ्या शोधात फ़िरताना
बघं कुठंतरी एखादं हरिण तुझ्या आभासामागं धावुन
तडफ़डत असेल
बघ एखादं फ़ुल
तुला उमलायच्या आधिच कोमेजताना दिसेल
तुला सावली मिळणार नाही कुठं
झाडांची पानं कधिच गळाली असतील
माझ्या नजरेनं तुही बघं
कित्येक पक्षी तुझं जग सोडुन गेले असतील
हे सारं बघितल्यावर सरते शेवटी
रडु आलचं तुला तर तु ये माझ्याकडं...
रड आता तुही...माझ्या खांद्यावर डोकं ठेवुन
नाही...नाही...
सांत्वना नाही करणार तुझी
तेवढा मोठा मी नाही
पण हो...
मी रडेल तुझ्यासाठी
देइन माझे दोन अश्रु तुला..
तु आणखी बरसण्यासाठी..
तु खुप खुप बरसण्यासाठी...

0 प्रतिसाद: