चारोळी-८

तुला आठवणं म्हणजे
तुला पाहणं आहे
क्षणभर का होईना
पण भुतकाळात जाऊन तुझ्यासोबत राहणं आहे

गुलमोहराचं वागणंही
आठवणींसारखचं असतं
सा-या जगात उन्हाळा पेटतो
अन मग हा एकटाच फ़ुलांनी दाटतो

प्रत्येक संध्याकाळी
तुझ्या आठवणींची मैफ़ल भरते...
ही मैफ़लच नंतर
एक गोड आठवण बनुन सजते

पावसाचं अन माझं
आजकाल पटत नाही
तो आला तरी त्याच्यासोबत खेळायला
मला माझं घर सुटत नाही

रोज पडणारा पाऊसदेखील
मला रोजच नविन वाटतो
प्रत्येक पावसाचा प्रत्येक थेंब
मनात एक आठवण बनुन साठतो

पावसालाही
तुझ्या पावलांची चाहुल
तुझं मला भेटायला येण्याच्या आत
त्याचं माझ्या दारात पाऊल

पावसाला सांगतो मी
माझ्या घरी तु येऊ नकोस
वाळवंटी जीवनाला
श्रावणाची जुनी आठवण तु देऊ नकोस

पाऊस आणि आठवणी
एकमेकांशी मैत्रि करतात
तसे दोघेही माझेच
पण मग मात्र माझे शत्रु बनतात

झाडाचं तुटलेलं एक पान
दुर दुर ऊडत होतं
झाडापासुन दुर झालं म्हणुन
ते खुप खुप रडत होतं...

कातरवेळ आली की
तुझ्या आठवणींचं छळण होतं
मग माझ्या मनाचं रडणं
आणी अश्रुंचं पापण्यांआड दडणं होतं

आठवणींच्या मैफ़लीत माझ्या
असचं तुझं येणं होतं
मुक शब्दांचंही माझ्या
मग सप्तसुरेल गाणं होतं

दिव्याखाली अंधार असतो
पण हे त्याला कळत नाही
स्व:त अंधारात असला तरी
स्व:तसाठी तो कधिच जळत नाही...

तुझ्याशिवाय जगणं
आता जिवावर आलयं
तुझ्या आठवणी रोज मारतात
मरण मात्र दुर झालयं

दोन पावलं चालायचं असेल फ़क्त
तर आत्ताच माझा हात सोड
आयुष्यभर नसेल टीकणार
तर मनावरुन माझं नाव कायमचं खोड

प्रत्येक पावसाचा प्रत्येक थेंब
तुझी आठवण सजवुन जातो
बदल्यात मात्र स्वत:ला ...
माझ्या अश्रुंत भिजवुन घेतो

पावलोपावली
तुझी साथ आहे
दूर असलीस तरी
क्षणोक्षणी तुझाच भास आहे

तुझ्याकडं पाहताना
मनातलं बोलायचं राहुन गेलं
श्रावणाची वाट पाहताना
आभाळ कधिच वाहुन गेलं

तुझं सगळं तु मला दिलं
तुझं असं काही उरलं नाही
नशीब माझंचं फ़ाटकं
तुझं सगळंही मला पुरलं नाही

तुझ्याच केसांचि एक बटही
आपल्या प्रेमास नडली
तुझ्याकडं पाहताच येऊन
तुझ्या गालावर पडली

तुझ्या घरासमोरील गुलमोहरही
माझ्यासारखाच वेडा आहे
पावसाळा कधिच सरून गेला
तरी अजुन त्याला आकाशाचा ओढा आहे

0 प्रतिसाद: